आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.