महोदय,
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी) तिसऱ्या शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! पंतप्रधान जेम्स मरापे माझ्यासोबत या शिखर परिषदेचे सह- यजमानपद भूषवत आहेत, याचा मला आनंद आहे. पोर्ट मोरेस्बी येथे शिखर परिषदेसाठी केलेल्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो.
महोदय,
यावेळी आपण खूप दिवसांनी भेटत आहोत. या मधल्या काळात , जग कोविड महामारी आणि इतर अनेक आव्हानांच्या कठीण काळातून गेले आहे.या आव्हानांचा प्रभाव ग्लोबल साउथमधील देशांना सर्वाधिक जाणवला आहे.
हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उपासमारी , गरिबी आणि आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने आधीपासूनच होती. आता नवीन समस्यां निर्माण होत आहेत. अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत आहेत.
ज्यांना आपण आपले विश्वासू मानत होतो, ते गरजेच्या वेळी आपल्या पाठीशी उभे राहिले नसल्याचे दिसून आले. या आव्हानात्मक काळात, एक जुनी म्हण खरी ठरली आहे: ''जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र''
या आव्हानात्मक काळात भारत आपल्या प्रशांत द्वीपसमूहातील मित्रांसोबत उभा राहिला याचा मला आनंद आहे.. भारतात निर्मित लस असो वा जीवनावश्यक औषधे, गहू असो वा साखर; भारत आपल्या क्षमतेनुसार सर्व सहकारी देशांना मदत करत राहिला. .
महोदय,
मी आधी म्हटल्याप्रमाणे, माझ्यासाठी तुम्ही लहान द्वीपसमूहांची राष्ट्रे नसून महासागरातील मोठे देश आहात.हा विशाल महासागरच भारताला तुम्हा सर्वांशी जोडतो. भारतीय तत्त्वज्ञानाने जगाकडे नेहमीच एक कुटुंब म्हणून पाहिले आहे.
आमच्या यावर्षीच्या जी 20 अध्यक्षपदाची संकल्पना 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' देखील याच विचारधारेवर आधारित आहे.
या वर्षी, जानेवारीमध्ये, आम्ही व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तुमच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आणि त्यांचे विचार मांडले.त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. जी 20 मंचाद्वारे ग्लोबल साउथच्या समस्या , अपेक्षा आणि आकांक्षाकडे जगाचे लक्ष वेधून घेणे ही भारत आपली जबाबदारी मानतो.
महोदय,
गेल्या दोन दिवसांत, जी -7 आउटरीच परिषदेतही माझा हाच प्रयत्न होता. महामहिम मार्क ब्राउन, जे तिथे प्रशांत द्वीपसमूह मंचाचे प्रतिनिधीत्व करत होते, ते याचे साक्षीदार आहेत.
महोदय,
हवामान बदलाच्या मुद्द्यावर भारताने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि त्या दिशेने आम्ही वेगाने काम करत आहोत याचा मला आनंद आहे.
गेल्या वर्षी, मी संयुक्त राष्ट्र महासचिवांसोबत सोबत लाइफ - पर्यावरणस्नेही जीवनशैली हे अभियान सुरू केले. मला वाटते की, तुम्हीही या चळवळीत सहभागी व्हावे .
भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी यांसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मला माहीत आहे की तुमच्यापैकी बरेच देश सौर आघाडीमध्ये सहभागी आहेत. मला विश्वास आहे की, तुम्हाला आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी असलेल्या आघाडीचे उपक्रम देखील उपयुक्त वाटतील. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो .
महोदय,
आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत असताना आम्ही पोषण व पर्यावरण सुरक्षेवरही भर देत आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ घोषित केले आहे. भारतात आम्ही या सुपरफूड धान्याला ‘श्रीअन्न’ असा विशेष दर्जा दिला आहे.
या धान्यपिकाला वाढीसाठी तुलनेने कमी सिंचनाची गरज लागते, परंतु पोषणमूल्ये मात्र भरपूर असते . तुमच्या देशांमध्येदेखील शाश्वत अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही भरडधान्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील.
महोदय,
भारत तुमच्या प्राथमिकतांचा सन्मान राखतो. तुमच्या विकासातील भागीदार म्हणून आमच्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून सहाय्य असो अथवा तुमचा विकास असो, भारत नेहमीच तुमचा विश्वासार्ह भागीदार राहील. आमचा दृष्टिकोन मानवतेच्या मूल्यांवर आधारलेला आहे.
पलाऊ मधील कन्व्हेंशन सेंटर असो , नाऊरू मधील कचरा व्यवस्थापन प्रकल्प, फिजी मधील चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप असो, अथवा किरिबास मधील सौर दीप प्रकल्प असो, या सर्वांच्या मागे हीच भावना आहे.
आमचे अनुभव व क्षमता तुमच्यासोबत सामायिक करण्यास आम्ही खुल्या दिलाने तयार आहोत.
डिजिटल तंत्रज्ञान असो, कि अंतराळ विज्ञान, आरोग्य सुरक्षा असो कि अन्न सुरक्षा, हवामान बदल असो कि पर्यावरण संरक्षण, आम्ही सर्व क्षेत्रात तुमच्या मदतीला तत्पर आहोत.
महोदय,
बहुपक्षीयतेला तुमच्याप्रमाणेच आम्हीही मान्य करतो. स्वतंत्र , मुक्त व सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राचा आम्ही पुरस्कार करतो. सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा व एकात्मतेचा आम्ही सन्मान करतो.
संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सुरक्षा परिषदेत दक्षिणी देशांचा आवाज जोरकसपणे ध्वनित झाला पाहिजे . त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांचे पुनरुज्जीवन करणे हि आपली सामायिक प्राथमिकता असली पाहिजे.
क्वाड परिषदेचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलिया, अमेरिका व जपान या देशांशी हिरोशिमा इथे माझी चर्चा झाली. या चर्चेत हिंद प्रशांत क्षेत्रावर विशेष भर दिला गेला. या क्वाड बैठकांमध्ये आम्ही पलाऊ मध्ये रेडिओ ऍक्सेस नेटवर्क (RAN) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. प्रशांत महासागरातील द्वीप देशांशी बहुपातळ्यांवर भागीदारीला अधिक प्रोत्साहन देण्यात येईल.
महोदय,
फिजी येथील दक्षिण प्रशांत विद्यापीठात शाश्वत किनारपट्टी व सागरी संशोधन संस्थेची ( SCORI ) स्थापना झाल्याचे ऐकून मला आनंद झाला आहे. शाश्वत विकासातील भारताच्या अनुभवांना प्रशांत द्वीपसमूह देशांच्या ध्येयधोरणाशी जोडण्याचे काम या संस्थेत केले जाईल.
संशोधन व विकासाबरोबरच हवामान बदलामुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांची दखल घेणे सध्या आवश्यक आहे. १४ देशांमधील नागरिकांच्या कल्याण व प्रगतीसाठी SCORI या संस्थेत मोठे कार्य होत आहे याचा मला आनंद वाटतो.
राष्ट्रीय व मानव कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानावर आधारित संकेतस्थळाचा प्रारंभ होत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. तुमच्या देशासंबंधातील रिमोट सेन्सिंग डेटा भारतीय उपग्रहांच्या नेटवर्कद्वारे तुम्ही डाउनलोड करून त्याचा उपयोग तुमच्या देशाच्या विकास योजनांसाठी करू शकाल.
महोदय,
आता मी तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आज या शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार.