महामहिम,
पंतप्रधान शेख हसीना,
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा,
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी,
आणि आसामचे रहिवासी असलेले भारत सरकारमधील मंत्री श्री रामेश्वर तेली,
बांगलादेश सरकारमधील माननीय मंत्री,
आमच्याशी जोडले गेलेले इतर सर्वजण,
नमस्कार!
आज भारत-बांगलादेश संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइन ज्याची पायाभरणी आम्ही सप्टेंबर 2018 मध्ये केली होती. आज पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत या पाइपलाइनचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे याचा मला आनंद आहे.
कोविड 19 महामारीच्या काळातही या प्रकल्पाचे काम सुरूच राहिले ही देखील समाधानाची बाब आहे. या पाइपलाइनद्वारे 1 दशलक्ष मेट्रिक टन हाय स्पीड डिझेलचा पुरवठा उत्तर बांगलादेशातील विविध जिल्ह्यांना केला जाऊ शकतो. पाइपलाइनद्वारे पुरवठ्यामुळे खर्च तर कमी होईलच शिवाय या पुरवठ्याचा कार्बन उत्सर्जनही कमी होईल. हा विश्वासार्ह आणि किफायतशीर डिझेल पुरवठा विशेषत्वाने कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल. या पुरवठ्याचा फायदा स्थानिक उद्योगांनाही होणार आहे.
आजच्या जागतिक परिस्थितीत अनेक विकसनशील अर्थव्यवस्था त्यांच्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संघर्ष करित आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या उद्घाटन समारंभाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान शेख हसीना यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बांगलादेशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आणि, प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे. आणि बांगलादेशाच्या विकासाच्या प्रवासात आम्ही योगदान देऊ शकलो याचा देखील आम्हाला आनंद आहे. मला खात्री आहे की ही पाइपलाइन बांगलादेशच्या विकासाला आणखी गती देईल आणि दोन्ही देशांमधील संपर्क सुविधा वाढवण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण देखील ठरेल. आपण आपल्या संपर्क सुविधेचा प्रत्येक स्तंभ मजबूत करत राहणे आवश्यक आहे. परिवहन क्षेत्र असो, ऊर्जा क्षेत्र असो, विजेचे क्षेत्र असो किंवा डिजिटल क्षेत्र असो, आपला संपर्क जितका वाढेल, तितके जनतेतील परस्पर संबंध आणखी दृढ होतील.
मला आठवते, काही वर्षांपूर्वी पंतप्रधान शेख हसीना यांनी 1965 पूर्वीची रेल्वेची संपर्क सुविधा पुन्हा सुरु करण्याबाबतचा त्यांच्या दृष्टीकोन स्पष्ट केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांनी या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. याचाच परिणाम म्हणून कोविड 19 महामारी दरम्यान आम्ही त्या रेल्वेमार्गाद्वारे बांगलादेशाला ऑक्सिजन पाठवू शकलो. त्यांच्या या दूरदृष्टीबद्दल मी पंतप्रधान शेख हसीना जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो.
मित्रांनो,
विद्युत क्षेत्रात आमचे परस्पर सहकार्य खूप यशस्वी ठरले आहे. आज भारत बांगलादेशला 1100 मेगा वॅटपेक्षा जास्त वीज पुरवत आहे. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटचे पहिले युनिटही कार्यान्वित झाले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी गेल्या वर्षी आपल्या भारत भेटीदरम्यान याचे उद्घाटन केले होते. आणि आता आम्ही लवकरच दुसरे युनिट सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहोत.
ऊर्जा सहकार्याचा विचार केला तर, आपल्या पेट्रोलियम व्यापाराने 1 अब्ज डॉलरचा आकडा पार केला आहे. हायड्रोकार्बन्सच्या संपूर्ण मूल्य साखळीत आपले सहकार्य आहे ही अभिमानास्पद बाब आहे. मग ते अप-स्ट्रीम असो वा मिड-स्ट्रीम किंवा डाउन-स्ट्रीम असो. या पाइपलाइनमुळे हे सहकार्य अधिक व्यापक होणार आहे.
मी या प्रकल्पाशी निगडित सर्व अधिकार्यांचे विशेषत: नुमालीगड रिफायनरी आणि बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचे अभिनंदन करू इच्छितो.
महामहिम,
बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंतीच्या एका दिवसानंतर आज हा उद्घाटनाचा समारंभ होत आहे हा किती शुभ योगायोग आहे! बंगबंधूंच्या 'शोनार बांग्ला' दृष्टिकोनामध्ये संपूर्ण प्रदेशाचा सुसंवादी विकास आणि समृद्धी समाविष्ट होती. हा संयुक्त प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे.
महामहिम,
भारत-बांगलादेशच्या सहकार्याच्या प्रत्येक पैलूमध्ये तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. हा प्रकल्प देखील त्यापैकीच एक आहे. मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या प्रकल्पाचा लाभ होणार्या सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद!