जर्मनी मधल्या हॅनोवर शहरामध्ये आयोजित औद्योगिक प्रदर्शनात जगभरातले अतिशय प्रतिष्ठीत, मान्यवर उद्योजक, उत्पादक सहभागी होतात. वर्ष 2015 मध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या म्हणजेच ‘हॅनोवर मेसे’च्या आयोजनामध्ये भारत सहभागीदार होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सेलर अेन्जेला मर्केल यांनी संयुक्तपणे केले. हॅनोवरच्या प्रदर्शनामध्ये भारताची सुप्त बलस्थाने आणि अमर्याद संभावना, यामुळे गुंतवणुकीला अतिशय योग्य स्थान असल्याचे स्पष्ट झाले. या प्रदर्शनातील ‘मेक इन इंडिया’ दालन नेत्रदीपक होते तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन देणारे आणि भारतात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करणारे होते. या दालनामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांचा सहभाग असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.
भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी हॅनोवरच्या प्रतिष्ठित आंतररष्ट्रष्ीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी भारताला मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. परकीय गुंतवणूकदारांना भारतामध्ये उद्योग व्यवसाय करणे सोपे जावे, यासाठी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या वर्षात आपल्या सरकारने कर प्रणालीत केलेले बदल, परवाना सुलभीकरण प्रक्रिया यांची माहिती मोदी यांनी भाषणात दिली.
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाविषयी आपण खूप आशावादी असल्याचे मत अनेक देशांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलताना व्यक्त केले. यामध्ये मलेशियाचे पंतप्रधान नजिब रझाक, सिंगापूरचे पंतप्रधान ली हसीएन लूंग, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅबट, जपानचे पंतप्रधान अॅबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद, कॅनडाचे पंतप्रधान हार्पर यांचा समावेश आहे.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक व्हावी, त्यासाठी त्यांना योग्य सुविधा द्याव्यात यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांनी गेले वर्षभर यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम होत असून भारतामध्ये गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. गुंतवणुकीच्या उद्देशाने भारतातील अमर्याद संधींकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे.