जी 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी जपानमधल्या ‘ओसाका’ येथे जात आहे. जगाला आज भेडसावत असलेल्या प्रमुख आव्हानांबाबत तसेच उपलब्ध संधींबद्दल इतर जागतिक नेत्यांसोबत चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. महिला सबलीकरण, डिजिटलीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित मुद्दे, शाश्वत विकास साध्य करण्यातली प्रगती आणि दहशतवाद व हवामान बदल यासारख्या प्रमुख जागतिक आव्हानांच्या संबंधात सामूहिक प्रयत्न हे मुद्दे परिषदेच्या विषयपत्रिकेवर आहेत.
आजच्या बदलत्या जगात नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था जतन करणे आणि आवश्यक सुधारित बहुविधतेच्या समर्थनाच्या पुनरुच्चार करण्यासाठी महत्त्वाची संधी ही परिषद पुरवेल. गेल्या पाच वर्षातल्या विकास प्रवासाचा भारताचा अनुभव, जो प्रगती व स्थैर्याच्या मार्गावरची वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी ठोस जनादेशाचा आधार ठरला, तो या मंचावर सांगितला जाईल
देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात वर्ष 2022 मध्ये जेव्हा आपण नवभारत म्हणून नावारुपाला येत असू तेव्हा जी -20 परिषदेचे आयोजन आपण करणार आहोत. त्या दृष्टीने ओसाका परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
परिषदेदरम्यान आपल्या महत्त्वाच्या भागीदार देशांशी मी द्विपक्षीय आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.
परिषदेदरम्यान रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) अनौपचारिक बैठकीबाबत आणि ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) तसेच जेएआय (जपान, अमेरिका आणि भारत) या अनौपचारिक बैठकांबाबत मी उत्सुक आहे.