पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (डीए) अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) मंजूर केला आहे. दिनांक 01.07.2024 पासून हे लागू असून भाववाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन/निवृत्तिवेतनाच्या 50% च्या विद्यमान दरापेक्षा तीन टक्के (3%) वाढ दर्शविते.
ही वाढ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून सरकारी तिजोरीवर प्रतिवर्ष 9,448.35 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
याचा फायदा सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 64.89 लाख निवृत्तिवेतनधारकांना होणार आहे.