पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.
मंत्रिमंडळाने बृहद आराखड्यानुसार ऐच्छिक संसाधने/योगदान याद्वारे निधी उभारून आणि निधी उभारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून टप्पा 1B आणि टप्पा 2 यांना देखील तत्वतः मंजुरी दिली.
टप्पा 1B अंतर्गत दीपगृह संग्रहालयाच्या उभारणीसाठी दीपगृह आणि दीपजहाजे महासंचालनालय निधी पुरवणार आहे.
भविष्यातील टप्प्यांसाठी एक स्वतंत्र सोसायटी स्थापन केली जाणार आहे. लोथल येथे एनएमएचसीची अंमलबजावणी, विकास, व्यवस्थापन आणि परिचालनासाठी सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत, भविष्यातील टप्प्यांच्या विकासासाठी, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गव्हर्निंग कौन्सिलद्वारे ती चालवली जाणार आहे.
टप्पा 1A अंमलबजावणीच्या प्रगतीपथावर असून त्याची 60 टक्क्यांपेक्षा जास्त भौतिक प्रगती झाली आहे आणि तो 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.प्रकल्पाचे टप्पे 1A आणि 1B हे ईपीसी स्वरुपात विकसित केले जाणार आहेत आणि एनएमएचसी ला जागतिक दर्जाचे वारसा संग्रहालय म्हणून स्थापित करण्यासाठी प्रकल्पाचा टप्पा 2 जमिनीचे सबलिजिंग/पीपीपीद्वारे विकसित केला जाईल.
रोजगार निर्मिती क्षमतेसह प्रमुख परिणाम:
एनएमएचसी प्रकल्पाच्या विकासामध्ये 15,000 प्रत्यक्ष रोजगार आणि 7,000 अप्रत्यक्ष रोजगारासह एकूण सुमारे 22,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे,
लाभार्थ्यांची संख्या:
एनएमएचसीच्या अंमलबजावणीमुळे विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक समुदाय, पर्यटक आणि अभ्यागत, संशोधक आणि विद्वान, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, पर्यावरण आणि संवर्धन गट, व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात मदत होईल.
पार्श्वभूमी:
भारताचा 4,500 वर्षांचा सागरी वारसा प्रदर्शित करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय लोथल येथे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) उभारत आहे.
एनएमएचसीचा बृहत आराखडा प्रसिद्ध वास्तुरचना फर्म मेसर्स आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टरने तयार केला आहे आणि टप्पा 1A चे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे सोपवण्यात आले आहे.
एनएमएचसी विविध टप्प्यांत विकसित करण्याची योजना आहे, ज्यामध्ये:
- टप्पा 1A मध्ये 6 गॅलऱ्या असलेले एनएमएचसी संग्रहालय असेल, ज्यामध्ये भारतीय नौदल आणि तट रक्षक गॅलरी देखील समाविष्ट आहे.यात बाह्य नौदल सामग्री (INS निशंक, सी हॅरियर युद्ध विमान, UH3 हेलिकॉप्टर इ.), लोथल शहराची प्रतिकृती, त्याभोवती खुली ऍक्वेटिक गॅलरी आणि जेट्टी वॉकवे यांचा समावेश असून अशा प्रकारची ती जगातली सर्वात मोठी गॅलरी बनवण्याची योजना आहे.
- टप्पा 1B मध्ये आणखी 8 गॅलऱ्या असलेले एनएमएचसी संग्रहालय , जगातील सर्वात उंच ठरणारे नियोजित दीपगृह संग्रहालय, बगीचा संकुल (सुमारे 1500 कारसाठी कार पार्किंग सुविधा, फूड हॉल, मेडिकल सेंटर इ.) असेल.
- टप्पा 2 मध्ये किनारी राज्ये पॅव्हेलियन (संबंधित किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे विकसित केली जातील), हॉस्पिटॅलिटी झोन (सागरी थीम इको रिसॉर्ट आणि म्युझ्युओटेल्ससह), रिअल टाइम लोथल सिटी, मेरीटाइम संस्था आणि वसतिगृह आणि 4 संकल्पना आधारित पार्क ( सागरी आणि नौदल थीम पार्क, हवामान बदल थीम पार्क, स्मारक पार्क आणि साहसी आणि मनोरंजन पार्क) असतील.