उत्तर प्रदेशात वाराणसी येथे विविध प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

March 24th, 05:42 pm

नवरात्रीचा पवित्र काळ सुरु आहे, आज माता चंद्रघंटाच्या पूजेचा दिवस आहे. आज या पवित्र शुभ प्रसंगी मी तुम्हा सर्वांसोबत काशीच्या भूमीवर आहे हे माझे भाग्य आहे. माता चंद्रघंटाच्या आशीर्वादाने बनारसच्या सुख-समृद्धीत आज आणखी एक अध्याय जोडला जात आहे. आज येथे सार्वजनिक वाहतूक रोपवेची पायाभरणी करण्यात आली. बनारसच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या इतर प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही झाली. यामध्ये पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, गंगाजीची स्वच्छता, पूर नियंत्रण, पोलीस सुविधा, क्रीडा सुविधा, अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. आज आयआयटी बीएचयू येथे 'सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन मशीन टूल्स डिझाइन'ची पायाभरणीही करण्यात आली आहे. म्हणजे बनारसला आणखी एक जागतिक दर्जाची संस्था मिळणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी बनारसच्या जनतेचे आणि पूर्वांचलच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन.

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 1780 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि लोकार्पण

March 24th, 01:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 1780 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये वाराणसी कॅन्टोनमेन्ट स्थानक ते गोडोवलिया दरम्यानच्या प्रवासी रोपवे प्रकल्पाची पायाभरणी, नमामि गंगा योजनेअंतर्गत भगवानपूर येथे 55 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिग्रा स्टेडियमच्या पुनर्विकास प्रकल्पाचा दुसरा आणि तिसरा टप्पा, सेवापुरीमधील इसरवार गावात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून उभारला जाणारा एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि कपडे बदलण्याची सोय असलेल्या खोल्यांसह तरंगती जेटी यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अंतर्गत 19 पेयजल योजनांचे देखील लोकार्पण केले. या योजनांचा 63 ग्रामपंचायतींमधील 3 लाखांहून अधिक लोकांना लाभ होणार आहे.या मिशन अंतर्गत 59 पेयजल योजनांची पायाभरणीही त्यांनी केली. फळे आणि भाज्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी कारखियांमध्ये एकात्मिक पॅक हाऊसचे देखील लोकार्पण केले. वाराणसी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विविध प्रकल्पांचे देखील त्यांनी लोकार्पण केले.