आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
March 22nd, 03:34 pm
आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन
March 22nd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार
March 21st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.