माणेकशा सेंटर येथे बांग्लादेशाच्या मुक्ती संग्रामातील भारतीय शहीदांना गौरवण्यासाठी आयोजित सोमनोना समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 08th, 03:24 pm
आज एक विशेष दिवस आहे. आज भारत आणि बांग्लादेशाच्या शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावलेल्या योध्दयांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. बांग्लादेशाचा स्वाभिमान जपण्यासाठी लढणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूर वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हा दिवस बांग्लादेशावर करण्यात आलेल्या क्रूर प्रहाराचे स्मरण करण्याचाही आहे, ज्याने लाखो लोकांचे आयुष्य हिरावून घेतले. त्याचबरोबर इतिहासातील छळ जो बांगलादेशाला सहन करावा, त्यामागची विकृत मानसिकता झुगारण्याचाही आहे. आजचा दिवस भारत आणि बांग्लादेशाच्या १४० कोटींहून अधिक नागरिकांमधील अतूट विश्वासाचे सामर्थ्य जाणण्याचा देखील आहे. आपण आपल्या समाजांना कशा प्रकारे सशक्त आणि समृध्द भविष्य देऊ यावर चिंतन करण्याची देखील ही योग्य संधी आहे.