पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित, मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत, चिनाब नदीवर 540 मेगावॅटचा क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड़ जिल्हयात, हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी 4526.12 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंजूरी देण्यात आली आहे. मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (M/s. CVPPL) ही कंपनी हा प्रकल्प उभारेल. ही कंपनी एनएचपीसी आणि जेकेएसपीडीसी यांच्या संयुक्त भागीदारीतली असून, त्यात त्यांची अनुक्रमे 51 आणि 49 टक्के भागीदारी आहे.
या प्रकल्पातून 1975.54 दशलक्ष युनिट्स इतकी वीजनिर्मिती 90% सरासरीने निर्माण होईल.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासासाठी, पायाभूत सुविधा निर्मिती उभारणीसाठी, केंद्र सरकारने 69.80 कोटी निधी देऊ केला आहे. जेकेएसपीडीसी (49%) च्या समभागात 655.08 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे.
क्वार जलविद्युत प्रकल्प 54 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज, ग्रिडचा समतोल राखण्यास मदत करेल आणि प्रदेशातील वीजपुरवठा सुधारण्यास मदत होईल.
जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित सरकारने, हा प्रकल्प व्यवहार्य ठरण्यासाठी ह्या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर 10 वर्षांसाठी, पाणीवापराचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्याच्या जीएसटीच्या वाट्याची नुकसानभरपाई, तसेच दरवर्षी @2 टक्के मोफत वीज, या दराने वाढत जाणार आहे. म्हणजेच या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्या वर्षी, जम्मू काश्मीरला 2 टक्के मोफत वीज मिळेल, आणि त्यानंतर दरवर्षी त्यात 2 टक्क्यांची वाढ होत जाईल. म्हणजेच, लोकार्पणानंतर सहा वर्षांपासून या राज्याला,12 टक्के मोफत वीज मिळेल.
प्रकल्पाच्या बांधकामामुळे 2500 व्यक्तींना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे, जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेशाच्या एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच, जम्मू काश्मीरला या प्रकल्पाच्या एकूण आयुर्मान काळात, म्हणजेच 40 वर्षात, 4,548.59 कोटी रुपयांची मोफत वीज मिळेल आणि क्वार जलविद्युत प्रकल्पाकडून पाणीवापराचे शुल्क म्हणून 4,941.46 कोटी महसूलही मिळेल.