पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातील हजारो लाभार्थ्यांनी केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार आणि स्थानिक लोक प्रतिनिधींसमवेत या कार्यक्रमात भाग घेतला.
छत्तीसगढ मधील कांकेर येथील महिला, भूमिका भुराया यांनी पंतप्रधानांशी संवाद साधताना सांगितले की त्या त्यांच्या गावातील 29 वन धन गटांपैकी एका गटासाठी सचिव म्हणून काम करतात आणि त्यांनी वन धन योजना, उज्ज्वला गॅस जोडणी, जल जीवन, मनरेगा कार्ड, रेशन कार्ड आणि पीएम किसान सन्मान निधी यासह विविध सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे.
श्रीमती भूमिका यांना केंद्र सरकारच्या सर्व योजनांची नावे लक्षात आहेत हे विशेष आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की यामुळे लोकांसाठी कार्य करण्यासाठी केंद्र सरकारला अधिक सामर्थ्य मिळते. पंतप्रधानांनी त्यांना वेळेवर शिधा मिळतो की नाही याविषयी देखील विचारले. भूमिका यांचा सरकारी योजनांबद्दलचा माहितीचा स्रोत कोणता हे पंतप्रधानांनी मोठ्या औत्सुक्याने विचारले असता त्यांचे कुटुंब आणि पालक, असे उत्तर त्यांनी दिले. भूमिका यांच्या पालकांनी भूमिका आणि त्यांचा महाविद्यालयात शिकणारा लहान भाऊ या दोन्ही अपत्यांना सरकारी योजनांविषयी माहिती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि इतर गावकऱ्यांनी देखील आपल्या मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
भूमिका यांनी त्यांच्या स्वयं-सहायता वन धन गटाविषयी माहिती देताना पंतप्रधानांना सांगितले की त्यांचा गट महुआ लाडू आणि आवळा लोणचे यांचे उत्पादन करतो आणि ते मार्टमध्ये 700 रुपये किलो दराने विकले जाते. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याविना सर्व लाभ मिळत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आणि सामान्यतः नशेसाठी वापरल्या जाणार्या महुआचा योग्य वापर करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे सांगून पंतप्रधानांनी वन धन केंद्रांच्या सकारात्मक परिणामांचे श्रेय भूमिका यांना दिले. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी सुरु केलेली पी एम जन मन योजना आदिवासी लोकांकरता अतिशय साहाय्यकारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.