महामहीम पंतप्रधान शिंझो आबे ,
मान्यवर अतिथी ,
स्त्री आणि पुरुषगण ,
कोंबान वा !
पंतप्रधान म्हणून जपानचा दुसऱ्यांदा दौरा करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे . भारतीय जनतेने जपानी लोकांची समर्पित वृत्ती आणि धडाडी , क्षमता आणि चैतन्य आणि कामगिरी यांची नेहमीच प्रशंसा केली आहे.
जपानच्या अनुभवांमधून बरेच काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे. भारत आणि जपान यांचे दीर्धकाळ दृढ आणि मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत . हिंदुवाद आणि बौद्धवाद यांच्या विचार प्रवाहात आपल्या समाजांचे जवळचे संबंध आहेत. आर्थिक विकास आणि आपला सांस्कृतिक बाणा जतन करणे यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचे आपण दोघांचे मत आहे.
खुलेपणा , लोकशाही आणि कायदेनियमांप्रती आदर या समान मूल्यांनी आपले संबंध मजबूत झाले आहेत. आज, आर्थिक आणि धोरणात्मक मुद्द्यांच्या वाढत्या एक-केंद्राभिमुखतेमुळे आपल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला महत्व प्राप्त झाले आहे.
निकटचे भागीदार म्हणून आपण एकत्रितपणे खूप काही करू शकतो , केवळ आपल्या समाजाच्या कल्याणासाठी नव्हे तर , प्रांतासाठी आणि संपूर्ण जगासाठी देखील. आपल्या प्रांतात सुसंवाद आणि चांगली मैत्री या गुणांना आपली भागीदारी प्रोत्साहित करते.
सध्याच्या काळात आपल्यासमोरील संधी आणि आव्हाने यांना प्रतिसाद देण्यासाठी आपल्या क्षमतांचा एकत्रित वापर करता येईल. आणि जागतिक समुदायासह एकत्रितपणे आपण वाढत्या कट्टरतावाद , जहालवाद आणि दहशतवादाचा सामना करू शकतो आणि आपण करायला हवा .
मित्रांनो ,
आर्थिक समृद्धी , पायाभूत विकास , क्षमता निर्मिती आणि तंत्रज्ञान विकासाच्या प्रवासात जपान नेहमीच भारताचा महत्वाचा भागीदार राहिला आहे. विविध क्षेत्रांत आपल्या सहकार्याची व्याप्ती आणि प्रमाण वाढलेले आहे.
आपले आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत . व्यापार संबंध वाढत आहेत. आणि जपानमधून येणारी गुंतवणूक वाढत आहे. आमच्या महत्वपूर्ण विकास उपक्रमांमध्ये सहभागी होऊन जपानी कंपन्यांना अधिक लाभ होईल. त्याबदल्यात आम्हाला तंत्रज्ञान आणि नाविन्यता या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जपान कडून बरेच काही शिकता येईल.
आपल्या संबंधांचे स्वागतार्ह वैशिष्ट्य म्हणजे भारतातील राज्ये आणि जपानमधील प्रांत यांच्यातील संबंध आणि सहकार्यात झालेली वाढ हे आहे. जागतिक स्तरावर आम्ही जपानला देत असलेल्या सर्वोच्च प्राधान्याचे हे प्रतिबिंब आहे. उभय देशांच्या जनतेमध्ये परस्परांप्रती असलेल्या सदिच्छा आणि आदरामुळे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत . आणि जपानला महामहीम आबे यांचे कणखर नेतृत्व लाभले आहे.
आज त्यांच्याबरोबर झालेली माझी भेट ही गेल्या दोन वर्षातील आठवी भेट आहे. आपल्या शिखर परिषद बैठकीतील फलनिष्पत्तीबाबत , तसेच माझ्यासाठी आणि माझ्या प्रतिनिधिमंडळासाठी करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल आणि स्वागताबद्दल मी पंतप्रधान आबे आणि जपान सरकारचे मनापासून आभार मानतो.
निःसंशय आपले विधिलिखित एकमेकांशी जोडलेले आहे. हिंद-प्रशांत महासागरातील लाटा जपानच्या किनारपट्टीवरून भारताच्या किनाऱ्यावर आदळतात. शांतता , समृद्धी आणि विकासासाठी एकत्रितपणे काम करूया.
स्त्री आणि पुरुषगण ,
सरतेशेवटी ,
जपानचे सम्राट यांना उत्तम आरोग्य लाभो , जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि जपानच्या जनतेच्या यशासाठी आणि भारत आणि जपान यांच्या चिरस्थायी मैत्रीसाठी मी शुभेच्छा देतो.
कानपायी .