Indian diaspora has played an essential role in strengthening Indo-Oman ties, says PM Modi
Being called for the inaugural address at the World Government Summit shows India's growing stature in the world, says PM Modi
His Majesty Sultan has an inseparable bond with India. My presence in the stadium named after His Majesty holds a huge significance: PM Modi in Muscat
As a nation, we believe in change. Every Indian is trying to make 'New India vision' a reality: PM Modi
We Indians believe in Vasudhaiva Kutumbakam (the world is one family), says PM Modi in Muscat
We make laws where it is necessary, but after our government came to power, approximately 1,400 laws have been done away with, says the PM
Next generation infrastructure is being developed in country keeping in mind the needs of 21st century: PM Modi in Oman

इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्य माझ्या प्रिय देशवासीयांनो तुम्हा सर्वांना माझा शतश: नमस्कार!
ही आपल्या देशाची केवढी मोठी शक्ती आहे की, मी जर केवळ नमस्कार वेगवेगळ्या भाषा आणि बोलींमध्ये करायला लागलो, तर अनेक तास लागतील. इतकी विविधता जगातील इतर कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही.

आज माझ्या समोर भारताच्या बाहेर ओमानच्या भूमीवर एक मिनी इंडिया मला दिसत आहे. देशाच्या विविध कानाकोप-यातून आलेले भारतीय, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे भारतीय, एक भव्य चित्राची निर्मिती मला माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे.

माझ्या सोबत पूर्ण ताकदीनिशी बोला, भारत माता की …जय, भारत माता की ….जय, भारत माता की…. जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.

बंधू आणि भगिनींनो, माझा हा ओमानचा पहिलाच दौरा आहे. दोन तासांपूर्वी मी दुबईहून येथे आलो आहे. तुम्ही कदाचित टीव्हीवर पाहिले असेल तिथे मला जागतिक सरकार परिषदेत संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून प्रमुख पाहुणा म्हणून तंत्रज्ञान विकासाच्या विषयावर उद्‌घाटनपर भाषण करण्याचे भाग्य मला लाभले. हा केवळ एखाद्या कार्यक्रमात भाषण देण्यापुरता मर्यादित विषय नाही आहे. आणि ही घटना म्हणजे स्वतःमधील भारताच्या प्रगतीचा सन्मान आहे. जो सन्मान आज जगाकडून मिळत आहे. आज माझा अधिकृत दौरा होत आहे. पण दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आफ्रिकेच्या दौ-यावर होतो आणि त्याच वेळी मी सालेह येथे थांबून पुढे गेलो होतो. काही काळ तिथे थांबलो होतो आणि त्या वेळी जे लोक मला तिथे भेटले होते त्या सर्वांची भेट घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. ब-याच दिवसांपासून ओमानला येण्याची, तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा होती, मात्र तो क्षण आज आला आहे.

ओमान सरकारला, ओमानच्या प्रशासनाला या सर्व व्यवस्थांसाठी मी मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो भारत आणि ओमानमधले संबध शेकडो हजारो वर्ष जुने आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी देखील गुजरातच्या लोथल बंदरातून लाकडी जहाजे ओमानपर्यंत येत होती…. आणि तिथून परततांना ही जहाजे लोथलच्याही पुढे दक्षिण भारताच्या किनारपट्टीजवळून श्रीलंकेपर्यंत जात असत. या हजारो वर्षांमध्ये व्यवस्थांमध्ये बदल झाले. भारतात गुलामगिरीचा एक मोठा कालखंड निर्माण झाला. मात्र, आमचे शतकानुशतके जुने असलेले व्यापारी आणि परस्पर संबध होते तसेच कायम राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान असलेले व्यापारी आणि आर्थिक सामाजिक संबंध बळकट करण्यासाठी संस्था निर्माण झाल्या. भारतात आमच्या हिंदुस्तानमध्ये जो मध्य देश प्रांत आहे तिथे बीना तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे हा बीना तेलशुद्धीकरण प्रकल्प ओमानच्या सहकार्याने सुरू आहे. दुसरीकडे भारतीय कंपन्यांचे दीड हजारांहून जास्त संयुक्त प्रकल्प ओमानमध्ये कार्यरत आहेत. ओमानच्या प्रगतीमध्ये आणि विकासाच्या वाटचालीत भारत आणि भारताचे सर्व कर्तबगार आपले लोक एक प्रकारे राष्ट्रदूत आहेत. ही सर्व तुमची भागीदारी आहे. सरकारच्या वतीने एक राजदूत असतो पण इथे तर देशाच्या वतीने लाखो राष्ट्रदूत ओमानमध्ये बसले आहेत. तुम्ही पाहिले असेल की गेल्या तीन वर्षात कशा प्रकारे आम्ही एक धोरण तयार करून आखाती देशांशी भारताच्या अतिशय जुन्या आणि मैत्रीपूर्ण संबंधांना काळानुरूप एक नवे रुप देत आहोत. त्यांना एका नव्या उंचीवर घेऊन जात आहोत. अनेक पैलूंना त्यात जोडत आहोत. तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की भारताची सातत्याने होत असलेली प्रगती आणि त्याच बरोबरीने आखाती देशांचे भारताविषयीचे स्वारस्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा अनुभव तुम्हाला येत आहे की नाही, तुम्हा लोकांना याचा अनुभव येत आहे. चारही बाजूंनी त्याचा नाद ऐकू येत आहे. ऊर्जा असो, व्यापार असो, गुंतवणूक असो, प्रत्येक क्षेत्रात आखाती देश आणि भारत यांच्यातील संबध आणखी जास्त महत्त्वाचे होत चालले आहेत. हे तर अगदी उघड आहे की ओमानशी भारताच्या ऐतिहासिक संबंधांना एक नवी चालना मिळाली आहे , नवी गती प्राप्त झाली आहे, नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. ओमान भौगोलिक रुपात आखाती क्षेत्रातील आपला सर्वात जवळचा शेजारी आहे आणि हे आपले भाग्य आहे की या राजघराण्याशी भारताचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जुने संबंध आहेत. महामहीम सुलतानांचे देखील भारताशी अतूट नाते राहिले आहे.

आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तुमच्याशी संवाद साधण्यासाठी महामहीम सुलतानांच्या नावे असलेल्या या स्टेडियममध्ये माझी उपस्थिती ही एक विशेष महत्त्वाची घटना आहे. या गोष्टीचे हे प्रतीक आहे की स्वतः महामहीम सुलतान आणि ओमानला भारत आणि भारतीयांविषयी किती जिव्हाळा आहे. अतिशय विशेष अशा या त्यांच्या स्नेहाबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप कृतज्ञ आहोत.

तुमच्याशी संवाद साधल्यानंतर मी महामहीमांची भेट घेणार आहे आणि मी त्यांना त्यांचे आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी सव्वाशे कोटी देशवासीयांच्या वतीने, माझ्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देणार आहे आणि मी त्यांना सांगेन की माझे इथे येण्याचे उद्दिष्ट आपल्या दोन्ही देशांच्या दरम्यान असलेल्या मैत्रीला आणखी बळकट करण्याचे आहे. तुम्हा सर्वांना ओमानमध्ये आज घरासारखे वातावरण मिळाले आहे आणि हे काही असेच मिळालेले नाही. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जे घरासारखे वातावरण मिळते ते इथल्या लोकांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाच्या त्या मूल्यांची ओळख आहे ज्यांना आपण भारतात विविधता आणि सहअस्तित्वासाठी अतिशय महत्त्वाचे मानतो.

ओमानमध्ये राहणारे माझे सुमारे 8 लाख बंधुभगिनी हे भारताचे सद्भावना दूत आहेत. तुम्ही ओमानच्या विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे, तुमचा घाम गाळला आहे, तुमचे तारुण्य या ठिकाणी खर्ची घातले आहे आणि मला आनंद आहे की ओमानचे सरकार देखील तुमच्या अथक परिश्रमांचा पूर्ण सन्मान करत आहे.

बंधू आणि भगिनींनो आपल्या भारतीयांवर अशा प्रकारचे संस्कार झाले आहेत की आपण प्रत्येक समाजात अगदी सहजतेने मिसळून जातो. हेच होते की नाही? ज्या प्रकारे दुधात साखर घातल्यावर ती दुधात मिसळून जाते ना? आणि दूध गोड होते, हे आपले संस्कार आहेत, हा आपला स्वभाव आहे आणि हा वारसा आपल्याला मिळाला आहे. कारण आपण वसुधैव कुटुंबकम् म्हणजे संपूर्ण विश्वालाच एक कुटुंब समजून वाटचाल करणारे लोक आहोत. काळ आणि समाजाला अनुसरून स्वतःला त्याप्रकारे घडवणे आपले आचरण, आपल्या परंपरा, आपले रीतीरिवाज या सर्वांना सांभाळून प्रत्येकाचा आदर करणे, प्रत्येक परंपरेचा सन्मान करणे हेच तर भारताचे वैशिष्ट्य आहे आणि भारतापासून दूर राहत या संस्कारांनी त्यांचे आचरण करत येथील सामान्य जीवनांच्या हृदयात स्थान मिळवण्याचे एक अभूतपूर्व काम तुम्ही करत आहात आणि म्हणूनच तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात.

हेच कारण आहे की जगाचा नकाशा कितीही बदललेला असो, मोठ-मोठे देश नष्ट झाले असतील मात्र भारत आज पूर्णपणे खंबीरतेने जलद गतीने पुढे वाटचाल करत आहे. मार्ग कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही अडचणीची असो, आम्ही ते लोक आहोत ज्यांना संकटावर मात करता येते. परिवर्तनासाठी बदलांसाठी आपल्यात जी धडपड आहे, प्रत्येक निराशेतून आपल्याला आशा आणि आकांक्षा घेऊन बाहेर पडणे आपल्या रगारगांत आहे, हा आपला निर्धार आहे.

बंधू आणि भगिनींनो आज प्रत्येक भारतीय न्यू इंडियाच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने झटत आहे. दिवस-रात्र काम करत आहे आणि ओमानमध्ये बसलेले तुम्ही लोक, भारतात काही चांगली घटना घडली तर तुम्हा लोकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. तुम्ही अतिशय आनंदित होता आणि जर एखादी वाईट घटना घडली तर तुम्ही लोक किती अस्वस्थ होता, हेच आपल्या लोकांचे वैशिष्ट्य आहे, आपुलकी आहे.

