माझ्या प्रिय मित्रांनो,
140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.
आज संपूर्ण देशाच्या वतीने मी आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचे, ट्रेनर्सचे आणि कोच यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो.या क्रीडा पथकातल्या प्रत्येक व्यक्तीचे, सहाय्यक कर्मचारी,फिजिओ,अधिकारी वर्ग अशा सर्वांची खूप-खूप प्रशंसा करतो,कौतुक करतो आणि विशेषकरून आपणा सर्वांच्या माता-पित्यांना वंदन करतो.कारण सुरवात घरापासून होते, करिअरच्या अनेक रस्त्यांना, मुले जेव्हा हा मार्ग निवडतात तेव्हा सुरवातीला खूपच विरोध होतो, की वेळ वाया घालवू नका, अभ्यास करा. हे करू नका, ते करू नका.कधी दुखापत झाली तर आईचे म्हणणे असते आता जायचे नाही.म्हणूनच आपणा सर्वांचे माता-पिता वंदनीय ठरतात.आपण सर्वांसमोर येता, मात्र पडद्यामागचे जे लोक असतात ते कधी पडद्यावर येत नाहीत मात्र प्रशिक्षणापासून ते पोडीयम पर्यंतचा हा प्रवास त्यांच्या वाचून शक्यच नसतो.
मित्रांनो,
आपण सर्वांनी इतिहास घडवला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धांमधली आकडेवारी भारताच्या यशाचे द्योतक आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेतली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहोत याचा वैयक्तिकरित्या मला आनंद आहे. लसीच्या दिशेने आपण काम करत होतो तेव्हा यश मिळेल की नाही याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आपल्याला यात यश मिळाले, देशवासीयांचे आयुष्य वाचले आणि जगभरातल्या 150 देशांना मदत केली तेव्हा आपली वाटचाल योग्य दिशेने असल्याची मला खात्री पटली.आज आपण यश प्राप्त करून आला आहात तेव्हा आता आपली दिशा योग्य असल्याचे मला जाणवत आहे.
विदेशी भूमीवर भारताने यावेळी अॅथलेटीक्समध्ये सर्वात जास्त पदकांची कमाई केली आहे. नेमबाजीत आतापर्यंतची सर्वाधिक पदके,तिरंदाजीमध्ये सर्वाधिक पदके, स्क्वॅशमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके, रोइंग मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके, महिला मुष्टीयुद्धात सर्वाधिक पदके,महिला क्रिकेट मध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक पुरुष क्रिकेट मध्ये प्रथम सुवर्ण पदक, स्क्वॅश मिश्र दुहेरीत पहिल्यांदा सुवर्णपदक तुम्ही सुवर्णपदकांची माळच लावली.आपण पहा ना महिला गोळाफेकीत बहात्तर वर्षांनी, 4X4 100 मीटर रिलेमध्ये एकसष्ट वर्षांनी, अश्वारोहणात एकेचाळीस वर्षांनी आणि पुरुष बॅडमिंटनमध्ये चाळीस वर्षांनी आपल्याला पदक मिळाले आहे. म्हणजे चार-चार,पाच-पाच, सहा-सहा दशके पदकांची बातमी ऐकण्यासाठी आपण आसुसले होतो.आपण त्याची पूर्तता केलीत. आपण आपल्या कामगिरीने कित्येक वर्षांची प्रतीक्षा समाप्त केली आहे.
मित्रांनो,
या वेळची आणखी एक उल्लेखनीय बाब मी सांगू इच्छितो.आपण ज्या-ज्या खेळांमध्ये भाग घेतला, त्यापैकी बऱ्याच म्हणजे जवळ-जवळ प्रत्येकात आपल्याला कोणते ना कोणते पदक मिळाले आहे. आपले हे विस्तारत चाललेले पटल, भारतासाठी शुभ संकेत आहे. 20 क्रीडा प्रकार तर असे आहेत ज्यामध्ये देशाला आतापर्यंत पोडीयमपर्यंत पोहोचताच आले नव्हते. अनेक क्रीडा प्रकारांमध्ये आपण केवळ खाते उघडले इतकेच नव्हे तर एक नवा मार्ग खुला केला आहे. एका असा मार्ग जो युवकांच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.एक असा मार्ग जो आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुढे जात ऑलिम्पिकच्या आपल्या प्रवासाला नवा विश्वास देईल.
मित्रांनो,
आपल्या स्त्री-शक्तीने या स्पर्धांमध्ये अत्युत्तम कामगिरी केली आहे याचा मला अभिमान आहे. ज्या विजिगिषु वृत्तीने आपल्या महिला क्रीडापटूंनी कामगिरी केली त्यातून भारताच्या कन्यांच्या सामर्थ्याची प्रचीती येते. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने जितकी पदके जिंकली आहेत त्यापैकी निम्मी पदके आपल्या महिला खेळाडूंनी कमावली आहेत. या ऐतिहासिक यशोगाथेचा प्रारंभ आपल्या महिला क्रिकेट संघानेच केला होता.
मुष्टीयुद्धात आपल्या कन्यांनी सर्वात जास्त पदके आणली आहेत. ट्रॅक आणि फील्ड मध्ये तर भारताच्या या कन्या सर्वांच्या पुढे जाण्याचा निश्चय करूनच उतरल्या आहेत असे दिसत होते. सर्वोच्च स्थानापेक्षा दुसऱ्या कशावरच समाधान मानायला भारताच्या या कन्या तयार नाहीत. हीच नव भारताची चैतन्याची भावना आहे. हेच नव भारताचे बळ आहे.नवा भारत,अंतिम निकाल होईपर्यंत,अंतिम विजयाची घोषणा होईपर्यंत आपला प्रयत्न सोडत नाही.आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा नव्या भारताचा प्रयत्न असतो.
माझ्या प्रिय खेळाडूंनो,
आपणा सर्वांना हे माहितच आहे की आपल्या देशात गुणवत्तेची कधीही कमतरता नव्हती. देशात जिंकण्याची दुर्दम्य इच्छा नेहमीच चालत आली आहे. आपल्या खेळाडूंनी यापूर्वीही खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. मात्र खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे पदक प्राप्तीच्या बाबतीत आपण मागे पडत असतो. म्हणूनच 2014 नंतर, आपल्या क्रीडा परिसंस्थेला आधुनिक बनवण्यासाठी, आपल्या क्रीडापरिसंस्थेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी भारत झटत आहे. आपला हा प्रयत्न आहे की भारतातील खेळाडूंना जगातल्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण सुविधा मिळाव्यात. भारताचा हा प्रयत्न आहे, भारतीय खेळाडूंना देश आणि परदेशात खेळण्याच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात. आपला हा प्रयत्न आहे, भारतीय खेळाडूंची निवड प्रक्रिया पारदर्शक असावी, खेळाडू निवडताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. आपला हा प्रयत्न आहे, गाव खेड्यात राहणाऱ्या आपल्या गुणवान खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात. आपल्या सर्व खेळाडूंचे मनोबल सतत दृढ रहावे, त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी आपण आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहोत.
नऊ वर्षापूर्वीच्या तुलनेत खेळासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूदही तीन पटीने वाढवली आहे. आपल्या टॉप्स (TOPS)आणि खेलो इंडिया योजना, कलाटणी देणाऱ्या सिद्ध झाल्या आहेत आणि माझा तर गुजरातचा अनुभव आहे. गुजरातच्या लोकांना एकच खेळ माहिती आहे, पैशांचा! मात्र जेव्हा खेलो गुजरात सुरू केले, तेव्हा एक अशी क्रीडा संस्कृती हळूहळू तयार होऊ लागली आणि त्याच अनुभवातून माझ्या मनात असाही विचार आला आणि या अनुभवाच्या आधारावरच आम्ही खेलो इंडिया सुरू केले आणि खूप यशही मिळाले.
मित्रांनो,
या वेळच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमारे सव्वाशे क्रीडापटू असे आहेत जे खेलो इंडिया मोहिमेतून पुढे आले आहेत. यांपैकी 40 पेक्षा जास्त खेळाडूंनी पदकेही जिंकली आहेत. खेलो इंडियातून पुढे आलेल्या एवढ्या खेळाडूंना पदक मिळणे हेच दाखवून देते की खेलो इंडिया मोहीम योग्य दिशेने सुरू आहे आणि मी आपल्यालाही आग्रह करेन, आपण ज्या कुठल्या प्रदेशातून आहात, तेथील शाळा-महाविद्यालये, जिथे कुठे केव्हाही कधी खेळाविषयीच्या चर्चा होतील, खेळांबाबत काही घडले, तर या सर्वांना खेलो इंडिया मोहिमेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. यातूनच त्यांच्या जीवनाची नवीन कारकीर्द सुरू होते.
गुणवत्ता हुडकून काढण्यापासून तिला आधुनिक प्रशिक्षण आणि जगातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनाद्वारे पैलू पाडण्या पर्यंत आज भारत कुठल्याच बाबतीत मागे नाही. या अशा वेळी, असं पहा मी आत्ताची गोष्ट करतोय, यावेळी तीन हजाराहून जास्त प्रतिभावंत खेळाडूंचे खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू आहे. त्यांचे प्रशिक्षण, त्यांना मार्गदर्शन, दुखापतींवर आणि एकंदर औषधोपचार, पोषक आहार, प्रशिक्षण विषयक बाबींसाठी, सरकार प्रत्येक खेळाडूला दरसाल सहा लाख रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती सुद्धा देत आहे.
या योजने अंतर्गत आता सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची मदत खेळाडूंना थेट दिली जात आहे आणि आपल्याला पूर्ण विश्वासाने सांगतो! आपल्या कठोर मेहनतीसाठी पैशांची कधीही कमतरता भासू देणार नाही. सरकार आपल्यासाठी, क्रीडा जगतासाठी, येणाऱ्या पाच वर्षात 3000 कोटी रुपयांचा आणखी खर्च करणार आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा आपल्यासाठी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या कामगिरीने माझा उत्साह आणखी एका गोष्टीसाठी वाढवला आहे. यावेळी पदक तालिकेत खूप कमी वयाच्या खेळाडूंनी स्थान मिळवले आहे आणि जेव्हा कमी वयाचे खेळाडू मोठी उंची गाठतात, तेव्हा ते स्वतःच आपल्या क्रीडाप्रधान राष्ट्राची ओळख बनतात, क्रीडास्नेही देशाचे हे एक प्रकारचे लक्षणच आहे आणि म्हणूनच मी, ही आपली जी लहान वयाची खेळाडू मंडळी विजयी होऊन आली आहे ना, त्यांचे आज दुहेरी अभिनंदन करत आहे. कारण तुम्ही खूप दीर्घकाळपर्यंत देशाची सेवा करणार आहात. लहान वयाचे हे नवीन विजेते अनेक वर्ष देशासाठी शानदार कामगिरी बजावणार आहेत. तरुण भारताचा एक नवा दृष्टिकोन आता फक्त चांगल्या कामगिरीनेच अल्पसंतुष्ट रहात नाही, तर त्याला पदके हवी आहेत, विजय हवा आहे.
मित्रांनो,
आजची तरुण पिढी एक शब्द नेहमीच बोलते 'गोट', 'जी ओ ए टी' म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम अर्थात सार्वकालिक महान! देशासाठी तर आपण सर्वच जण गोटच गोट आहात. तुम्हाला असलेला खेळाचा ध्यास, खेळासाठी झोकून द्यायची तुमची प्रवृत्ती, तुमच्या लहानपणीचे किस्से, इतर सर्वांसाठीच एक प्रेरणा आहेत. इतर युवक युवतींना मोठी उद्दिष्टे गाठण्या करता या बाबी प्रेरित करतात. मी पाहतो, छोटी मुले तुमचा खेळ पाहून खूप प्रभावित झाली आहेत. ती तुमचा खेळ बघतात आणि तुमच्या सारखेच बनू पाहतात. तुम्हाला आपल्या या सकारात्मक प्रभावाचा सदुपयोग करायचा आहे. माझ्या लक्षात आहे… याआधी जेव्हा मी खेळाडूंना आग्रह केला होता की त्यांनी शाळा शाळां मध्ये जाऊन लहान मुलांना भेटावे, तेव्हा अनेक खेळाडू शाळांमध्ये गेले होते. त्यापैकी काही जण इथे उपस्थित आहेत. नीरज चोप्रा एका शाळेमध्ये गेले होते. तिथल्या मुलांनी नीरजचे खूप कौतुक केले होते. मी आज पुन्हा तुम्हा सर्वांना काहीसा अशाच प्रकारचा आग्रह करू इच्छितो. देशाला तुमच्याकडेही काही मागण्याचा हक्क आहे ना? गप्प का झालात? आहे की नाही हक्क! नाही, अजूनही खूप हळू आवाज येतोय तुमचा! मग तर काहीतरी गडबड आहे! देशाला तुमच्या कडून सुद्धा काही अपेक्षा असाव्यात की नाही? या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल ना?
बघा, माझ्या प्रिय अॅथलिट्स,
देश सध्या अमली पदार्थां विरोधात निर्णायक लढाई लढत आहे. अमली पदार्थांचे दुष्परिणाम तुम्हा सर्वांना चांगलेच माहीत आहेत. अनावधानाने होणारे डोपिंगही खेळाडूची कारकीर्द उद्धवस्त करू शकते. अनेक वेळा जिंकण्याचा हव्यास काही लोकांना चुकीच्या मार्गावर नेतो, पण तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला आणि आपल्या तरुणांना सावध करू इच्छितो. तुम्ही आपल्या तरुणांना सतर्क कराल कारण तुम्ही सर्व विजेते आहात. आणि योग्य मार्गावर जाऊन तुम्ही हे यश प्राप्त केले आहे. त्यामुळे कोणी चुकीच्या मार्गावर जाण्याची गरज नाही, तुमचे म्हणणे ऐकतील. आणि म्हणूनच तुम्ही यात मोठी भूमिका बजावू शकता.
