पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ,रेल्वे मंत्रालयाद्वारे बांधण्यात येणाऱ्या अंदाजे 2798.16 कोटी रुपये खर्चाच्या तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.
नवीन रेल्वे मार्गाची एकूण लांबी 116.65 किलोमीटर असेल. हा प्रकल्प 2026-27 पर्यंत पूर्ण होईल.या प्रकल्पामुळे, बांधकामादरम्यान सुमारे 40 लाख मनुष्य दिवसांसाठी थेट रोजगार निर्माण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारताच्या संकल्पनेच्या अनुषंगाने,हा प्रकल्प कनेक्टिव्हिटी वाढवणार असून वाहतूक सुविधा सुधारेल ज्यामुळे या क्षेत्राचा एकूण सामाजिक आर्थिक विकास होईल.
अंबाजी हे एक प्रसिद्ध महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि दरवर्षी गुजरात तसेच देशाच्या इतर भागातून आणि परदेशातील लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. या रेल्वेमार्गाच्या उभारणीमुळे या लाखो भाविकांना सहज प्रवास करणे शक्य होणार आहे.याशिवाय तरंगा टेकडीवरील अजितनाथ जैन मंदिराला ( 24 पवित्र जैन तीर्थंकरांपैकी एक) भेट देणाऱ्या भाविकांनाही या कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल.तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड दरम्यानचा हा रेल्वे मार्ग या दोन महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांना रेल्वेच्या मुख्य जाळ्याशी जोडेल.
या मार्गामुळे कृषी आणि स्थानिक उत्पादनांची जलद वाहतूक सुलभ होईल तसेच गुजरात आणि राजस्थान आणि देशाच्या इतर भागातही लोकांना सुधारित वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे विद्यमान अहमदाबाद-अबू रोड रेल्वे मार्गाला पर्यायी मार्गही उपलब्ध होणार आहे.
प्रस्तावित दुहेरी रेल्वे मार्ग राजस्थानच्या सिरोही जिल्हा आणि गुजरातच्या बनासकांठा आणि महेसाणा जिल्ह्यांमधून जाईल.नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामामुळे गुंतवणूक आकर्षित होईल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल.