“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :
आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य
– नरेंद्र मोदी
आज सव्वाशे कोटी भारतीयांना आमची राजधानी नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात -आसियान देशांचे प्रमुख-१० मान्यवर अतिथींसाठी यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.
गुरुवारी, आसियान-भारत भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने स्मृती परिषदेसाठी १० प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत करण्याचे सौभाग्य मला लाभले. त्यांची आमच्यातील उपस्थिती हे आसियान देशांच्या चांगुलपणाचे अभूतपूर्व दर्शन आहे. त्याला प्रतिसाद म्हणून, हिवाळ्यातील या प्रसन्न सकाळी त्यांना मैत्रीपूर्ण आलिंगन देण्यासाठी भारतीय जनता बाहेर पडली आहे.
हा काही साधारण कार्यक्रम नाही. एका अद्भुत प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे ज्याने भारत आणि आसियानला त्यांच्या १.९ अब्ज जनतेसाठी म्हणजेच सुमारे एक चतुर्थांश मानवजातीसाठी एका दृढ भागीदारीत गुंफले आहे.
भारत-आसियान भागीदारी फक्त 25 वर्षांची असेल. परंतु, दक्षिणपूर्व आशियाबरोबर भारताचे संबंध दोनशे वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. शांतता आणि मैत्री, धर्म आणि संस्कृती, कला आणि वाणिज्य, भाषा आणि साहित्याने परिपूर्ण हे दुवे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील भव्य विविधतेच्या प्रत्येक पैलूमध्ये आता दिसून येतात, ज्याने आमच्या लोकांमध्ये सहजता आणि परिचयाचे विशिष्ट कवच उपलब्ध करून दिले आहे.
दोन दशकांपूर्वी, भारताने भौगोलिक बदलांसह स्वतःला जगासमोर खुले केले. आणि, शतकानुशतके बहाल केलेल्या कौशल्यामुळे ते नैसर्गिकरित्या पूर्वेकडे वळले. त्यामुळे पूर्वेकडील देशांबरोबर भारताच्या पुनर्एकात्मीकरणाचा एक नवीन प्रवास सुरू झाला. भारतासाठी, आमचे प्रमुख भागीदार आणि बाजारपेठा – आसियान आणि पूर्व आशिया ते उत्तर अमेरिका – पूर्वेपर्यंत आहेत आणि जमीन आणि समुद्राच्या माध्यमातून आमचे शेजारी असलेले आग्नेय आशिया आणि आसियान आमच्या लुक ईस्टचे आणि गेल्या तीन वर्षांपासून ऍक्ट ईस्ट धोरणाचे व्यासपीठ आहे.
या काळात, संवाद भागीदारीकडून आसियान आणि भारत धोरणात्मक भागीदार बनले. आम्ही ३० यंत्रणांच्या माध्यमातून आमची व्यापक भागीदारी पुढे नेली. प्रत्येक आसियान सदस्य देशाबरोबर आम्ही राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा भागीदारी वाढवत आहोत. आमच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. आमचा व्यापार आणि गुंतवणूक ओघ अनेकदा कित्येक पटीने वाढला आहे. आसियान हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारत आसियानचा सातवा आहे. भारताची २० टक्क्यांहून अधिक परदेशी गुंतवणूक आसियान मध्ये जाते. सिंगापूरच्या नेतृत्वाखाली आसियान हा भारताचा आघाडीचा गुंतवणूक स्रोत आहे. या प्रांतातील भारताचे मुक्त व्यापार करार हे सर्वात जुने आणि अतिशय महत्वाकांक्षी आहेत.
हवाई संपर्क वेगाने विस्तारलेले आहेत आणि आम्ही नवीन निकड आणि प्राधान्यक्रमासह दक्षिणपूर्व आशियामध्ये महामार्गांचा विस्तार करीत आहोत. संपर्क मार्ग वाढण्यामुळे सान्निध्याची पुनरावृत्ती झाली आहे. दक्षिणपूर्व आशियातील पर्यटनात भारत अग्रस्थानी राहिला आहे. या प्रदेशात 6 दशलक्षहून अधिक भारतीय समुदाय आहे – वैविध्यपूर्ण आणि गतिशील – आपल्यात एक विलक्षण मानवी नाते आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक आसियान सदस्य देशाबाबत आपली मते पुढीलप्रमाणे मांडली आहेत.
