हा अर्थसंकल्प नवीन भारताचा अर्थसंकल्प असून, यामुळे देशाला ऊर्जा मिळेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.
संसदेत 2019-20 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, नवीन भारताच्या या अर्थसंकल्पामुळे 12 कोटी शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय, 3 कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदाते, व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंब, तसेच 30 ते 40 कोटी कामगारांना लाभ मिळेल.
रालोआ सरकारने हाती घेतलेल्या विकासाच्या उपाययोजनांमुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडला आहे. शेतकऱ्यांचे कल्याण, मध्यमवर्गीयांना प्राप्तीकरातून दिलासा, पायाभूत क्षेत्रे, निर्मिती क्षेत्रे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, गृहनिर्माण, आरोग्यसेवा आणि नवीन भारताच्या विकासाचा वेग वाढवण्यासंबंधिच्या प्रस्तावांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येते, असे पंतप्रधान म्हणाले.
गरीबीच्या जोखडातून अनेक लोक बाहेर पडत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपला नव-मध्यमवर्ग वाढत आहे आणि त्यांची स्वप्न देखील वाढत आहेत. करांमधून दिलासा मिळाल्याबद्दल त्यांनी मध्यमवर्गाचे अभिनंदन केले. देशाच्या विकासात मध्यमवर्गांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपण त्यांना सलाम करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत बोलतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी गेली अनेक वर्षे, अनेक उपक्रम हाती घेण्यात आलेत, मात्र अनेक शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान किसान निधी हे ऐतिहासिक पाऊल असून, यामुळे 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. पशुपालन क्षेत्र, मत्स्योद्योग या क्षेत्रांचाही नवीन भारताच्या अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
असंघटित क्षेत्रांच्या हितांचे रक्षण करण्याचे महत्व अधोरेखित करतांना ते म्हणाले की, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ही महत्वाची योजना ठरेल. या क्षेत्राला त्यांच्या हिताचे रक्षण होणे आवश्यक होते आणि नवीन भारताच्या अर्थसंकल्पात ते करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनांमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडेल, असे पंतप्रधान म्हणाले.
समाजातल्या सर्व घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचतील हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या अर्थसंकल्पामुळे गरीबाचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.