महामहिम,
आदरणीय महोदय,
तुम्हा सर्वांचे मौल्यवान विचार आणि सूचनांबद्दल आभार मानतो. भारत आणि आसियान यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. मानवाचे कल्याण, प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू, असा मला विश्वास आहे.
आपण केवळ भौतिक संपर्कच नव्हे, तर आर्थिक, डिजिटल, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पावले उचलत राहू.
मित्रहो,
"कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता वाढवणे", या यंदाच्या संकल्पनेच्या संदर्भात मला काही विचार मांडायचे आहेत.
आज वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दहावा दिवस आहे, त्यामुळे मला आपल्याला दहा सूचना द्यायच्या आहेत.
पहिली, आपल्या प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण 2025 हे वर्ष "आसियान-भारत पर्यटन वर्ष" म्हणून साजरे करू शकतो. या उपक्रमासाठी भारत 5 दशलक्ष डॉलर्स इतका निधी पुरवेल.
दुसरे, भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या दशक पूर्ति निमित्त, आपण भारत आणि आसियान देशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करता येतील. या महोत्सवाचा भाग म्हणून, आपले कलाकार, तरुण, उद्योजक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडून, आपण संगीत महोत्सव, युवा महोत्सव, हॅकेथॉन आणि स्टार्ट-अप महोत्सव यासारख्या उपक्रमांचा त्यात समावेश करू शकतो.
तिसरे, "भारत-आसियान विज्ञान आणि तंत्रज्ञान निधी" अंतर्गत, महिला वैज्ञानिकांची वार्षिक परिषद आयोजित करता येईल.
चौथे, नवनिर्मित नालंदा विद्यापीठातील आसियान देशांमधील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिष्यवृत्तीची संख्या दुपटीने वाढवली जाईल. याव्यतिरिक्त, भारतातील कृषी विद्यापीठांमध्ये आसियान विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना देखील या वर्षापासून सुरू केली जाईल.
पाचवे, "आसियान-भारत वस्तू व्यापार करार" चा आढावा 2025 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यामुळे आपले आर्थिक संबंध मजबूत होतील आणि सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यात मदत होईल.
सहावे, आपत्ती प्रतिरोधकतेसाठी, "आसियान - भारत निधी" मधून 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उपलब्ध केले जातील. भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आसियान मानवतावादी सहाय्य केंद्र या क्षेत्रात एकत्र काम करू शकतात.
सातवे, आरोग्याच्या क्षेत्रात लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी, आसियान-भारत आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचे नियोजन केले जाऊ शकते. शिवाय, आम्ही भारताच्या वार्षिक राष्ट्रीय कर्करोग ग्रिड ‘विश्वम परिषदे’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक आसियान देशातील दोन तज्ञांना आमंत्रित करतो.
आठवे, डिजिटल आणि सायबर लवचिकतेसाठी, भारत आणि आसियान यांच्यातील सायबर धोरण संवाद स्थापन केला जाऊ शकतो.
नववे, हरित भविष्याला चालना देण्यासाठी, मी भारत आणि आसियान देशांतील तज्ञांचा समावेश असलेल्या ग्रीन हायड्रोजनवर कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडतो.
आणि दहावे, हवामान संबंधी लवचिकतेसाठी, मी तुम्हा सर्वांना आमच्या "एक पेड माँ के नाम" या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो,
मला विश्वास आहे की माझ्या दहा कल्पनांना तुमचा पाठिंबा मिळेल आणि आपली टीम त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करेल.
खूप खूप धन्यवाद.