नमो बुद्धाय !
नेपाळचे पंतप्रधान आदरणीय श्री शेर बहादूर देउबा जी,
आदरणीय आरझू देउबा जी,
बैठकीला उपस्थित नेपाळ सरकारचे मंत्री,
मोठ्या संख्येने उपस्थित बौद्ध भिक्खू व बौद्ध बांधव,
विविध देशांतील मान्यवर,
महिला आणि सज्जनहो,
बुद्ध जयंतीच्या पवित्र प्रसंगी, लुंबिनीच्या पवित्र भूमीतून येथे उपस्थित असलेल्या सर्वांना, सर्व नेपाळींना आणि जगभरातील सर्व भक्तांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.
मित्रांनो,
पशुपतिनाथजी, मुक्तिनाथ जी, जनकपूरधाम असो किंवा लुंबिनी असो, मी जेव्हा जेव्हा नेपाळमध्ये येतो, तेव्हा नेपाळ मला आपल्या अध्यात्मिक आशीर्वादाने उपकृत करतो.
मित्रांनो,
जनकपूरमध्ये मी म्हणालो होतो की "आमचा राम देखील नेपाळशिवाय अपूर्ण आहे". मला माहित आहे की आज भारतात भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे, त्याचा नेपाळच्या लोकांनाही तितकाच आनंद होत आहे.
मित्रांनो,
नेपाळ म्हणजे, जगातील सर्वात उंच पर्वताचा देश-सागरमाथा!
नेपाळ म्हणजे, जगातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि मठांचा देश!
नेपाळ म्हणजे जगातील प्राचीन सभ्यता संस्कृतीचे जतन करणारा देश!
नेपाळमध्ये आल्यावर मला इतर कोणत्याही राजकीय भेटीपेक्षा वेगळा अध्यात्मिक अनुभव येतो.
हजारो वर्षांपासून भारत आणि भारतीय जनतेने नेपाळकडे या दृष्टीने आणि विश्वासाने पाहिले आहे. मला विश्वास आहे, काही दिवसांपूर्वी शेर बहादूर देउबा जी आणि आरजू देउबा भारतात आले होते, तेव्हा त्यांनी काशी विश्वनाथ धाम, बनारसला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी वर्णन केले होते, त्यांच्या मनात भारताबद्दल अशीच भावना असणे अत्यंत स्वाभाविक आहे.
मित्रांनो,
हा समान वारसा, समान संस्कृती, समान श्रद्धा आणि समान प्रेम, हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि, ही संपत्ती जितकी अधिक समृद्ध असेल तितक्या प्रभावीपणे आपण एकत्रितपणे भगवान बुद्धांचा संदेश जगासमोर आणू शकतो आणि जगाला दिशा देऊ शकतो. आज ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण होत आहे, त्यात भारत आणि नेपाळ यांच्यातील सदैव दृढ होत जाणारी मैत्री आणि आपली जवळीक संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची ठरेल. आणि यामध्ये, भगवान बुद्धांप्रति आपल्या दोन्ही देशांचा विश्वास, त्यांच्याबद्दलची अमर्याद श्रद्धा, आपल्याला एका धाग्यात जोडते आणि आपल्याला एका कुटुंबाचे सदस्य बनवते.
बंधू आणि भगिनिंनो,
बुद्ध हा मानवतेच्या सामूहिक भावनेचा अवतार आहे. बुद्ध धारणा आहेत, तसेच बुद्ध संशोधने आहेत. बुद्ध विचार आहेत, तसेच बुद्ध संस्कार आहेत. बुद्ध विशेष आहेत कारण त्यांनी केवळ उपदेशच केला नाही तर त्यांनी मानवतेला ज्ञानाची अनुभूती दिली. त्यांनी महान वैभवशाली राज्य आणि सुखसोयींचा त्याग करण्याचे धाडस केले. नक्कीच, ते सामान्य मूल म्हणून जन्माला आले नव्हते. प्राप्तीपेक्षा त्याग महत्त्वाचा आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. परित्यागातूनच साक्षात्कार पूर्ण होतो. म्हणूनच त्यांनी जंगलात भटकंती केली, तपश्चर्या केली, संशोधन केले. अंतर्मुख झाल्यानंतर जेव्हा ते ज्ञानाच्या शिखरावर पोहोचले तेव्हा त्यांनी लोककल्याणासाठी कुठलाही चमत्कार केल्याचा दावा केला नाही. उलट, भगवान बुद्धांनी आपल्याला तो मार्ग दाखवला, जो ते स्वतः जगले होते. त्यांनी आम्हाला मंत्र दिला- "आप दिपो भव भिक्खवे" "परीक्षे भिक्षावो, ग्रह्यं मद्दछो, न तू गौरवत." म्हणजे तुम्हीच स्वतःचा दिवा बना. माझ्याबद्दलच्या आदरापोटी माझे शब्द स्वीकारू नका, तर त्यांची कसोटी पाहा आणि मगच आत्मसात करा.
