गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 22nd, 11:30 am

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, संसदेमधील माझे मित्र सी आर पाटील, अमूलचे अध्यक्ष श्यामल भाई, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो! गुजरात मधील गावांनी मिळून 50 वर्षांपूर्वी जे रोप लावले होते ते आज विशाल वटवृक्ष बनले आहे आणि या विशाल वटवृक्षाच्या फांद्या आज देश परदेशात पसरल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.गुजरात मधील दूध समितीशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे मी अभिनंदन करतो. याचबरोबर आपले एक आणखी मित्र आहेत जे दुग्ध व्यवसाय क्षेत्रातले सर्वात मोठे भागीदार आहेत. मी त्यांना सुद्धा नमस्कार करतो. हे भागीदार आहेत, आपले पशुधन. मी आज या प्रवासाला यशस्वी बनवण्यामध्ये पशुधनाच्या योगदानाला सुद्धा सन्मानित करत आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत आहे. त्यांच्या शिवाय दुग्ध व्यवसाय क्षेत्राची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि यासाठीच माझ्या देशातल्या पशुधनाला सुद्धा माझा प्रणाम आहे.

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

February 22nd, 10:44 am

गुजरातमध्ये अहमदाबाद मधील मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज आयोजित करण्यात आलेल्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ)सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला तसेच सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण देखील केले. जीसीएमएमएफ ही संस्था म्हणजे सहकारी संस्थांचा लवचिकपणा, या संस्थांची उद्योजकता विषयक उर्जा तसेच शेतकऱ्यांचा दृढ निश्चय यांचा पुरावाच आहे आणि त्याने अमूलला जगातील सशक्त दुग्धोत्पादन ब्रँड म्हणून स्थान मिळवून दिले आहे.