थायलंड
आसियानमध्ये थायलंड भारताचा एक महत्त्वाचा व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे आणि भारतातील आसियानमधील महत्त्वाचा गुंतवणूकदारांपैकी एक आहे. गेल्या दशकभरात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुपटीहून अधिक वाढला आहे. भारत आणि थायलंड यांच्यातील संबंध अनेक क्षेत्रात विस्तारलेले आहेत. आम्ही दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडणारे महत्वाचे क्षेत्रीय भागीदार आहोत. आम्ही आसियान, पूर्व आशिया शिखर परिषद आणि बिमस्टेक (मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनसाठी बंगालचा उपक्रम) मध्ये तसेच मैकोंग गंगा सहकार्य , आशिया सहकार्यात्मक संवाद आणि इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या चौकटीत सहकार्य करतो. 2016 मध्ये थायलंडच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याने द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकालीन प्रभाव पाडला आहे.
महान आणि लोकप्रिय राजे भूमिबोल अडुल्यादेज यांच्या निधनाच्या वेळी संपूर्ण भारताने आपल्या थाई बंधु आणि बहिणींसह शोक व्यक्त केला होता. नवीन राजे महा वजिरालोंगकोम यांच्या दीर्घ, समृद्ध आणि शांततापूर्ण कारकिर्दीसाठी प्रार्थना करण्यासाठी भारताचे लोक थायलंडमधील मित्रांसमवेत सहभागी झाले होते.
व्हिएतनाम
पारंपारिक रूपाने जवळचे आणि सौहार्दपूर्ण नातेसंबंधांची ऐतिहासिक मुळे ही परकीय गुलामगिरीतून मुक्ततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठीच्या राष्ट्रीय संघर्षासाठी सामायिक लढ्यात आहेत. महात्मा गांधी आणि अध्यक्ष हो ची मिन्ह यांच्यासारख्या पुढाऱ्यांनी वसाहतवादविरोधी लढ्यामध्ये आमच्या लोकांचे नेतृत्व केले. २००७ मध्ये पंतप्रधान गुयेन टॅन डुंग यांच्या भारत भेटीदरम्यान, आम्ही धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. २०१६ मधील माझ्या व्हिएतनाम दौऱ्यामुळे ही धोरणात्मक भागीदारी व्यापक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाली आहे.
व्हिएतनामसह भारताचे संबंध आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीने परिपूर्ण आहेत. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात द्विपक्षीय व्यापार 10 वर्षांत दहापट वाढला आहे. भारत आणि व्हियेतनाम यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा एक महत्वपूर्ण स्तंभ म्हणून संरक्षण सहकार्य उदयाला आले आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सहकार्याचे आणखी एक महत्वाचे क्षेत्र आहे.
भारत आणि म्यानमार यांची 1600 किमी पेक्षा अधिक भूसीमा आणि सागरी सीमा सामायिक आहे. नातेसंबंधाच्या गहन संवादातून वाहणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे आणि आपल्या बौद्ध धर्मातील समान परंपरेने आपल्याला ऐतिहासिक भूतकाळाप्रमाणे एकत्र बांधले आहे. श्वेडगोन पॅगोडाच्या तेजस्वी टॉवरपेक्षा काहीही अधिक तेजस्वी नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या सहाय्याने बागानमध्ये आनंद मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे सहकार्य या सामायिक वारसाचे प्रतीक आहे.
वसाहती काळामध्ये,स्वातंत्र्यासाठीच्या सामायिक संघर्षात आशा आणि एकतेची भावना दाखवणाऱ्या आपल्या नेत्यांमध्ये राजकीय संबंध निर्माण झाले गांधीजीनी यांगॉनला अनेक वेळा भेट दिली. बाळ गंगाधर टिळक हे अनेक वर्षे यांगॉनला निर्वासित केले गेले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाने म्यानमारमधील अनेकांची मने जागृत केली.
गेल्या दशकात आमचा व्यापार दुपटीने अधिक वाढला आहे. आमचे गुंतवणूक संबंध देखील मजबूत आहेत. म्यानमारबरोबर भारताच्या संबंधांमध्ये विकास सहकार्य महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. हे सहाय्य सध्या 1.73 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. भारताचे पारदर्शक विकास सहकार्य म्यानमारच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहे आणि आसियान कनेक्टिव्हिटीच्या प्रमुख आराखड्याशी समन्वय स्थापित करते.
