तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

December 03rd, 12:15 pm

चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण

December 03rd, 11:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक /पोलीस महानिरीक्षकांची बैठक

January 07th, 08:34 pm

यावेळी, नवे फौजदारी कायदे लागू होण्याबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की हे कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. नवे फौजदारी कायदे, ' नागरिक प्रथम , प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम ' या तत्वानुसार तयार करण्यात आले असून ‘दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागचा भाव समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रमुखांना कल्पकतेने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन गुन्हेगारी विषयक कायद्यांतर्गत महिला आणि मुलींना त्यांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करण्याबाबत पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रिया निर्भयपणे ‘ कुठेही आणि कधीही, , काम करू शकतील हे सुनिश्चीत करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी पोलिसांना आवाहन केले.