आपण एका अशा भारताच्या निर्मितीच्या दिशेने पुढे जात आहोत जिथे गरीबातील गरीब लोकांना देखील पुढे जाण्याची समान संधी मिळेल. जिथे गरीबातील गरीब व्यक्ती देखील स्वप्ने पाहील. त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची आशा तो बाळगेल. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुरुषार्थाचा मार्ग त्याला सापडेल. जिथे गरज लागले तिथे त्याचे बोट धरून नेणारा सापडेल आणि याच भूमिकेने सव्वाशे कोटी देशवासीयांना सोबत घेऊन आज देश प्रगतीच्या मार्गावर पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त पट ताकदीने, गतीने न्यू इंडियाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पुढे जात आहे.

मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स, हा मंत्र घेऊन आम्ही देशाच्या सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सोपे करण्यासाठी, इझ ऑफ लिव्हिंगसाठी अनेक कामे करत आहोत, प्रक्रियांना सोपे करणे, अनावश्यक कायदे रद्द करणे, सरकारी कार्यालयात 40-50 पानांच्या अर्जांना 4-5 पानांच्या अर्जावर आणणे, त्यांना ऑनलाइन भरण्याची व्यवस्था तयार करणे, लोकांच्या तक्रारी गांभीर्याने विचारात घेणे, त्यावर कारवाई करणे या सर्व कामांना आम्ही सरकारच्या संस्कृतीमध्ये आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत.

सरकार तेच आहे, लोक तेच आहेत, तीच नोकरशाही आहे, तीच साधने आहेत, तीच संसाधने आहेत, त्याच फायली आहेत, तेच अधिकारी आहेत, सर्वकाही तेच आहे पण मिळणारे परिणाम वेगळे आहेत, बदल जाणवू लागला आहे. बदलणा-या भारतात आज गरीबातील गरीबाला देखील बँकांमधून झिडकारून बाहेर काढता येत नाही. बदललेल्या भारतात आता सरकार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष भेटून, गरीब विधवेच्या घरी जाऊन तिला गॅस कनेक्शन देत आहेत. ज्यांच्या घरी आज अंधार आहे, ती घरे शोधून त्यांना मोफत वीज जोडणी देण्याची मोहीम सरकार सध्या चालवत आहे.

आज देशात… आणि तुम्हा ओमानवाल्यांना काहीसा, मोदीजी असे कसे होऊ शकते, तुम्हाला खरे वाटणार नाही, इन्शुरन्स शब्द ऐकल्यावरच असे वाटायचे की हे तर श्रीमंतांचे काम आहे, हा तर बड्या बड्या लोकांशी संबंध असलेला विषय आहे. आज दिल्लीत अशा सरकारला तुम्ही काम करण्याची संधी दिली आहे की गरीबांना केवळ दिवसाला 90 पैसे देऊन आणि दुसरी योजना आहे की महिन्याला केवळ 1 रुपयाच्या हप्त्यावर जीवन आणि सुरक्षेचा विमा दिला जात आहे. 90 पैशात, मी चहावाला आहे आणि मला माहित आहे की 90 पैशात चहासुद्धा मिळत नाही सध्याच्या काळात. या विमा योजनांतर्गत ज्या कुटुंबांचा विमा होता आणि त्या कुटुंबावर एखादे संकट आले तर तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की गरीबांविषयी संवेदनशील असलेले सरकार ज्यावेळी असते आणि अशी योजना तयार होते त्यावेळी तिचा परिणाम काय होतो की गरीब कुटुंबावर एखादी आपत्ती ओढवली, एखादे संकट आले तर इन्शुरन्सवाले होते. अशा कुटुंबांना जास्त काळ झालेला नाही, अगदीच एखादे वर्ष झाले असेल, जवळ जवळ दोन हजार कोटी रुपये त्यांच्या दाव्यांच्या रुपात अशा गरीब कुटुंबांना देण्यात आले आहेत. तुमच्यातील कित्येकांना याचा अनुभव आला असेल. तुमचे कुटुंब, नातेवाईकांना आला असेल तर माहित झाले असेल.

मित्रांनो, तुम्ही लोकांना नवा पासपोर्ट बनवण्यासाठी, पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी पायपीट करावी लागत नाही. आम्ही टपाल कार्यालयात देखील पासपोर्टच्या व्यवस्थेचा विस्तार केला आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाला, जो पासपोर्ट पूर्वी आठवडा, 15 दिवसानंतर तरी मिळेल की नाही अशी शंका असायची पण आज कार्यक्षमतेमुळे विकेंद्रित व्यवस्थेमुळे, टपाल कार्यालयांशी या व्यवस्थेला जोडण्यात आल्यामुळे एक किंवा दोन दिवसात पासपोर्ट मिळू लागला आहे.