सिंगापूर
या प्रदेशाशी भारताच्या संबंधांचा वारसा , सध्याची प्रगती आणि भविष्यातील संभाव्यता यांची सिंगापूर ही एक खिडकी आहे. सिंगापूर हा भारत आणि आसियान यांच्यातील एक पूल होता.
आज, हा आमचा पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे, आमचा आघाडीचा आर्थिक भागीदार आणि एक प्रमुख जागतिक धोरणात्मक भागीदार आहे, जे अनेक प्रादेशिक आणि जागतिक मंचांवरील आमच्या सदस्यत्वामध्ये प्रतिबिंबित होते. सिंगापूर आणि भारत यांच्यात एक धोरणात्मक भागीदारी आहे.
आमच्या राजकीय संबंध सदिच्छा, प्रेम, आणि विश्वासार्हतेमध्ये समाविष्ट आहेत. आमचे संरक्षण संबंध हे दोघांसाठी सर्वात मजबूत आहेत.
आमच्या आर्थिक भागीदारीने आमच्या दोन देशांच्या प्रत्येक प्राधान्य क्षेत्राचा समावेश केला आहे. सिंगापूर हे भारताचे प्रमुख गंतव्यस्थान आणि गुंतवणुकीचे स्त्रोत आहे.
हजारो भारतीय कंपन्या सिंगापूरमध्ये नोंदणीकृत आहेत
सिंगापूरमध्ये 16 भारतीय शहरांमधून दर आठवड्याला 240 थेट उड्डाणे आहेत. सिंगापूरमधील भारतीय पर्यटकांची संख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे.
सिंगापूरचा प्रेरणादायक बहुसंस्कृतिवाद आणि गुणवत्तेबद्दल आदराने एक जागरुक व गतिमान भारतीय समाज निर्माण केला आहे जो आमच्या राष्ट्रांमधील सखोल सहकार्यासाठी योगदान देत आहे.
फिलीपिन्स
दोन महिन्यांपूर्वी मी केलेला फिलीपिन्सचा दौरा अतिशय समाधानकारक होता. आसियान-भारत, ईएएस आणि संबंधित परिषदांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, मला राष्ट्रपती ड्यूटरटे यांना भेटण्याचा योग्य आला. आणि आम्ही आमचे जिव्हाळ्याचे आणि समस्या मुक्त नाते कसे पुढे न्यायचे याबद्दल व्यापक चर्चा केली. आपण दोघेही सेवांमध्ये बळकट आहोत आणि प्रमुख देशांमध्ये आमचा वृद्धीदर सर्वात जास्त आहे. आमच्या व्यापार क्षमतेत मोठ्या संधी आहेत.
मी सर्वसमावेशक विकासासाठी आणि भ्रष्टाचारविरोधी लढा देण्यासाठी अध्यक्ष दुटेर्टे यांच्या वचनबद्धतेचे कौतुक करतो. ही अशी क्षेत्रे आहेत जिथे दोन्ही देश एकत्र काम करू शकतात. आम्ही सार्वत्रिक ओळखपत्रे, आर्थिक समावेशन, सर्वाना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, थेट लाभ हस्तांतरण आणि रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन यामधील आमचा अनुभव फिलिपिन्सला सांगायला तयार आहोत. फिलीपीन्स सरकारसाठी सर्वांना औषधे उपलब्ध करून देणे हे एक अन्य प्राधान्य क्षेत्र आहे ज्यामध्ये आम्ही योगदान देण्यासाठी तयार आहोत. मुंबई ते मारावी पर्यंत, दहशतवाद्यांना सीमा माहीत नाही. या आव्हानाला सामोरे जाताना आम्ही फिलीपिन्सबरोबर आमचे सहकार्य वाढवत आहोत.
मलेशिया
भारत आणि मलेशिया यांच्यातील समकालीन संबंध बरेच व्यापक आहेत आणि अनेक क्षेत्रांत विस्तारलेले आहेत. मलेशिया आणि भारत यांच्यात धोरणात्मक भागीदारी आहे आणि आम्ही अनेक बहुपक्षीय आणि क्षेत्रीय आघाड्यांवर सहकार्य करतो. 2017 मध्ये मलेशियन पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याने द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकालीन प्रभाव पाडला आहे.
