भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस): वैज्ञानिक संशोधनासाठी आपले स्वतःचे अंतराळ स्थानक सन 2028 मध्ये त्याचे पहिले मॉड्युल सुरू होताना स्थापित होणार

September 18th, 04:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून भारतीय अंतराळ स्थानकाच्या पहिल्या युनिटच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. भारतीय अंतराळ स्थानकाच्या (बीएएस -1) पहिल्या मॉड्यूलच्या विकासासाठी आणि भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) बांधकाम आणि कार्यान्वयनासाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि प्रमाणीकरण करण्याच्या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस) आणि पूर्ववर्ती मोहिमांसाठी नवीन घडामोडींचा समावेश करण्यासाठी आणि चालू असलेल्या गगनयान कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त आवश्यकता समाविष्ट करण्यासाठी गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती आणि निधी मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.