तुम्ही दृढनिश्चयाचे आणि मानसिक सामर्थ्याचे प्रतीक आहात, पदके केवळ शारीरिक ताकदीतून मिळत नाहीत, मानसिक ताकदही खूप मोठी भूमिका बजावते आणि तुम्ही त्याचे धनी आहात. हा तुमचा मोठा ठेवा आहे, हा ठेवा देशाला उपयोगी पडायला हवा. भारतातील तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या हानिकारक प्रभावांबद्दल शिक्षित करण्यासाठी तुम्ही सर्वात मोठे सदिच्छा दूत देखील आहात. तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा कोणी तुम्हाला बाइट किंवा मुलाखतीसाठी विचारेल तर कृपया ही दोन वाक्ये कृपया अवश्य सांगा. मला हे माझ्या देशाच्या तरुण मित्रांना सांगायचे आहे, किंवा मला हे सांगायचे आहे, कृपया हे सांगा, कारण तुम्ही हे साध्य केले आहे म्हणून देशातील तरुण तुमचे ऐकतील.
माझी तुम्हाला विनंती आहे की, लोकांना भेटताना, मुलाखती देताना, शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्वत्र अंमली पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम तुम्ही सांगायला हवेत. अंमली पदार्थमुक्त भारताच्या लढ्याला बळ देण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवे.
मित्रांनो,
सुपरफूड्सचे महत्त्व आणि ते फिटनेससाठी किती महत्त्वाचे आहे हेही तुम्हाला माहीत आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत पौष्टिक आहाराला प्राधान्य दिले आहे, आणि अनेक गोष्टी आवडत असूनही खाण्यापासून दूर राहिलात, त्यामुळे काय खावे यापेक्षा काय खाऊ नये याचे महत्त्व अधिक आहे. आणि म्हणूनच मी म्हणेन की देशातील मुलांना त्यांच्या आहाराच्या सवयींबाबत, पौष्टिक आहाराबाबत तुम्ही नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकता. तुम्ही भरडधान्य चळवळ आणि पोषण अभियानातही मोठी भूमिका बजावू शकता. तुम्ही शाळांमध्ये खाण्याच्या योग्य सवयींबद्दल मुलांशी अधिक बोललाय हवे.
मित्रांनो,
तुम्ही खेळाच्या मैदानावर जे काही केले आहे तोही एका मोठ्या पटाचा भाग आहे. देशाची प्रगती झाली की त्याचा प्रभाव सर्वच क्षेत्रात दिसून येतो. भारताच्या क्रीडा क्षेत्रातही असेच घडताना आपण पाहत आहोत. देशातील परिस्थिती चांगली नसते तेव्हा त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रातही उमटतात. आज जेव्हा भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवत आहे, तेव्हा तुम्ही क्रीडा क्षेत्रातही ते दाखवून दिले आहे. आज जेव्हा भारत जगातील अव्वल-3 अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा आपल्या तरुणांना त्याचा थेट फायदा होत आहे. त्यामुळे आज अंतराळात भारताचे नाव दुदुमत आहे. सर्वत्र चांद्रयानाची चर्चा आहे. आज भारत स्टार्टअप्सच्या जगात अव्वल आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आश्चर्यकारक काम केले जात आहे. भारतातील तरुण उद्योजकतेमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. जगातील मोठमोठ्या कंपन्यांची नावे घ्या, त्यांचे सीईओ हे भारताची मुले आहेत, भारतातील तरुण आहेत. म्हणजेच भारतातील युवा सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. देशाला तुम्हा सर्व खेळाडूंवरही मोठा विश्वास आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही 100 पारचा नारा दिला होता. ती इच्छा तुम्ही पूर्ण केली. पुढच्या वेळी आपण या विक्रमापेक्षाही खूप पुढे जाऊ. आणि आता आपल्यासमोर ऑलिम्पिकही आहे. पॅरिससाठी मेहनतीने तयारी करा. यावेळी ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी निराश होण्याची गरज नाही. चुकांमधून शिकून नवीन प्रयत्न करू. माझा विश्वास आहे, तुम्हीही नक्कीच जिंकाल. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा काही दिवसातच, 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तुमच्या माध्यमातून मी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्व मुलांना आणि खेळाडूंना माझ्या शुभेच्छा देतो. या शानदार कामगिरीसाठी, या दमदार यशासाठी आणि देशाचा सन्मान वाढवण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद.