तामिळ नववर्ष समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 13th, 08:21 pm

आपल्या सर्वांना तामिळ पुथांडू निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं प्रेम, माझ्या तमिळ बंधू-भगिनींच्या स्नेहामुळेच आज मला आपल्या बरोबर तामिळ पुथांडू साजरा करण्याची संधी मिळाली आहे. पुथांडू म्हणजे पुरातन काळातील नवोन्मेषाचा सण! तामिळ संस्कृती एवढी प्राचीन आहे, आणि दर वर्षी पुथांडू मधून नवीन ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करण्याची ही परंपरा खरोखरच अद्भुत आहे! हीच गोष्ट तामिळनाडू आणि तामिळ लोकांचं वेगळेपण आहे. म्हणून मला नेहमीच या परंपरेचं आकर्षण वाटत आलं आहे आणि तिच्याशी मी भावनिक रित्या जोडला गेलो आहे. मी गुजरातमध्ये असताना, ज्या मणीनगर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार होतो, तिथे मोठ्या संख्येने मूळचे तामिळनाडू इथले नागरिक राहत होते, ते माझे मतदार होते, ते मला आमदारही बनवायचे आणि मुख्यमंत्रीही बनवायचे. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेले क्षण मला नेहमी आठवतात. माझं हे भाग्य आहे, की मी तामीळनाडूला जेवढं प्रेम दिलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम मला तामिळ जनतेने नेहमीच परत दिलं.

पंतप्रधान तमिळ नववर्ष समारंभामध्‍ये झाले सहभागी

April 13th, 08:20 pm

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पुत्तांडू साजरे करण्यासाठी आपले तमिळ बंधू आणि भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “पुत्तांडू हा प्राचीन परंपरेतील आधुनिकतेचा उत्सव आहे. तमिळ संस्कृती प्राचीन असली तरीही दरवर्षी नवीन ऊर्जा घेऊन पुढे जात आहे, ही गोष्‍ट उल्लेखनीय आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तमिळ लोकांच्या आणि संस्कृतीच्या वेगळेपणावर भर देत पंतप्रधानांनी तामिळ संस्कृतीबद्दल त्यांना आकर्षण वाटते तसेच एक भावनिक ओढही असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये आपल्या पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघात तमिळ लोकांची संख्‍या भरपूर होती आणि त्यांनी आपल्याला प्रचंड प्रेम दिले, याचे स्मरण करून पंतप्रधानांनी तमिळ लोकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.