मध्य प्रदेशात इंदूर इथे मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
नमस्कार !
मध्य प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी सर्व गुंतवणूकदार,उद्योजक यांचे खूप-खूप स्वागत ! विकसित भारत घडवण्यामध्ये मध्य प्रदेशाची महत्वाची भूमिका आहे. भक्ती, अध्यात्मापासून ते पर्यटन, कृषी शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्यप्रदेश आगळा,अद्भुत आणि सजगही आहे.
मित्रहो,
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरु झाला आहे अशा वेळी मध्य प्रदेशात ही शिखर परिषद होत आहे. आपण सर्वजण विकसित भारत घडवण्यासाठी कार्यरत आहोत.विकसित भारताबाबत आम्ही बोलतो तेव्हा ही केवळ आमची आकांक्षा आहे असे नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा हा संकल्प आहे. केवळ भारतीयानाच नव्हे तर जगातली प्रत्येक संस्था, प्रत्येक तज्ञ याबाबत आश्वस्त दिसत आहे याचा मला आनंद आहे.
मित्रहो,
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत म्हणजे उज्ज्वल स्थान असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. तर जागतिक विपरीत परिस्थितीला इतर देशांपेक्षा भारत अधिक चांगल्या पद्धतीने सामोरा जाऊ शकतो असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेच्या भक्कम पायामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे. जी-20 गटात यावर्षी सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल असे ओईसीडी या संस्थेने म्हटले आहे. मॉर्गन स्टॅन्लेनुसार येत्या 4- 5 वर्षात जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. हे भारताचे केवळ दशक नव्हे तर भारताचे शतक असल्याचे मत मॅकेन्सेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी नोंदवले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत विश्वासार्ह आणि दबदबा असलेल्या संस्था आणि तज्ञांनी भारताप्रति अभूतपूर्व विश्वास दर्शवला आहे. जागतिक गुंतवणूकदारांनीही असाच आशावाद व्यक्त केला आहे. एका प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय बँकेने नुकतेच एक सर्वेक्षण केले.बहुतांश गुंतवणूकदारांनी भारताला प्राधान्य दिल्याचे यात आढळून आले. आज भारतात विक्रमी थेट परकीय गुंतवणूक येत आहे. आपली इथली उपस्थिती याच भावनेचे दर्शन घडवते.
मित्रहो,
बळकट लोकशाही व्यवस्था, लोकसंख्येत असलेले युवा वर्गाचे मोठे प्रमाण आणि राजकीय स्थैर्य यामुळे भारताप्रति हा आशावाद व्यक्त होत आहे. यांच्या बळावर भारत जीवनमान सुखकर करणारे आणि व्यवसाय सुलभता आणणारे निर्णय घेत आहे.अगदी शतकातून एकदा आलेल्या संकटाच्या वेळीही आपण सुधारणांचा मार्ग चोखाळला. 2014 पासून भारत ‘रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म’ या मार्गावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाने याला अधिक वेग दिला आहे. परिणामी भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक स्थान ठरला आहे.
मित्रहो,
एक स्थिर सरकार,निर्णायक सरकार, देश आणि जनहिताचा ध्यास घेतलेले सरकार विकासाला अभूतपूर्व वेग देत आहे.देशासाठी आवश्यक असलेले निर्णय तितक्याच वेगाने घेतले जात आहेत.गेल्या आठ वर्षात आम्ही सुधारणांची व्याप्ती आणि वेग सातत्याने कसा वाढवला आहे हे आपणही पाहिले आहे. बँकिंग क्षेत्रात पुनर्भांडवलीकरण आणि प्रशासनाशी निगडित बाबी असोत, आयबीसी सारखी आधुनिक निराकरण यंत्रणा असो, वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने एक देश एक करप्रणाली यासारखी यंत्रणा असो,कॉर्पोरेट कर जागतिक स्पर्धात्मक बनवणे असो पेन्शन फंड साठी करातून सूट अशा विविध क्षेत्रात स्वचलित मार्गाने 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देणे असो, किरकोळ आर्थिक चुकांना गुन्हेगारीच्या कक्षेतून वगळणे असो अशा अनेक सुधारणांच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या मार्गातले अडथळे आम्ही दूर केले आहेत. आजच्या युगातला नवा भारत आपल्या खाजगी क्षेत्रावरही तितकाच विश्वास दर्शवत आगेकूच करत आहे.संरक्षण.खाणकाम आणि अंतराळ यासारखी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची असलेली क्षेत्रेही आम्ही खाजगी क्षेत्रासाठी खुली केली आहेत. डझनाहून जास्त कामगार कायदे 4 संहितेत सामावणे हेही एक मोठे पाऊल आहे.
मित्रहो,
अनुपालनाचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरावर अभूतपूर्व प्रयत्न सुरु आहेत.मागच्या काही काळात सुमारे 40 हजार अनुपालने हटवण्यात आली आहेत. नुकतीच आम्ही राष्ट्रीय एक खिडकी यंत्रणा सुरु केली आहे, ज्याच्याशी मध्य प्रदेशही जोडला गेला आहे.या प्रणाली अंतर्गत आतापर्यंत सुमारे 50 हजार परवानग्या देण्यात आल्या आहेत.-----------
मित्रहो,
भारतातील आधुनिक पायाभूत सुविधा, मल्टीमोडल पायाभूत सुविधा देखील गुंतवणुकीच्या शक्यता वाढवत आहेत. 8 वर्षात आम्ही राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा वेग दुप्पट केला आहे. या कालावधीत भारतातील कार्यरत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. भारताच्या बंदरांच्या हाताळणी क्षमतेत आणि बंदरात जहाजे थांबण्याच्या प्रक्रियेत (पोर्ट टर्नराउंड) अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. समर्पित मालवाहू कॉरिडॉर, औद्योगिक कॉरिडॉर, द्रुतगती मार्ग, लॉजिस्टिक पार्क, हे नवीन भारताची ओळख बनत आहेत. पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या रूपात प्रथमच भारतात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच आहे. या मंचावर देशातील सरकार, संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी संबंधित अद्ययावत डेटा असतो. जगातील सर्वात स्पर्धात्मक लॉजिस्टिक बाजारपेठ म्हणून आपला ठसा उमटवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. या उद्देशाने आम्ही आमचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण लागू केले आहे.
मित्रहो,
स्मार्टफोन डेटा वापरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फिनटेकमध्ये (तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा सुविधा) भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आयटी- बीपीएन आउटसोर्सिंग वितरणामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ आणि तिसरी सर्वात मोठी मोटार उद्योग बाजारपेठ आहे. आज भारतातील उत्कृष्ट डिजिटल पायाभूत सुविधांबद्दल प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास आहे. जागतिक वाढीच्या पुढील टप्प्यासाठी हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही चांगलेच जाणता. एकीकडे भारत प्रत्येक गावाला ऑप्टिकल फायबर नेटवर्क पुरवत आहे, तर दुसरीकडे 5G नेटवर्कचा झपाट्याने विस्तार करत आहे. 5G ते इंटरनेट ऑफ थिंग्ज ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत, प्रत्येक उद्योग आणि ग्राहकांसाठी ज्या काही नवीन संधी निर्माण होत आहेत, त्या भारतातील विकासाचा वेग आणखी वाढवतील.
मित्रहो,
या सर्व प्रयत्नांमुळे आज मेक इन इंडियाला नवे बळ मिळत आहे. उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने विस्तार करत आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजने अंतर्गत, अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रोत्साहनांची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना जगभरातील उत्पादकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत विविध क्षेत्रात सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे. या योजनेमुळे मध्य प्रदेशात शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. मध्य प्रदेशाला एक मोठे औषधनिर्मिती केंद्र, एक मोठे वस्त्रोद्योग केंद्र बनवण्यासाठी ही योजना देखील महत्त्वाची आहे. मध्यप्रदेशात येणाऱ्या गुंतवणूकदारांनी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मी करतो.
मित्रहो,
तुम्ही सर्वांनी हरित ऊर्जेबाबत भारताच्या आकांक्षेत देखील सामील व्हावे. काही दिवसांपूर्वी आम्ही हरित हायड्रोजन अभियानाला मंजुरी दिली आहे. त्यातून सुमारे 8 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता आहे. ही केवळ भारतासाठीच नाही तर जागतिक मागणी पूर्ण करण्याची संधी आहे. या मोहिमेअंतर्गत हजारो कोटी रुपयांच्या प्रोत्साहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही या महत्त्वाकांक्षी अभियानात तुमची भूमिका देखील आजमावली पाहिजे.
मित्रहो,
आरोग्य असो, शेती असो, पोषण असो, कौशल्य असो, नवोन्मेष असो, भारतातील प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत. भारतासोबत नवी जागतिक पुरवठा साखळी तयार करण्याची ही वेळ आहे. म्हणून, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. या शिखर परिषदेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगतो की मध्य प्रदेशचे सामर्थ्य आणि मध्य प्रदेशचे संकल्प तुम्हाला तुमच्या प्रगतीत दोन पावले पुढे नेतील. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!