भव्य विचार करा, मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

December 26th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.