मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.