सन्माननीय महोदय
डेन्मार्कचे पंतप्रधान,
शिष्टमंडळातील सदस्य,
प्रसार माध्यमातील मित्रहो,
शुभ संध्याकाळ आणि नमस्कार!
सन्माननीय पंतप्रधान महोदय, माझे आणि, आमच्या शिष्टमंडळाचे डेन्मार्कमध्ये शानदार स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल
आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.
मित्रांनो,
ऑक्टोबर 2020 मध्ये भारत...डेन्मार्क आभासी शिखर परिषदेमध्ये आम्ही आपल्या संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला होता. आमच्या आजच्या चर्चेच्या वेळी आम्ही आपल्या हरित धोरणात्मक भागीदारीच्या संयुक्त कार्य आराखड्याची समीक्षा केली.
मला आनंद आहे की, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, विशेष करून नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, बंदरे, जहाजबांधणी, चक्राकार अर्थव्यवस्था, तसेच जल व्यवस्थापन यामध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली आहे.200 पेक्षा जास्त डॅनिश कंपन्या भारतामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पवन ऊर्जा, शिपिंग, कन्सलटन्सी, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना भारताच्या वाढत्या व्यवसाय सुलभीकरण आणि आमच्या व्यापक आर्थिक सुधारणांचा लाभ मिळत आहे. भारताच्या पायाभूत क्षेत्रामध्ये आणि हरित उद्योगांमध्ये डॅनिश कंपन्या आणि डॅनिश पेन्शन फंडासाठी गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत.
आज आम्ही भारत- युरोपियन महासंघ संबंध, इंडो- पॅसिफिक आणि यूक्रेनसहित अनेक प्रादेशिक तसेच जागतिक मुद्यांवरही चर्चा केली. आम्हाला आशा आहे की,
भारत- युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी शक्य तितक्या लवकर पूर्ण होतील. आम्ही एक मुक्त, खुल्या, समावेशक,आणि नियमाधिष्ठीत भारत-प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे. आम्ही यूक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करून या समस्येवर चर्चेव्दारे तोडगा आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.आम्ही हवामान क्षेत्रामध्ये आपल्याकडून सहकार्य मिळण्याबाबतही चर्चा केली. भारत ग्लासगो सीओपी- 26 मध्ये केलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठीही कटिबध्द आहे. आम्ही आर्क्टिक क्षेत्रामध्ये सहकार्याच्या अधिक संधींचा शोध घेण्याविषयी सहमत झालो आहोत.
महोदय,
मला विश्वास आहे की, आपल्या नेतृत्वाखाली भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संबंध नव्या शिखरावर जातील.उद्या होणाऱ्या दुसऱ्या इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेचे यजमानपद भूषवित असल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आज भारतीय समुदाय कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दलही, कारण आपण तिथे येण्यासाठी खास वेळ काढला, भारतीय समुदायाविषयी आपल्याला असलेल्या प्रेमाचे हे प्रतीक आहे, त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो.
आभारी आहे!