प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्‍यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

November 06th, 03:14 pm

प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या धोरणात प्रतिभावान विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विविध उपायांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्याला दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेल तो विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचे शुल्क आणि या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची गरज भागवण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांमधून तारण विरहित, हमीदार विरहित कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल. एका साध्या, पारदर्शक, विद्यार्थी स्नेही प्रणालीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आंतर-परिचालनक्षम आणि संपूर्णपणे डिजिटल असेल.