पंतप्रधान 24 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होणार

April 23rd, 11:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. तसेच ते देशभरातील ग्रामसभांना देखील संबोधित करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवतील. पंतप्रधान या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची सुरुवात देखील करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.