पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने त्रिपुरा राज्यात राष्ट्रीय महामार्ग -208 वरील 101.300 किमी (खोवई) ते 236.213 किमी (हरीना) अशा एकूण 134.913 किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा सुधारणा आणि रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामध्ये 2,486.78 कोटी रुपये गुंतवणूक असून त्यामध्ये 1,511.70 कोटी रुपये ( 23,129 दशलक्ष जपानी येन ) कर्जाचा समावेश आहे. अधिकृत विकास सहाय्य (ओडीए ) योजनेअंतर्गत जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए ) कडून हे कर्ज दिले जाणार आहे. त्रिपुराच्या विविध भागांमध्ये उत्तम रस्ते जोडणी सुलभ करण्यासाठी आणि विद्यमान राह्स्त्रीय महामार्ग -8 व्यतिरिक्त त्रिपुराहून आसाम आणि मेघालयला पर्यायी प्रवेश व्यवस्था पुरवणे ही या प्रकल्पामागची कल्पना आहे.
लाभ :
प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक गरजा लक्षात घेऊन चांगले आणि वाहन चालवण्यायोग्य रस्ते उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग -208 च्या प्रकल्पाच्या विस्तारामुळे राष्ट्रीय महामार्ग-208A मार्गे आसाम आणि त्रिपुरा यांच्यातील आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच , त्याचबरोबर प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना सुरक्षित संपर्क व्यवस्था मिळेल. हा प्रकल्प मार्ग बांगलादेश सीमेच्या अगदी जवळून जातो आणि तो कैलाशहर, कमालपूर आणि खोवई सीमा चेक पोस्टमार्गे बांगलादेशबरोबर कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रकल्प रस्त्याच्या विकासाद्वारे प्रदेशातील रस्त्यांच्या जाळ्यात सुधारणा झाल्यामुळे भू -सीमा व्यापार देखील वाढण्याची शक्यता आहे.
हा मार्ग राज्यातील कृषी पट्टा, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि विकास व उत्पन्नाच्या बाबतीत मागासलेल्या आदिवासी जिल्ह्यांना सुधारित संपर्क व्यवस्था पुरवणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, कनेक्टिव्हिटी सुधारेल, परिणामी राज्याला अधिक महसूल तसेच स्थानिक लोकांसाठी उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
प्रकल्पाच्या विस्तारासाठी बांधकाम कालावधी 2 वर्षांचा असेल ज्यामध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या राष्ट्रीय महामार्गांच्या 5 वर्षांसाठी (फ्लेक्सिबल पेव्हमेंटच्या बाबतीत) / 10 वर्षे (रिजिड पेव्हमेंटच्या बाबतीत) देखभालीचा समावेश आहे.