नमस्कारम्!
केरळ आणि त्रिशूर मधील माझ्या सर्व बंधू भगिनींना त्रिशूरपूरम् पर्वाच्या खूप-खूप शुभेच्छा. त्रिशूर ही केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जिथे संस्कृती असते, तिथे परंपराही असते, तिथे कलाही असतात. तिथे अध्यात्मही असते तसेच तत्वदर्शनही असते. तिथे सण उत्सवही असतात तसेच हर्षोल्लासही असतो. मला आनंद आहे की त्रिशूर हा वारसा आणि ओळख जिवंत ठेवत आहे. श्री सीताराम स्वामी मंदिर, गेल्या अनेक वर्षांपासून या दिशेने एक ऊर्जा केंद्र म्हणून काम करत आहे. मला सांगण्यात आले आहे की तुम्ही सर्वांनी हे मंदिर आता आणखी दिव्य आणि भव्य केले आहे. या प्रसंगी सुवर्णजडीत गर्भगृह भगवान श्रीसीताराम, भगवान अयप्पा आणि भगवान शिव यांना समर्पित केले जात आहे.
आणि मित्रांनो,
जिथे श्री सीताराम आहेत तिथे श्री हनुमान नाहीत, हे होऊच शकत नाही. त्यामुळे आता ५५ फूट उंचीची हनुमानजींची भव्य मूर्ती भाविकांवर कृपाप्रसादाचा वर्षाव करणार आहे. त्यानिमित्त मी सर्व भक्तांना कुम्भाभिषेकमच्या शुभेच्छा देतो. विशेषतः, मी श्री टी एस कल्याणरामन जी आणि कल्याण परिवारातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करू इच्छितो. मला आठवतंय की खूप वर्षांपूर्वी तुम्ही मला गुजरातमध्ये भेटायला आला होतात, तेव्हा तुम्ही मला या मंदिराचा प्रभाव आणि प्रकाश याविषयी सविस्तर सांगितलं होतं. आज, भगवान श्री सीतारामजींच्या आशीर्वादाने, मी या शुभ सोहळ्याचा एक भाग आहे. मनाने, अंतःकरणाने आणि जाणीवेने, मला तुमच्यामध्ये तिथे मंदिरातच असल्याची अनुभूती येत आहे आणि मला आध्यात्मिक आनंदही मिळत आहे.
मित्रांनो,
त्रिशूर आणि श्रीसीताराम स्वामी यांची मंदिरे आस्थेच्या परमोच्च शिखरावर आहेतच त्याचबरोबर ती भारताच्या चेतनेचे आणि आत्म्याचेही प्रतिबिंब आहेत. मध्ययुगीन काळात जेव्हा परकीय आक्रमक आपली मंदिरे आणि प्रतीके नष्ट करत होते, तेव्हा त्यांना वाटत होते की ते दहशतीच्या माध्यमातून भारताची ओळख नष्ट करतील. पण त्याला हे माहीत नव्हते की भारत प्रतीकांमध्ये दिसतो खरा, पण भारत असतो तो ज्ञानामधे. भारत जगतो- वैचारिक बोधात. भारत जगतो - शाश्वताच्या शोधात. त्यामुळेच काळाने दिलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड देऊनही भारत जिवंत आहे. म्हणूनच येथे श्री सीताराम स्वामी आणि भगवान अयप्पा यांच्या रूपाने भारतीयत्व आणि भारताचा आत्मा आपल्या अमरत्वाचा जयघोष करत राहिला आहे. शतकानुशतके पूर्वीच्या त्या खडतर काळातील या घटना, तेव्हापासून स्थापित ही मंदिरे, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही हजारो वर्षांची अमर कल्पना असल्याचेच घोषित करतात. आज स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रतिज्ञा घेऊन हा विचार पुढे नेत आहोत.
मित्रांनो,
आपली मंदिरे, आपली तीर्थक्षेत्रे ही आपल्या समाजाच्या मूल्यांची आणि समृद्धीची शतकानुशतके प्रतीके राहिली आहेत. मला आनंद आहे की श्री सीताराम स्वामी मंदिर प्राचीन भारताची ती भव्यता आणि वैभव जपत आहे. समाजाकडून मिळालेली संसाधने समाजालाच परत देण्याची मंदिरांची परंपरा होती ती तुम्ही पुढे नेत आहात. मला सांगण्यात आले आहे की या मंदिराच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी कार्यक्रम चालवले जातात. या प्रयत्नांमध्ये मंदिराने देशाचे आणखी संकल्पही जोडावेत अशी माझी इच्छा आहे. श्री अन्न अभियान असो, स्वच्छता अभियान असो किंवा नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती असो, तुम्ही सर्वजण अशा प्रयत्नांना अधिक गती देऊ शकता. मला खात्री आहे की, श्री सीताराम स्वामीजींचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहील आणि आपण देशाच्या संकल्पासाठी कार्य करत राहू. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद!