पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.