पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज-4 प्रकल्पाच्या दोन नवीन कॉरिडॉरना (मार्गिका) मंजुरी दिली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील मेट्रो सेवेच्या संपर्कव्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
दोन कॉरिडॉर पुढील प्रमाणे:
- इंद्रलोक - इंद्रप्रस्थ 12.377 किमी
- लाजपत नगर - साकेत जी ब्लॉक 8.385 किमी
प्रकल्प खर्च आणि निधीचे नियोजन
दिल्ली मेट्रोच्या फेज - IV प्रकल्पाच्या या दोन कॉरिडॉरचा एकूण प्रकल्प खर्च रु. 8,399 कोटी इतका असून, त्यासाठी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि आंतरराष्ट्रीय निधी संस्थां द्वारे वित्त पुरवठा केला जाईल.
या दोन मार्गिका 20.762 किलोमीटरच्या असतील. इंद्रलोक - इंद्रप्रस्थ कॉरिडॉर हा ग्रीन लाईनचा विस्तार असेल आणि ही मार्गिका रेड, यलो, एअरपोर्ट लाईन, मॅजेन्टा, व्हायोलेट आणि ब्लू लाईन्सना जोडली जाईल. या ठिकाणी प्रवाशांना मार्गिका बदलता येईल. तर, लाजपत नगर - साकेत जी ब्लॉक कॉरिडॉर हा सिल्व्हर, मॅजेन्टा, पिंक आणि व्हायोलेट लाईन्सना जोडला जाईल.
लाजपत नगर - साकेत जी ब्लॉक कॉरिडॉर हा संपूर्णपणे उन्नत मार्ग असेल, आणि त्यावर आठ स्थानके असतील. इंद्रलोक - इंद्रप्रस्थ कॉरिडॉरमधील 11.349 किमी चा टप्पा भूमिगत असेल, तर 1.028 किमीचा टप्पा उन्नत असेल, आणि त्यावर 10 स्थानके असतील.
इंद्रलोक - इंद्रप्रस्थ मार्गिका हरियाणाच्या बहादूरगढ प्रदेशाला वाढीव संपर्कव्यवस्था प्रदान करेल, ज्यायोगे या भागातील प्रवासी इंद्रप्रस्थ तसेच मध्य आणि पूर्व दिल्लीच्या इतर विविध भागात थेट पोहोचण्यासाठी ग्रीन लाईनने प्रवास करू शकतील.
या कॉरिडॉरवर इंद्रलोक, नबी करीम, नवी दिल्ली, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, लाजपत नगर, चिराग दिल्ली आणि साकेत जी ब्लॉक या आठ ठिकाणी लाईन बदलण्यासाठी नवीन स्थानके उभारली जातील. ही स्थानके दिल्ली मेट्रो नेटवर्कच्या सध्या कार्यरत असलेल्या सर्व लाईन्समधील इंटरकनेक्टिव्हिटीमध्ये (परस्पर जोडणी) लक्षणीय सुधारणा करतील.
चौथ्या टप्प्याच्या विस्ताराचा एक भाग म्हणून दिल्ली मेट्रो यापूर्वीच 65 किलोमीटरचे जाळे तयार करत आहे. हे नवीन कॉरिडॉर मार्च 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (DMRC) सध्या 391 किलोमीटरचे नेटवर्क हाताळत असून, यामध्ये 286 स्थानके आहेत. दिल्ली मेट्रो आता जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या मेट्रो नेटवर्कपैकी एक आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (DMRC) यापूर्वीच बोलीपूर्व कामकाज आणि निविदा विषयक कागदपत्रांची तयारी सुरु केली आहे.