मित्रांनो,
भगवान बुद्धांशी संबंधित आणखी एक विषय आहे, ज्याचा आज मी नक्की उल्लेख करू इच्छितो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी इथे सिद्धार्थच्या रूपाने बुद्धांचा जन्म झाला. याच दिवशी बोधगया इथे त्यांना आत्मज्ञान झालं आणि ते भगवान बुद्ध झाले. आणि याच दिवशी कुशीनगरमध्ये त्यांचे महापारीनिर्वाण झाले. एकाच तिथी, एकाच वैशाख पोर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवन यात्रेत हे टप्पे केवळ योगायोग नव्हते. यात बुद्धत्वाचा तो तत्त्वज्ञानाचा संदेश देखील आहे, ज्यात जीवन, ज्ञान आणि निर्वाण तिनही एकत्र आहेत. तिनही आपापसात जोडले गेले आहेत. हेच आयुष्याचे पूर्णत्व आहे, आणि कदाचित, यामुळेच भगवान बुद्धाने पौर्णिमेची ही पवित्र तिथी निवडली असेल. जेव्हा आपण माणसाचे आयुष्य या पूर्णत्वात बघायला शिकतो, तेव्हा विभाजन आणि भेदभाव याला काहीच जागा उरत नाही. तेव्हा आपण स्वतःच ‘वसुधैव कुटुंबकम्’ च्या त्या भावनेने जगायला लागतो, ज्याची ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ पासून तर ‘भवतु सब्ब मंगलम्’ या बुद्ध उपदेशात देखील दिसते. म्हणूनच भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन बुद्ध प्रत्येकाचे आहेत, प्रत्येकासाठी आहेत.
मित्रांनो,
भगवान बुद्धांशी माझा आणखी एक संबंध देखील आहे, ज्यात अद्भुत योगायोग देखील आहे आणि जो अतिशय सुखद देखील आहे. ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, गुजरातचे वडनगर, तिथे शतकांपूर्वी बौद्ध शिक्षणाचे एक फार मोठे केंद्र होते. आज देखील तिथे प्राचीन अवशेष निघत आहेत, ज्यांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. आणि आपल्याला माहित आहेच, की हिंदुस्तानात अशी अनेक शहरे आहेत, अनेक शहरे, अनेक अशी स्थळं आहेत, जी त्या ठिकाणचे लोक त्यांना त्यांच्या राज्याची काशी म्हणून ओळखतात. भारताचे हे वैशिष्ट्य आहे, आणि म्हणूनच काशीजवळ सारनाथबद्दल माझ्या मनात असलेली आस्था तुम्हाला माहित आहे. भारतात सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर पासून नेपाळच्या लुंबिनीपर्यंत, ही पवित्र स्थळं आपला सामायिक वारसा आणि सामायिक तत्वांचे प्रतीक आहेत.