आपल्या देशात एखाद्याला उद्योग सुरू करायचा असेल, एखादी नवी कंपनी सुरू करण्याची इच्छा असेल, त्यासाठी निधीची गुंतवणूक करायची असेल तर एक काळा होता की नवीन कंपनीची नोंदणी करण्यासाठी पूर्वी अनेक दिवस लागायचे. मी अतिशय समाधानाने हे सांगेन की आज ते काम केवळ आणि केवळ 24 तासात होऊ लागले आहे. तुम्ही पूर्वी ऐकले असेल की सरकारे घोषणा करत असायची की आम्ही हा कायदा बनवला, आम्ही तो कायदा बनवला, आम्ही अमूक कायदा बनवला, आम्ही तमुक बनवले. हेच ऐकले असेल ना तुम्ही लोकांनी, हेच ऐकायचात. मी त्याच्या उलट बातमी तुम्हाला सांगेन. जिथे गरज असेल तिथे कायदा बनवावा लागतो, बनवला देखील जातो. मात्र आमचे सरकार स्थापन झाल्यावर आतापर्यंत आम्ही जवळ जवळ 1400-1500 पर्यंत कायदे, ज्यांची आता अजिबात आवश्यकता नाही आहे, ते सर्व कायदे रद्द करण्याचे काम आम्ही केले आहे. 1400-1500 कायदे रद्द करणे म्हणजे एका प्रकारे माझ्या कार्यकाळात दर दिवसाला एक कायदा रद्द होतो. सर्वसामान्य नागरिकांवर या कायद्यांचा एक संच बोजा बनतो. त्याला मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी परिवर्तन आणण्याच्या दिशेने, जुन्या ओझ्यापासून मुक्ती देण्यासाठी आम्ही हे कायदे बदलले पाहिजेत.

तुम्ही या वेळेचा अर्थसंकल्प देखील काळजीपूर्वक पाहिला असेल तर या अर्थसंकल्पात अशा योजनेची घोषणा केली आहे ज्या योजनेने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तुमच्या देखील ते लक्षात आले असेल, कदाचित असे होऊ शकते की मे जे नाव सांगेन ते तुम्ही ऐकले नसेल कदाचित दुसरे एखादे नाव ऐकले असेल. आम्ही ही योजना या अर्थसंकल्पात आणली आहे. आयुष्मान भारत योजना. या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही देशातील दहा कोटी गरीब कुटुंबांना म्हणजे जवळ जवळ 40-50 कोटी नागरिक, भारतातील 40-50 कोटी नागरिक, या लोकांसाठी ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, एका कुटुंबाला एका वर्षात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. त्यांच्या आजारावरील उपचारांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च या विमा योजनेच्या माध्यमातून सरकार करणार आहे.

आता आयुष्मान भारत म्हटले तर कदाचित तुम्हा लोकांना देखील वाटले असेल की अरे ऐकलेले तर नाही पण गेल्या काही दिवसात तुम्ही पाहिले असेल. भारतातील वर्तमानपत्रांनी याला नवे नाव दिले आहे. वा… कोणी ऐकले आहे. भारतातील वर्तमानपत्रांनी या योजनेला मोदी केअर नाव दिले आहे आणि आमचा विरोध करणा-यांना देखील या योजनेला विरोध करता येत नाही, ते म्हणतात जर योजना चांगली असेल तर विरोध करायचा कसा?

बंधू आणि भगिनींनो भारत एक असा देश आहे ज्याने एकदा मनाशी ठरवले की तो ते करूनच दाखवतो. आयुष्य सुकर करण्यासाठी अशा अनेक योजना भारताच्या सव्वाशे कोटी लोकांचे जीवन सुकर करत आहेत.

बंधू आणि भगिनींनो, सरकारें येतात आणि जातात. त्याचप्रमाणे लोक येत असतात, जात असतात. मात्र यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकार कोणत्या दर्जाचे प्रशासन देत आहे, याकडे लक्ष देण्याची योजना तयार केल्यानंतर त्या 30-30, 40-40 वर्षे पूर्ण होत नव्हत्या, अशा प्रकारचे प्रशासनही या आधी होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या राज्यात सरदार सरोवर धरण योजनेचे पंडित नेहरूजींनी शिलान्यास केले होते. आणि अगदी अलिकडेच म्हणजे गेल्या वर्षी हे काम पूर्ण झाले आहे. काही वेळा तर असं लक्षात येतं की, धरणाचं काम तर पूर्ण होवून जातं. परंतु पाणी योग्य ठिकाणी पोहोचवण्‍यासाठी आवश्यक असलेल्या कालव्यांच्या कामांचा पत्ता नसतो. पूल बनवले जातात परंतु त्या सेतूला जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे केलेली नसतात. कामे राहिलेली असतात. विजेसाठी खांबांची उभारणी केली जात होती परंतु त्यावरून विद्युत जोडणी करण्यासाठी तारा टाकलेल्या नसतात. आणि जर एखाद्या वेळेस तारा टाकण्याचं काम पूर्ण झालेले असेल, तर त्यातून विजेच्या जोडण्या दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे लोक या तारांवर कपडे वाळत घालत होते. लोकांपर्यंत वीज पोहोचत नव्हती. नव-नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा केली जात होती. परंतु कोणी लोहमार्गाचा विचार करीत नव्हते की रेल्वेगाड्यांविषयी विचार करीत नव्हते. इतकंच नाही तर लोहमार्गांना रंगवण्याचं काम कागदावरही कधी कोणी केलं नाही. अशा प्रकारे जर ढिसाळ प्रशासन असेल तर देशाला या 21व्या शतकामध्ये पुढे नेण्याचं काम कधीच होवू शकणार नाही. म्हणूनच ही प्रशासन पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. आणि असा बदल करणं आज अनिवार्य आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात झालेल्या गैरव्यवहाराची मोठी यादी आपल्या देशाला नुकसान पोहोचवणारी ठरली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विश्वामध्ये देशाची प्रतिमा मलीन करण्याचं काम या गैरव्यवहारांमुळे झालं आहे. अशा कचाट्यामध्ये सापडलेल्या आपल्या देशाला आम्ही आत्ता कुठे बाहेर काढलं आहे.