मलेशिया आशियाई देशांत भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनला आहे आणि आशियानमधील भारतातील महत्त्वाच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दहा वर्षांत दोन पटीने वाढला आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात 2011 पासून द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करार आहे. हा करार असामान्य आहे कारण दोन्ही बाजूंनी वस्तूंच्या व्यापारासाठी आसियन प्लसची वचनबद्धता देऊ केली आहे आणि सेवांमध्ये व्यापारातील डब्ल्यूटीओ प्लस ऑफरची देवाणघेवाण केली आहे. मे 2012 मध्ये स्वाक्षरी केलेल्या उभय देशांमधील सुधारित दुहेरी कर चुकवेगिरी करार आणि 2013 मध्ये सीमाशुल्क सहकार्याबाबत सामंजस्य करार झाल्यानंतर आमचे व्यापार आणि गुंतवणुक सहकार्य अधिक सुलभ झाले आहे.
ब्रुनेई
भारत आणि ब्रुनेई यांच्यातील द्विपक्षीय व्यापार गेल्या दशकभरात दुपटीहून अधिक वाढला आहे. भारत आणि ब्रुनेई दोन्ही देश संयुक्त राष्ट्रसंघ, अलिप्त राष्ट्र परिषद (नाम), राष्ट्रकुल संघटना, आशियाई प्रादेशिक मंच (एआरएफ) यांचे सदस्य असून मजबूत पारंपरिक आणि सांस्कृतिक संबंध असलेली विकसनशील राष्ट्रे या नात्याने भारत आणि ब्रुनेई यांची प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्यांवर योग्य प्रमाणात समान भूमिका आहे. मे २००८ मध्ये ब्रुनेईच्या सुलतानांनी भारताला दिलेली भेट ही या दोन देशांमधील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली. फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतींनी ब्रुनेईला भेट दिली होती.
लाओ पीडीआर
भारत आणि लाओ पीडीआर तथा लाओस (पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक) यांच्यातील संबंध अनेक क्षेत्रांमध्ये व्यापक प्रमाणात विस्तारलेले आहेत. लाओ पीडीआरमधील वीज पारेषण आणि कृषी क्षेत्रात भारताची सक्रीय गुंतवणूक आहे. आज भारत आणि लाओ पीडीआर अनेक बहुआयामी आणि प्रादेशिक क्षेत्रांसाठी सहकार्य करतात.
भारत आणि लाओ पीडीआर यांच्यातील व्यापार अजूनही क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात असला तरीही भारताने आपल्या करमुक्त जकात प्राधान्य योजना लाओ पीडीआरसाठी लागू केल्या असून लाओ पीडीआरमधून भारतात माल आयात करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सेवा व्यापार क्षेत्रातही आम्हाला प्रचंड संधी असून त्यातून लाओ पीडीआरची अर्थव्यवस्था उभरता येईल. आसियान-भारत सेवा आणि गुंतवणूक करारामुळे आमच्या सेवा क्षेत्रातील व्यापार सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे.
इंडोनेशिया
हिंदी महासागरात केवळ ९० सागरी मैल अंतरावरून विभक्त झालेले भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये सांस्कृतिक संबंध दोन हजार वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. ओडीशात दरवर्षी साजरी केली जाणारी बालीजत्रा असो की रामायण आणि महाभारत कथा असो, जे संपूर्ण इंडोनेशियाच्या प्रदेशात आढळते, हे आगळेवेगळे सांस्कृतिक धागे आशियातल्या या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांतील लोकांना घट्ट बांधून ठेवत आले आहेत.
विविधतेत एकता किंवा भिन्नेका तुंग्गल इका हा ही दोन्ही देशांमधील लोकशाही आणि कायद्याचे राज्य या पैलूंसारखाच सामाजिक मूल्य रचनेचा समान पैलू आहे, जो दोन्ही देश साजरा करत असतात. आज, महत्वपूर्ण भागीदार या नात्याने आमच्यातील सहकार्य राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि सुरक्षा, सांस्कृतिक तसेच दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध या सर्वंकष क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे. आसियान मधील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार इंडोनेशिया हाच राहिला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार अडीच पटींनी वाढला आहे. अध्यक्ष जोको विडोडो यांनी २०१६ मध्ये भारताला दिलेली भेट ही द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकाळ परिणाम करणारी ठरली.
कम्बोडिया
भारत आणि कम्बोडिया यांच्यातील पारंपरिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे मूळ सांस्कृतिक संबंधात खोलवर रुजले आहे. अंगकोर वॅट मंदिराची उत्कृष्ट रचना आमच्या प्राचीन ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांची वैभवशाली साक्ष आणि भव्य सुचिन्ह आहे. १९८६ ते १९९३ या कठीण काळात अंगकोर वॅट मंदिराचा जीर्णोद्धार आणि जतन करण्याचे काम हाती घेतल्याचा भारताला अभिमान आहे. ताप्रोह्म मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन भारताने हे मौल्यवान संबंध पुढेही सुरु ठेवले आहेत.
ख्मेर रूज राजवट कोसळल्यानंतर १९८१ मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारला मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. १९९१ मध्ये परीस शांतता करार आणि तो अंतिम करण्याच्या प्रक्रियेशी भारत जोडला गेला होता. मैत्रीची ही पारंपरिक बंधने उच्च स्तरीय नेत्यांच्या एकमेकांच्या देशांना भेटी देण्यातून आणखी मजबूत झाले आहेत. संस्थात्मक क्षमतांची उभारणी, मनुष्य बळ विकास, विकासाचे आणि सामाजिक प्रकल्प, सांकृतिक देवाणघेवाण, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, पर्यटन आणि एकमेकांच्या नागरिकांमधील संबंध अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये आम्ही सहकार्य आणखी व्यापक केले आहे.
आसियान आणि विविध जागतिक मंचांवर कम्बोडिया हा भारताचा महत्वाचा संवादक आणि समर्थक भागीदार आहे. कम्बोडियाच्या आर्थिक विकासात भागीदार राहण्यास भारत कटिबद्ध आहे आणि पारंपरिक संबंध आणखी खोलवर रुजवण्याकडे उत्सुकतेने पाहत आहे.
भारत आणि आसियान खूप काही करत आहेत. आसियान प्रणीत पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान संरक्षण मंत्रीस्तरीय परिषद, आणि एआरएफ (आसियान प्रादेशिक मंच) यासारख्या संस्थांमध्ये आमच्या भागीदारीमुळे आमच्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य आणखी पुढे नेत आहेत. प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारातही भारत उत्सुकतेने सहभागी झाला असून सर्व १६ सहभागी देशांसाठी व्यापक, संतुलित आणि योग्य समझोता होण्यासाठी हा करार आहे.
आसियान देशांमधील सहकार्याची मजबुती आणि लवचिकपणा केवळ गणिती आकड्यांनी आलेला नाही तर संबंधांचा पाया त्यास आहे. भारत आणि आसियान राष्ट्रे यांच्यातील संबंध स्पर्धा आणि हक्कांचे दावे यापासून मुक्त आहेत. समावेशकता आणि एकीकरण यावर उभारलेले भविष्य, आकाराचा विचार न करता सर्व राष्ट्रांच्या सार्वभौम समानतेवर विश्वास आणि व्यापार तसेच आपसातील संबंधांसाठी मुक्त आणि खुल्या मार्गाना समर्थन यावर आमचा समान दृष्टीकोन आहे.
भारत-आसियान भागीदारी वाढत राहणार आहे. लोकसंख्या, गतिमानता आणि मागणी या मिळालेल्या देणग्यांसह झपाट्याने परिपक्व होत चाललेल्या अर्थव्यवस्था असल्याने भारत आणि आसियान मजबूत आर्थिक भागीदारी उभारतील. संपर्क व्यवस्था वाढून व्यापार आणखी विस्तारित होईल. भारतात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवाद असल्याने आमची राज्येही आग्नेय आसियान देशांशी फलदायी सहकार्याची उभारणी करत आहेत. भारताच्या ईशान्येकडील राज्येही पुनरुत्थानाच्या मार्गावर आहेत. आग्नेय आशियाशी संबंधांमुळे त्यांची प्रगती झपाट्याने होईल. आणि त्यातून आमच्या स्वप्नातील आसियान-भारत संबंधांसाठी ईशान्य भारत जोडणारा पूल असेल.
