आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शांतता आणि विकासासाठी अणुऊर्जेच्या योग्य आणि सुरक्षित वापराबाबत भारताची असलेली कायम वचनबद्धता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. देशाच्या मिश्रित ऊर्जा निर्मिती चा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक अणुऊर्जा निर्मिती क्षमतेचा वाटा वाढवण्याची भारताची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे पंतप्रधानांनी सामायिक केली.
जबाबदार आण्विक शक्ती म्हणून भारताच्या असलेल्या निष्कलंक ओळखीबद्दल महासंचालक ग्रोसी यांनी भारताची प्रशंसा केली. तसेच त्यांनी अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचीही प्रशंसा केली, विशेषत: स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्पांच्या विकास आणि उपयोगितेबाबत त्यांनी टिप्पणी केली. सामाजिक फायद्यासाठी नागरी आण्विक वापराबाबत भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. आरोग्य, अन्न, पाण्याच्या पुनर्वापराबाबतच्या उपायोजना, प्लास्टिक प्रदूषण आणि हवामान बदल यासारख्या मानवजातीसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने आण्विक तंत्रज्ञानाच्या वापरात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा यात समावेश आहे.
स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (अणुभट्ट्या) आणि मायक्रो रिॲक्टर अणुभट्ट्यांच्या वापराबरोबरच निव्वळ शून्य उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जेच्या वापराचा विस्तार करण्यावर यावेळी विचारांची देवाणघेवाण झाली.
महासंचालक ग्रोसी यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) आणि भारत यांच्यातील उत्कृष्ट भागीदारीबद्दल प्रशंसा केली. अनेक देशांना मदत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले. ग्लोबल साउथ (अप्रगत देशांमध्ये) भागात नागरी आण्विक तंत्रज्ञान वापराचा विस्तार करण्यासाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) यांच्यात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपली पसंती दर्शवली.