आज चार वर्षे होत आली आहेत, परंतु अद्याप कोणी असं कधीच म्हणत नाही की, ‘मोदींनी यामध्ये किती नेले?’ आणि माझ्या देशाच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी मस्तक झुकवून, अगदी नम्रतेने, खूप आनंदाने, मनापासून सांगतो, की माझ्या देशाने ज्या आशा आणि अपेक्षांनी मला या पदावर विराजमान केलं आहे, त्या पदाचा कणभरही अवमान माझ्याकडून होणार नाही. आता परिस्थिती उलटी झाली आहे. मी जिथे कुठे जातो, कोणालाही भेटलो अगदी आमचे विरोधकही माझ्यावर आरोप करीत नाहीत. परंतु काय करतात माहीत आहे का? देशाला किती निधी मिळाला ते मोदीजींनी सांगितलं का, असं विचारतात. पूर्वी लोक विचारत असायचे की, किती निधी गेला? आता मोदींनाच किती पैसा देशात आला, हे विचारतात. हे पाहून मला वाटतं की, देशामध्ये एक प्रकारचे विश्वासाचे वातावरण तयार झालं आहे. आणि या विश्वासानेच आपल्या देशामध्ये नव्या आशांना जन्म दिला आहे. या नवीन आशाचं नवभारत निर्माण करण्याच्या संकल्पाला नवे बळ देत आहे.

आज नागरिक स्नेही, विकास स्नेही, प्रशासकीय दायित्व यावर आम्ही भर देत असून देशाला पुढे घेवून जाण्याचं काम करीत आहोत. आणि त्याचे परिणाम आता मी याआधी सांगितल्याप्रमाणे जाणवू लागले आहेत.

आज देशामध्ये रस्ते बनवण्याचा वेग, लोहमार्ग टाकण्याचा वेग, लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचा वेग, नवीन विमानतळे निर्माण करण्याचा वेग, सरकारच्यावतीने गरिबांसाठी घरकूल योजनेतून गृहप्रकल्प बांधण्याचा वेग, बँकांमध्ये खाते उघडण्याचा वेग, स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्याचा वेग पाहिला तर लक्षात येते, ही सर्व कामे पहिल्यापेक्षा दुप्पट, तिप्पट तसेच त्यापेक्षाही जास्त वेगाने केली जात आहेत.

21वे शतक सुरू होवून आता दोन दशकांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. आत्तापर्यंत कितीतरी सरकारें आली आणि गेली. संपूर्ण दुनिया बदलली. परंतु हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल, भारताने याआधी कधी आपलं स्वतःचं हवाई धोरण निश्चित केलं नाही. आमचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही हवाई धोरण निश्चित केलं. आणि देशामध्ये जे लहान -लहान शहरं आहेत, जिल्हा मुख्यालयाची स्थानं आहेत, ज्या शहरांमध्ये जुन्या धावपट्ट्या आहेत, त्यांना पुनर्जिवीत करण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे या धावपट्ट्यांरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू झाली. आता नव-नवीन विमानतळांचा विकास करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि माझ्या प्रिय साथीदारांनो, आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, आज आमच्या देशामध्ये खासगी, कॉर्पोरेट अथवा सार्वजनिक क्षेत्रातले मिळून जवळपास साडे चारशे विमाने सध्या कार्यरत आहेत. यावर्षीपर्यंत म्हणजे गेल्या 70 वर्षांमध्ये आमच्या देशात फक्‍त साडे चारशेच्या आसपास विमाने सेवा देत आली आहेत. आता आमचे सरकार आल्यानंतर केवळ एका वर्षामध्ये खासगी कंपन्या, खासगी लोक तसेच इतर विविध कंपन्यांनी मिळून नवीन जवळपास नऊशे विमानांची खरेदी करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. 70 वर्षांच्या प्रवासामध्ये फक्त साडे चारशे आणि एक वर्षामध्ये नऊशेपेक्षा जास्त विमानांची मागणी नोंदवली गेली आहे. का बरं? कारण आमचे हवाई धोरण. आम्ही जाहीर केलं की हवाई चप्पल घालणारा, सामान्य माणूसही हवाई प्रवास करू शकला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.

साथींनो, जर आम्ही अगदी तळाशी जावून, सगळी परिस्थिती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या नसत्या तर आज आपण ही जी प्रगती पाहत आहात, विकासाचा वेग पाहत आहात, ते केवळ अशक्य होते. कोणतेही मोठे आणि चिरकाल टिकणारे बदल असे सहज, वरवरचे काम करून कधीच होत नसतात. त्यासाठी संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणावा लागतो. आणि ज्यावेळी असे बदल घडून येतात, त्याचवेळी तो देश अवघ्या तीन वर्षाच्या आतमध्ये ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’च्या बाबतीत जागतिक बँकेच्या क्रमवारीमध्ये 142 व्या स्थानावरून एकदम मोठी झेप घेवून, 42 स्थानांचे अंतर कापून 100व्या क्रमांकावर येतो, त्यावेळी संपूर्ण जगाला आश्चर्य वाटते.

बंधू आणि भगिनींनो, देशामध्ये आता 21व्या शतकाच्या गरजांचा, आवश्यकतांचा विचार करून त्यादृष्टीने नवीन पिढीसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये वाहतूक क्षेत्राला आम्ही खूप प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करतांना, त्या एकमेकांना पूरक कशा ठरतील, याचा अतिशय काळजीपूर्वक विचार केला आहे. महामार्ग, हवाईमार्ग, लोहमार्ग, जलमार्ग हे सर्व एकमेकांना पूरक असतील आणि प्रवाशांच्या दृष्टीने ते एकात्मिक कसे बनतील, याचा प्रामुख्याने विचार केला आहे.

सरकारने ‘भारतमाला प्रकल्पा’अंतर्गत 53 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 53 हजार किलोमीटर महामार्गासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कामे सुरू झाली आहेत. यामध्ये रेल्वे कॉरिडॉर बनवण्याचे काम सुरू आहे. मोठ्या अकरा शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार केला जात आहे. मागच्याच वर्षी कोची मेट्रोचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली होती. चेन्नई मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे.

बेंगलुरू शहरामध्ये वाहतुकीच्या अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये भरघोस तरतूद केली आहे. याचप्रमाणे देशामध्ये सागरी किनारामार्ग विकसित करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सागरी किनारे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. हा प्रकल्प आम्ही ‘सागर-माला’ या नावाने करीत आहोत.

आमच्या मच्छीमार बंधू आणि भगिनींसाठी ‘नील क्रांती योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यांना आधुनिक ‘ट्रॉलर’ खरेदीसाठी भारत सरकारने आर्थिक मदत देवू केली आहे. सरकार देशामध्ये 110 जलमार्ग विकसित करीत आहे. आमच्या देशामध्ये आत्तापर्यंत जलमार्गांची उपेक्षा झाली. नद्यांचा उपयोग वाहतुकीसाठी केला जावू शकतो, असे 110 जलमार्ग निवडून, शोधून काढण्यात आले आहेत. हे करतानाच पर्यावरणाचे रक्षणही करण्यात येणार आहे. वाहतुकीचा खर्च कमी कसा करता येईल, याचा विचार आम्ही करीत आहोत. वाहतुकीचा खर्च कमी झाला की ग्राहकांना आपोआपच अनेक वस्तू स्वस्तामध्ये उपलब्ध होवू शकणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी जे कोणी 2022-23 मध्ये भारतामध्ये येतील, त्यांना आपला देश एक शानदार देश बनला असल्याचे जाणवेल. देशाने केलेली प्रगती त्यांना पहायला मिळेल. आणि आपल्या देशात बुलेट ट्रेनही त्यावेळी धावतेय, हे दिसेल.

मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमध्ये धावणा-या बुलेट ट्रेनच्या कामाला मागच्या वर्षी प्रारंभ झाला आहे. ही वेगवान गाडी दोन-सव्वा दोन तासामध्ये आपल्याला मुंबईहून अहमदाबादला पोहोचवणार आहे. बुलेट ट्रेनमुळे भारताच्या वर्तमान व्यवस्थेमध्ये एक ‘स्तरीय’ सुधारणा होणार आहे, एवढाच फायदा होणार आहे, असं नाही. तर आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन सेवा देणारी कार्यप्रणाली विकसित होणार आहे.

साथींनो, आता भारतामध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही किंवा तो टाळला जातो, असे अजिबात घडत नाही. आता भारताने आपला एक नवीन स्वभाव बनवला आहे. निर्णय घेणे टाळण्याचा काळ आता संपला. आता आम्ही निर्णय घेतो आणि आव्हानेही स्वीकारतो. प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आम्ही करतो आणि पुढे वाटचाल करत आहोत. लक्ष्य निश्चित करून त्या त्या योजना विशिष्ट कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत पूर्ण करतो. भारतामधल्या कार्य संस्कृतीमध्ये जे बदल घडून आले आहेत, त्याचे हे उदाहरण आहे. हा नव भारत आहे. नव भारताचे हे एक ठसठशीत उदाहरण आहे. आधी देशामध्ये रोज कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये घोटाळा, गैरव्यवहार झाल्याच्या बातम्यांमुळे प्रचंड गदारोळ माजत होता. इतक्या कोटींचा घोटाळा झाला, तितक्या कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला, अशा बातम्या येत होत्या. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळी हेतू शुद्ध असतो, आचरण स्पष्ट, स्वच्छ ठेवून निर्णय घेतले जातात त्यावेळी देशाचा पैसा खूप वाचतो. ज्यावेळी अतिशय कार्यक्षमतेने कोणतेही काम केले जाते, उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला जातो, त्यावेळी देशाचा मोठ्या प्रमाणावर पैसा वाचतो.

नवीन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या सरकारने ‘थेट लाभ हस्तांतर योजना’ राबवून देशाचे 57 हजार कोटी रूपये चुकीच्या लोकांच्या हाती जात होते, ते वाचवले आहेत. गरीब जनतेचा पैसा न पैसा वाचवण्याचे काम आम्ही केलं आहे. ‘थेट लाभ हंस्तातरण’ म्हणजे अनुदानाचे, निवृत्ती वेतनाचे, शिष्यवृत्तीचे, मजुरीचे पैसे संबंधितांच्या थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जात आहेत. याआधी अशी अनुदानाची अथवा इतर कोणत्याही कारणाने सरकारकडून मिळणारी रक्कम बनावट नावांनी अनेक मध्यस्थ आपल्या पदरात पाडून घेत होते. आता आमच्या सरकारने हा बनावट मध्यस्थांचा सगळा खेळ बंद केला आहे. यामुळे देशाच्या नागरिकांचा विशेषतः मध्यम वर्गाचा पैसा वाचतोय. आमची उज्ज्वला योजना आहे. बंधू आणि भगिनींनो, 2014 च्या आधी एलईडी बल्बची किंमत हिंदुस्तानमध्ये साडे तीनशे रूपये होती. आता तोच एलईडी बल्ब आमच्या देशामध्ये 40-50 रूपयांना मिळू लागला आहे. कुठं आधीची तीनशे-साडे तीनशे किंमत आणि कुठे आत्ताची 40-50 रूपये किंमत! स्वस्त दरातले एलईडी बल्ब उपलब्ध होण्याबरोबरच जे लोक एलईडी दिवे वापरत आहेत, त्यामुळे दरवर्षी अंदाजे 15 हजार कोटी रूपयांच्या विजेची बचत होवू लागली आहे. याचा लाभ मध्यम वर्गातल्या परिवारांना झाला आहे.
साथींनो, आपल्याला आश्चर्य वाटेल की, जेवढी वीज एलईडी दिव्यांच्या वापरामुळे वाचली आहे, जवळपास तितकेच विजेच्या उत्पादनासाठी देशाचे 45 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाले असते. जर लोकांनी वाचवलेली वीज आणि देशाने केलेली बचत या दोघांची बेरीज केली तर बचतीचा आकडा, जवळपास 60 हजार कोटी रूपये इतका होतो. असेच एक उदाहरण कृषी क्षेत्रासाठी वापरण्यात येत असलेल्या खतांचे देता येईल. बंधू आणि भगिनींनो, खतांचा एकही नवीन प्रकल्प देशात आम्ही सुरू केलेला नाही. तरीही आमच्या नवीन धोरणांमुळे, आधीच्या-जुन्या खत प्रकल्पांची कार्यक्षमता आम्ही वाढवण्याच कार्य केलं. खतांची होणारी ‘गळती’ आम्ही थांबवली. त्यामुळे 18 ते 20 लाख टन युरियाची निर्मिती जास्त होवू लागली. आणि या 18 टन युरियाच्या निर्मितीसाठी होणारा जवळपास 7 ते 8 हजार कोटी रूपये सरकारचा होणारा खर्च वाचला आहे. इतकंच नाही तर युरियाची होणारी टंचाई कमी झाली. परदेशातून युरिया आणण्याची वेळ गेल्या तीन वर्षात आली नाही त्यामुळे तीन ते चार कोटींचे परकीय चलन सरकारचे वाचले, ते वेगळेच. त्‍याचाही लाभ झाला आहे. याशिवाय सरकार देत असलेल्या 800 ते 900 कोटी अनुदानामध्येही बचत झाली आहे. म्हणजेच एकट्या खताच्या क्षेत्रामध्ये नवीन धोरण आखल्यामुळे आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ केल्यामुळे, त्याचबरोबर देखरेख, तपासणी चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आमच्या सरकारने देशाचे जवळपास 12 हजार कोटी रूपये वाचवले आहेत. हा पैसा आपल्या हक्काचा आहे. हिंदुस्तानवासियांच्या हक्काचा हा पैसा आहे.

बंधू आणि भगिनींनो, आम्ही आधीच्या सरकारांच्या काळात झालेले पेट्रोलियम सामंजस्य करार, गॅस सामंजस्य करार यांची माहिती काळजीपूर्वक घेवू लागलो. इतके सारे करार कसे केले आहेत, हे अगदी बारकाईने तपासू लागलो. आता 20-20, 25-25 वर्षांचे करार झाले आहेत. काही करार 30 वर्षांसाठी झाले आहेत. आम्ही आता या करारांचा चांगला अभ्यासही केला आहे. अलिकडच्या वर्षात भारताची बाहेर चांगली पत निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही काही देशांबरोबर चर्चा करून आम्ही फेरकरार करण्यात यश मिळवले आहे. आपल्याला जाणून आनंद वाटेल की, कतार आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर आधी केलेल्या सामंजस्य करारामध्ये फेरबोलणी करून बदल करण्यात आले आहेत. सामंजस्य करारांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पहिल्याच्या तुलनेमध्ये 12 हजार कोटी रूपये आपल्याला कमी द्यावे लागणार आहेत. देशाचे हे 12 हजार कोटी रूपये आम्ही वाचवले आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आत्तापर्यंत मी फक्त चार योजनांची माहिती आपल्याला दिली आणि त्यामुळे देशाचे जवळपास 1लाख 40 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रूपये वाचले आहेत. बंधू आणि भगिनींनो, आता आपणच सांगा, हे 1 लाख 40 हजार कोटी रूपये आधी जात होते, ते गरीबांच्या हक्काचे पैसे होते की नव्हते? तो पैसा वाचण्याची आवश्यकता होती की नाही? तो निधी गरीबांच्या कल्याणासाठी, त्यांच्या योजनांसाठी उपयोगी आणला पाहिजे होता की नाही? आमच्या सरकारने प्रत्येक काम प्रामाणिकपणाने आणि याच हेतूने, अशाच दृष्टीने आणि याच वचनबद्धतेने, बांधिलकीने केले आहे. आणि त्यामुळे देशामध्ये भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरूद्ध एक मोठी लढाई आम्ही लढली आहे. कोट्यवधी रूपये कमावून सरकारच्या खात्यामध्ये कर न भरणारे लोक, बेनामी संपत्ती निर्माण करणारे लोक, बनावट कंपन्या निर्माण करणारे लोक, काळ्या पैशांची देव-घेव करणारे लोक, मोठ-मोठाले मासे आता सरकारच्या चैाकशीच्या जाळ्यात आले आहेत.

गेल्या एक वर्षामध्ये सरकारने बनावट कंपन्यांवर केलेली कारवाई जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल. गेल्या एक वर्षात जवळपास साडे तीन लाख संदिग्ध कंपन्यांची नोंदणी सरकारने रद्द केली आहे. अशा बनावट कंपन्यांना टाळे लावण्याचं काम सरकारने केले आहे. साथींनो, माझ्या देशबांधवांनो, तुम्ही इतके परिश्रम करून, मेहनत करून जो पैसा भारतामध्ये पाठवता, त्याचा लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो. आता आपण परिश्रम करून जो काही पैसा घरी पाठवत असता, त्या पैशाचा विनियोग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. अशावेळी त्या पैशाची ताकद कित्येक पटीने वाढत असते. त्यामुळे आता आपला पैसा चांगल्या प्रकारे वापरला जातोय, हे लक्षात आल्यानंतर आपल्यालाही नक्कीच आनंद वाटेल. एकप्रकारचे समाधान वाटेल.

प्रामाणिकपणे केलेल्या कमाईचा विनियोगही जर प्रामाणिकपणाने होत असेल तर त्याचा खूप चांगला आणि मोठा सकारात्मक परिणाम होत असतो. आणि आम्ही अशाच पद्धतीने, प्रामाणिकपणाने पुढे जाण्याचा संकल्प केला आहे.
साथींनो, आपल्याला इथं काही काही वेळेस कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याची आम्हालाही पुरेशी कल्पना आहे. आपल्या पुढे येत असलेल्या संकटांविषयी आम्ही ओमान सरकारबरोबर वारंवार चर्चा करीत असतो. त्याचबरोबर आपल्याला जाणवत असलेल्या सर्व समस्या शक्य तितक्या लवकर संपुष्टात याव्यात, यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. ई-मायग्रेशन कार्यप्रणाली आणि ‘मदत पोर्टल’ यांच्या माध्यमातून आपल्या समस्या कमी करण्याचे काम करण्यात आले आहे.

सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नांमुळे एक चांगला परिणाम दिसून आला आहे तो म्हणजे, परदेशामध्ये वास्तव्य करत असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. त्यांना आता विश्वास वाटतो की, समजा एखादे संकट आले आणि ते दुर्दैवाने त्यामध्ये सापडले तर आपल्या देशाचे सरकार आपल्याला काहीही झाले तरी मायदेशी नक्की पोहोचते करू शकते. परदेशात वास्तव्य करीत असलेल्या सर्व परिवारांच्या दृष्टीने भारत सरकार म्हणजे त्‍यांच्‍या परिवाराचा एक ‘मानद’ सदस्य बनले आहे.

साथींनो, ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोनच संपूर्ण जगाच्या विचारधारेमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची केलेली घोषणा, त्याच बरोबर भारताने पुढाकार घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची झालेली स्थापना, अशी काही उदाहरणे भारताच्या वाढत्या प्रभावाची म्हणून देता येतील. या उदाहरणांवरून भारताची संपूर्ण जगामध्ये वाढत असलेली प्रतिष्ठा आणि पत यावरून सहजपणाने जाणवू शकते.

आपण देत असलेल्या समर्थनामुळे आणि आपल्या अनुभवामुळे देशाला चांगला लाभ होतो, त्यासाठी संपूर्ण राष्ट्र आपले ऋणी आहे. मी आपल्या सर्वांना देशाच्या विकासामध्ये, राष्ट्राच्या निर्माणामध्ये एक महत्वपूर्ण भागीदार मानतो. देशाच्या विकासाचे आपण सहभागीदार आहात,असे मला वाटते. नव भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण काही संकल्प केला तर, त्याचा प्रभाव भारतामध्येही दिसून येणार आहे, असा माझा विश्वास आहे. आपण सर्व जण माझे बंधू, भगिनी आहात, आणि आपल्याला भेटण्याचा योग आला, अशी संधी मिळाली, हे मी माझे चांगले भाग्य मानतो. आपल्याला चांगले आरोग्य लाभावे, आपण सकुशल, स्वस्थ रहावे, अशी भावना व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. आपल्याला माझ्या खूप-खूप शुभेच्छा.

माझ्या बरोबर संपूर्ण ताकदीनिशी बोला, ‘भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय’
वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”