पंतप्रधान म्हणून मी चार आसियान-भारत शिखर परिषदा आणि पूर्व आशिया परिषदेला उपस्थित राहिलो आहे. यातून आसियान देशांमधील ऐक्य, केंद्रीयता आणि या दृष्टीकोनातून प्रदेशाला आकार देणारे नेतृत्व याबाबत मला वाटणारी खात्री आणखी मजबूत झाली आहे.
हे वर्ष महत्वाचे टप्पे गाठण्याचे आहे. यंदा भारत ७० वर्षांचा झाला. आसियानने ५० वर्षाचा सोनेरी टप्पा गाठला. आम्ही प्रत्येक जण आमच्या भविष्याकडे आशेने आणि परस्परांच्या भागीदारीकडे विश्वासाने पाहू शकतो.
सत्तरीत असताना भारताच्या युवा वर्गाचे चैतन्य, साहसी वृत्ती आणि उर्जा ओसंडून वाहत आहे. जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून, भारत जागतिक संधीमध्ये आघाडीवर असलेला देश बनला असून जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थैर्याचा आधारस्तंभ झाला आहे. दिवसेंदिवस भारतात व्यवसाय करणे सोपे आणि सुलभ होत आहे. आसियान राष्ट्रे, भारताचे शेजारी आणि मित्र म्हणून नव्या भारताच्या परिवर्तनाचे अंतर्गत घटक बनतील. अशी मला आशा आहे.
आसियानच्या स्वतःच्या प्रगतीचे आम्हाला कौतुक वाटते. जेव्हा आग्नेय आशिया पाशवी युद्धं आणि अनिश्चिततेत अडकलेल्या राष्ट्रांची रंगभूमी बनला होता, तेव्हा आसियानने दहा देशांना समान उद्देश आणि सामायिक भविष्याच्या उद्दिष्टाने एकत्र केले. उच्च महत्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्याची तसेच पायाभूत सुविधा आणि नागरीकरण ते लवचिक कृषी क्षेत्र आणि प्रदूषणापासून मुक्त समृद्ध पृथ्वी या आजच्या काळातील आव्हानांचे निवारण करण्याची आमच्यात क्षमता आहे. डिजिटल तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन आणि संपर्क व्यवस्था यांच्या ताकदीचा उपयोग आम्ही लोकांच्या आयुष्यात अभूतपूर्व गती आणि त्याच प्रमाणात स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी करू शकतो.
आशेचे भविष्य हवे असेल तर त्यासाठी शांततेच्या मजबूत मूलभूत तत्वांची गरज असते. परिवर्तन, अडथळे आणि बदल यांचे हे युग आहे, जे इतिहासात क्वचितच येते. अनिश्चितता आणि गोंधळ यातून मार्ग काढत आमचा प्रदेश आणि जगालाही, स्थिर आणि शांततापूर्ण भविष्याकडे नेण्यासाठी स्थिर प्रवाह तयार करण्याची अफाट संधी, नव्हे प्रचंड जबाबदारी आसियान आणि भारतावर आहे.
भरभराटीचा सूर्योदय आणि संधीचा प्रकाश यासाठी भारतीयांनी नेहमीच पूर्वेकडे पाहिले आहे. आताही पूर्वीप्रमाणेच, पूर्व किंवा भारत-पॅसिफिक प्रदेश भारताचे भविष्य आणि आमची सामायिक नियती घडवण्यासाठी अपरिहार्य असेल. दोन्ही उद्दिष्टांत आसियान-भारत भागीदारी निर्णायक भूमिका बजावेल. आणि दिल्लीत, आसियान आणि भारत यांनी या दिशेने पुढच्या प्रवासाकरता नव्याने शपथ घेतली आहे.
पंतप्रधानांच्या आसियान वृत्तपत्रांतील संपादकीय पानावरील भाषण खालील लिंक वर पूर्ण मिळू शकेल
https://www.bangkokpost.com/opinion/opinion/1402226/asean-india-shared-values-and-a-common-destiny
https://www.businesstimes.com.sg/opinion/asean-india-shared-values-common-destiny
https://www.globalnewlightofmyanmar.com/asean-india-shared-values-common-destiny/
https://www.mizzima.com/news-opinion/asean-india-shared-values-common-destiny
https://www.straitstimes.com/opinion/shared-values-common-destiny
https://news.mb.com.ph/2018/01/26/asean-india-shared-values-common-destiny/