यूएनजीए म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 76 व्या सत्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मा.अब्दुल्ला शाहीद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यूएनजीएच्या 76 व्या सत्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष या नात्याने अब्दुल्ला शाहीद भारतभेटीवर आले आहेत. 7 जुलै 2021 रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांची या पदी निवड झाली.
त्या निवडणुकीतील जोरदार विजयाबद्दल पंतप्रधानांनी मा. शाहीद यांचे अभिनंदन करताना, "जागतिक पातळीवर मालदीवचे स्थान उंचावत असल्याचेच हे द्योतक आहे" असे प्रतिपादन केले.
भविष्यात दूरदृष्टी ठेवून 'आशामय अध्यक्षता' असे उद्दिष्ट आखल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे कौतुक केले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत भारताकडून त्यांना पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
"जगातील वर्तमान वस्तुस्थितीचे दर्शन घडण्याच्या दृष्टीने तसेच, जगाच्या लोकसंख्येच्या प्रचंड मोठ्या अंशाच्या आकांक्षांचे प्रतिबिंब पडण्याच्या दृष्टीने, जगाची रचना मल्टीलॅटरल म्हणजे बहुपक्षीय असणे महत्त्वाचे आहे", यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या घटकसंस्थांचीही तशा दृष्टीने पुनर्रचना होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
नजीकच्या काळात भारत आणि मालदीवच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये वेगाने झालेल्या वाढीविषयीही उभय नेत्यांनी चर्चा केली. कोविड-19 महामारीच्या परिस्थितीतही द्विपक्षीय प्रकल्पांची गती चांगली राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले. "भारताच्या परराष्ट्र संबंधांपैकी 'शेजार प्रथम' या धोरणाचा आणि 'सागर' (SAGAR - प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वृद्धी) मोहिमेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मालदीवचे महत्त्व मोठे आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.