देशातील सहकार चळवळ बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
February 15th, 03:49 pm
देशातील सहकार चळवळीला बळकटी देऊन ती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा लाभ घेत, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध सहकारी संस्था नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत/गावात व्यवहार्य दुग्ध सहकारी संस्था आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांलगतच्या पंचायत/गावात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी तसेच मोठे जलस्रोत असलेल्या ग्रामपंचायत/गावात आणि विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्था/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी योजना तयार केली आहे. सुरुवातीला, पुढील पाच वर्षांत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था / दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जातील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) च्या माध्यमातून कृती आराखडा तयार केला जाईल.