आपल्याला हा वारसा सर्वांनी मिळून विकसित करायचा आहे, येणाऱ्या काळात समृद्ध देखील करायचा आहे. आताच आम्ही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी इथे बौद्ध संस्कृती आणि वारसा यासाठीचे भारत आंतरराष्ट्रीय केंद्राची पायाभरणी देखील केली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय बौध्द महासंघ हे केंद्र बांधणार आहे. आमच्या सहकार्याने अनेक दशकांपूर्वी बघितलेलं हे स्वप्न पूर्ण करण्यात पंतप्रधान देऊबाजी यांची महत्वाची भूमिका आहे. लुंबिनी विकास न्यासाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाला यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता हा प्रकल्प पूर्ण करण्यात देखील ते पूर्ण मदत करत आहेत. यासाठी आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो. मला आनंद आहे, की नेपाळ सरकार बुद्ध सर्किट आणि लुंबिनीच्या विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत, विकासाच्या सर्व संधी प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. नेपाळमध्ये उभारण्यात आलेले लुंबिनी संग्रहालय देखील दोन्ही देशांतील सहकार्याचे, भागीदारीचे उदाहरण आहे. आणि आज आम्ही लुंबिनी बौद्ध विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याच्या देखील निर्णय घेतला आहे.
मित्रांनो,
भारत आणि नेपाळच्या अनेक तीर्थक्षेत्रांनी शतकानुशतके संस्कृती आणि ज्ञानाच्या विशाल परंपरेला गती दिली आहे. आज देखील जगभरातून लाखो भक्त या तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात. येणाऱ्या काळात आपल्याला या प्रयत्नांना अधिक गती द्यावी लागेल. आमच्या सरकारांनी भैरहवा आणि सोनौली इथं एकात्मिक तपासणी नाका उभारण्याचा देखील निर्णय घेतला आहे. याचं काम सुरु झालं आहे. हा नाका तयार झाल्यानंतर सीमेवरुन लोकांचे येणेजाणे अधिक सुलभ होईल. भारतात येणारे परदेशी पर्यटक अधिक सुलभतेने नेपाळला येऊ शकतील. सोबतच, यामुळे व्यापार आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीला देखील गती मिळेल. भारत आणि नेपाळ, दोन्ही देशांना एकत्र काम करण्याच्या अशा अनेक संधी आहेत. आमच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मदत मिळेल.
मित्रांनो,
भारत आणि नेपाळचे संबंध पर्वताप्रमाणे मजबूत आहेत, आणि त्या पर्वताइतकेच जुने आहेत.
आपल्याला आपले नैसर्गिक आणि स्वाभाविक संबध हिमालयाच्या उंचीवर देखील न्यायचे आहेत. खान-पान, गीत- संगीत, सणवार, आणि रिती रिवाजांपासून तर कौटुंबिक संबंधांपर्यंत जे आपले संबंध हजारो वर्ष आपण जपले आहेत, आता त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यासारख्या नव्या क्षेत्रांत देखील न्यायचे आहेत. मला समाधान आहे, की या दिशेनं भारत, नेपाळच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आहे. लुंबिनी बौद्ध विद्यापीठ, काठमांडू विद्यापीठ आणि त्रिभुवन विद्यापीठ यात भारताचं सहकार्य आणि प्रयत्न, याची मोठी उदाहरणं आहेत. मी या क्षेत्रात आपले परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आणखी अनेक मोठ्या संधी बघू शकतो आहे. आपण या शक्यता आणि भारत नेपाळची स्वप्ने, एकत्र काम करून साकार करू. आपली सक्षम तरुण पिढी सफलतेची शिखरं पादाक्रांत करत संपूर्ण जगात बुद्धाच्या शिकवणीची संदेशवाहक बनेल.
मित्रांनो,
भगवान बुद्ध म्हणतात सुप्पबुद्धं पबुज्झन्ति, सुप्पबुद्धं पबुज्झन्ति, सदा गोतम-सावका। येसं दिवा च रत्तो च, भावनाये रतो मनो॥ याचा अर्थ असा की, जे नेहमी मैत्रीची भावना जोपासतात, सद्भावना जोपासतात, गौतमाचे ते अनुयायी नेहमीच जागृत असतात. म्हणजे तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात. याच भावनेंतून आज आपल्याला संपूर्ण मानवतेसाठी काम करायचे आहे. याच भावनेतून आपल्याला जगात मैत्रीची भावना मजबूत करायची आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की भारत - नेपाळ मैत्री भविष्यात देखील हा मानवतावादी संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत राहतील.
याच भावनेसह, आपणा सर्वांना पुन्हा एकदा वैशाख पौर्णिमेच्या अनेक अनेक शुभेच्छा.
नमो बुद्धाय!
नमो बुद्धाय!
नमो बुद्धाय!