असंख्य भारतीयांनी देश सोडला असला तरी, त्यांचे ऋणानुबंध जोडले गेलेले आहेतच. त्यांना आपल्या देशाविषयी प्रेम आहेच. जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी गेलेला भारतीय आपल्या कार्य कर्तृत्वाने खूप यशस्वी झाला आहे. तिथल्या स्थानिक चालीरिती, परंपरा त्याने मनापासून स्वीकारल्या आहेत. जिथे राहतात, तिथल्या समाजात भारतीय मिसळून गेले आहेत. इतकेच नाही तर, त्या देशाच्या प्रगतीसाठी भारतीय हातभार लावत असतात. त्याच बरोबर देशाला गरज असेल तर मदत करण्याची सर्वतोपरी तयारी अनिवासी भारतीयांची असते. मायदेशासाठी काही करण्याची आस त्यांच्या मनात असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिवासी भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेला नेता, अशा दृष्टीने नरेंद्र मोदी यांच्याकडे परदेशातील भारतीय पाहतात. परदेश भेटीवर असताना मोदी स्थानिक अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याची संधी अवश्य घेतात. अगदी न्यूयॉर्क सिटीमधल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन, सिडनीमधल्या ऑलफोन्स एरेना मध्ये तसेच सेशेल्स, मॉरिशस, शांघाय या ठिकाणी तर एखाद्या रॉकस्टारला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जशी रसिक प्रचंड गर्दी करतात, तशी गर्दी अनिवासी भारतीयांनी मोदी यांच्या सभांना केली होती.
पंतप्रधानांची भाषणे अतिशय उत्साहवर्धक असतात. आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून भारतामध्ये बदलाचे वारे कसे वाहू लागले आहे. सरकारने कामकाजात सकारात्मक कसे बदल केले आहेत आणि देशाच्या प्रगतीमध्ये , विकासामध्ये अनिवासी भारतीय किती महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात, हे मुद्दे मोदी आपल्या भाषणात अधोरेखित करतात.
अनिवासी भारतीयांसाठी आवश्यक सुधारणा म्हणजे त्यांच्या व्हिजा परवान्याची ! हे लक्षात घेवून मोदी सरकारने व्हिसा नियमांचे सुसूत्रीकरण केले असून व्हिजा देण्याची पद्धतही सुटसुटीत, सोपी केली आहे. मोदी यांनी लक्ष घालून हे काम केल्याबद्दल सगळया देशांमध्ये मोदी यांचे कौतुक होत आहे.
परदेशात वास्तव्य करणारे भारतीय , मोठ्या सभांव्यतिरिक्त मोदींचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात. परदेशातल्या कोणत्याही सार्वजनिक सभेत ‘मोदी, मोदी, मोदी’ असा जयघोष होतो, हे आता नेहमीचे दृष्य झाले आहे. फ्रान्समध्ये ‘वर्ल्ड वॉर - एक’ स्मृतिस्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम मोदी यांचा होता. त्यावेळी जमलेल्या समुदायाने ‘शहीद अमर रहो’ अशा घोषणा कराव्यात , अशी सूचना पंतप्रधानांनी आवर्जून केली होती.
भारताचा विकास साधण्यासाठी अनिवासी भारतीय अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकतात, हे पंतप्रधानांना जाणवले असून, ते त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.