Mann Ki Baat: PM Modi speaks about the tradition of storytelling
The agriculture sector of the country, our farmers, our villages, is the foundation of self-reliant India: PM Modi during Mann Ki Baat
In today's date, the more modern methods we apply to agriculture, the more the sector will flourish: Prime Minister during Mann Ki Baat
I bow to Shaheed Veer Bhagat Singh, an icon of courage and valour among all the countrymen: PM Modi
Mann Ki Baat: PM Modi remembers greats like Mahatma Gandhi, Jayprakash Narayan, Nanaji Deshmukh
Rajmata Vijayaraje Scindia dedicated her entire life to the service of the people: PM Modi during Mann Ki Baat
Wear masks properly, maintain social distancing to combat Coronavirus: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. कोरोनाच्या या काळात संपूर्ण जग अनेक बदल अनुभवते आहे. आज सार्वजनिक जीवनात वावरताना परस्परांपासून दोन मीटर अंतर राखणे, ही काळाची गरज झाली आहे, त्याच वेळी या कोरोना काळाने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम सुद्धा केले आहे. मात्र इतका दीर्घ काळ एकत्र राहायचे, कसे राहायचे, वेळ कसा घालवायचा, प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता येईल? खरे तर अनेक कुटुंबांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्याचे कारण होते, प्रत्येक कुटुंबात चालत आलेल्या परंपरा आणि संस्कारांची कमतरता. असे वाटते आहे की अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांमध्ये यापैकी काहीच शिल्लक नाही आणि त्यामुळे, त्या अभावामुळे संकटाचा हा काळ व्यतीत करणे, काही कुटुंबांना थोडे कठीण जाते आहे, आणि, त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? प्रत्येक कुटुंबात वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबातील ज्येष्ठ  व्यक्ती गोष्टी सांगत असत आणि घराला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत असत. आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच  झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला. मित्रहो, मानवी संस्कृतीइतकाच कथा-कहाण्यांचा इतिहास जुना आहे.

'Where there is a soul, there is a story.'

गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे, चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते.

मित्रहो, भारताला गोष्ट सांगण्याची किंवा किस्से सांगण्याची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा चालत आली आहे. विवेक आणि बुद्धिमत्ता यांचे महत्व पटवून द्यावे, यासाठी आमच्या गोष्टींमध्ये पशुपक्षी आणि पऱ्यांचे काल्पनीक विश्व रचले गेले. या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे कथा सांगण्याची परंपरा सुद्धा पूर्वापारपासून चालत आली आहे.  धार्मिक गोष्टी सांगण्याची ही प्राचीन पद्धत आहे. यात 'कथाकालक्षेवम' सुद्धा समाविष्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या लोककथा सुद्धा प्रचलित आहेत. तमिळनाडू आणि केरळमध्ये अतिशय रोचक पद्धतीने गोष्ट सांगितली जाते. या पद्धतीला 'विल्लू पाट' असे म्हटले जाते. गोष्ट आणि संगीत यांचा सुंदर मेळ या पद्धतीत अनुभवायला मिळतो. भारतात कठपुतळी ही सुद्धा पारंपारिक कला आहे. अलीकडच्या काळात विज्ञान आणि विज्ञान संबंधित काल्पनिक कथा तसेच कथा सांगण्याच्या पद्धती लोकप्रिय होत आहेत. अनेक लोक किस्से सांगण्याची कला लोकप्रिय करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहे, हे मी पाहिले आहे. Gathastory.in सारख्या काही संकेतस्थळाबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली, जिथे इतरांसोबत अमर व्यास यांच्या कथाही उपलब्ध आहेत. अमर व्यास हे आय आय एम अहमदाबाद येथून एम बी ए पूर्ण करून परदेशी निघून गेले होते, काही काळाने ते भारतात परतले. ते सध्या बेंगळुरू येथे राहतात आणि वेळात वेळ काढून अशा प्रकारचे गोष्टींशी संबंधित कौतुकास्पद कार्य करत आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा असे अनेक प्रयत्न सुरू आहेत, जे ग्रामीण भारतातील कथा लोकप्रिय करत आहेत. वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

चेन्नई येथील श्रीविद्या आणि राघवन सुद्धा आपल्या संस्कृतीशी संबंधित कथांचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर कथालय आणि The Indian storytelling network ही दोन संकेतस्थळे सुद्धा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. गीता रामानुजन यांनी kathalaya.org मध्ये कथा संकलित केल्या आहेत तर The Indian storytelling network च्या माध्यमातून कथाकार यांचे एक जाळे तयार केले जाते आहे. बंगळुरू मध्ये विक्रम श्रीधर नावाचे एक गृहस्थ आहेत, जे बापूंशी संबंधित कथा उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक या क्षेत्रात काम करत असतील. आपण समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतच्या माहितीची देवाण-घेवाण अवश्य करा.

आज बंगळुरू story telling society च्या भगिनी अपर्णा अथ्रेया आणि इतर सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत. या, त्यांच्यासोबत गप्पा मारूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया.

पंतप्रधान:-   हॅलो

अपर्णा :-   नमस्कार आदरणीय पंतप्रधानजी. आपण कसे आहात?

पंतप्रधान:-   मी ठीक आहे आपण कशा आहात अपर्णा जी ?

अपर्णा :- मी सुद्धा छान आहे सर. आमच्यासारख्या कलाकारांना आपण या मंचावर आमंत्रित केले आणि आमच्या सोबत संवाद साधत आहात. त्याबद्दल सर्वात आधी Bangalore storytelling society तर्फे मी आपले आभार मानू इच्छिते.

पंतप्रधान:-   मी ऐकले आहे की आज तुम्ही  तुमच्या संपूर्ण चमू सह उपस्थित आहातअपर्णा :-   हो सर

पंतप्रधान :- मग तुम्ही आपल्या चमूशी आमची ओळख करून द्या, म्हणजे मन की बात च्या श्रोत्यांची सुद्धा त्यांच्याशी ओळख होईल आणि आपण कशा प्रकारची मोहीम राबवीत आहात, हे समजू शकेल.

अपर्णा :- सर, माझे नाव अपर्णा अथ्रेय आहे. मी दोन मुलांची आई आहे. भारतीय वायुसेनेतील एका अधिकाऱ्याची मी पत्नी आहे आणि कथा सांगणे हा माझा छंद आहे. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत होते, तेव्हा story telling ची सुरुवात झाली. CSR project अंतर्गत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी मी गेले, तेव्हा हजारो बालकांना गोष्टींच्या माध्यमातून शिकवण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी मी त्या बालकांना सांगत होते, त्या मी माझ्या आजीकडून ऐकल्या होत्या. मी जेव्हा त्या बालकांना गोष्टी सांगत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला. तो आनंद पाहिला तेव्हाच story telling चे ध्येय मी निश्चित केले सर.

पंतप्रधान :-  तुमच्या चमूमध्ये आणखी कोण आहे?

अपर्णा:-    माझ्यासोबत शैलजा संपत आहेत

शैलजा:-    नमस्कार सर

पंतप्रधान:-   नमस्कार

शैलजा:-  मी शैलजा संपत बोलते आहे. आधी मी शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्यानंतर माझी मुले मोठी झाली आणि मी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मात्र अंतिमतः गोष्टी सांगण्यात मला सर्वात जास्त आनंद मिळाला.

पंतप्रधान:-   धन्यवाद

शैलजा:-    माझ्यासोबत सौम्या आहे

सौम्या:-     नमस्कार सर !

पंतप्रधान:-   नमस्कार

सौम्या:- माझे नाव सौम्या श्रीनिवासन आहे. मी एक मानसशास्त्रज्ञ आहे. माझ्या कामाचा एक भाग म्हणून लहान मुले आणि मोठी माणसे यांच्यासोबत संवाद साधताना मी कथांच्या माध्यमातून मानवी अंतरंगातील नवरसांना जागृत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या सोबत गप्पा सुद्धा मारते. Healing and transformative story telling, हे माझे उद्दिष्ट आहे.

अपर्णा:-    नमस्कार सर

पंतप्रधान:-   नमस्कार

अपर्णा: माझे नाव अपर्णा जयशंकर आहे. माझ्या दोन्ही आजी-आजोबांसोबत देशाच्या विविध भागांमध्ये माझे बालपण गेले, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्याचमुळे रामायण, पुराणे आणि भगवद्गीतेतील कथा मला प्रत्येक रात्री ऐकायला मिळत असत आणि Bangalore storytelling society सारखी संस्था लाभल्यानंतर मी story teller होणे स्वाभाविक होते.  माझी सहकारी लावण्या प्रसाद माझ्या सोबत आहे.

प्रधानमंत्री:- लावण्या जी, नमस्कार !

लावण्या:-   नमस्कार सर. मी खरे तर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मात्र आता मी प्रोफेशनल स्टोरी टेलर म्हणून कार्यरत आहे. माझ्या आजोबांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत मी लहानाची मोठी झाले. मी ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करते. 'रुट्स' या माझ्या विशेष प्रकल्पात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबतच्या जीवन कथा लिखित स्वरूपात तयार करण्यात मी त्यांची मदत केली आहे.

पंतप्रधान:-   लावण्याजी आपले मनापासून अभिनंदन. आताच आपण सांगितले त्याच प्रमाणे मी सुद्धा एकदा मन की बात कार्यक्रमात सगळ्यांना सांगितले होते की जर आपल्या कुटुंबात आजी-आजोबा असतील तर त्यांना त्यांच्या बालपणीच्या गोष्टींबद्दल विचारा, त्या रेकॉर्ड करा. पुढच्या काळात त्या नक्कीच कामी येतील. आपण सर्वांनी आपला परिचय दिला, तो ऐकून मला आनंद झाला. आपल्या कलेबद्दल, आपल्या संवादकौशल्याबद्दल, अतिशय कमी शब्दात उत्तम प्रकारे आपण सर्वांनी स्वतःचा परिचय करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी आपले अभिनंदन करतो.

लावण्या:-   धन्यवाद सर, धन्यवाद !

पंतप्रधान:-   आता आमचे जे मन की बात कार्यक्रमाचे श्रोते आहेत, त्यांना सुद्धा गोष्ट ऐकावीशी वाटत असेल.  आपण 1-2 गोष्टी सांगाव्यात, अशी मी विनंती करू शकतो का?

समूह स्वर:  का नाही सर, ती तर आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे.

चला तर मग, गोष्ट ऐकूया, एका राजाची. राजाचे नाव होते कृष्णदेवराय आणि राज्याचे नाव होते विजयनगर. महाराज होते आपले अतिशय गुणी. त्यांच्यात अगदी दोष काढायचाच झाला तर  तो म्हणजे त्यांचे आपल्या मंत्र्यावर, तेनालीरामावर असलेले प्रेम आणि भोजनावर असलेले प्रेम.  रोज दुपारच्या भोजनाची वेळ झाली की महाराजांना वाटे, आज नक्कीच काहीतरी छान खायला मिळेल आणि त्यांचे आचारी मात्र त्यांना खाऊ घालत भाज्या. तोंडली, दुधी, भोपळा, अरे देवा… रोज असे व्हायचे. एके दिवशी राजाने जेवता जेवता रागाने ताट फेकून दिले आणि आपल्या आचाऱ्याला आदेश दिला, एक तर उद्या एखादी चविष्ट भाजी तयार कर नाहीतर मी तुला फाशी देईन. आचारी बिचारा घाबरला. आता नवी भाजी आणायची कुठून? धावत धावत तो पोहोचला तेनालीरामाकडे आणि त्याला सगळा किस्सा सांगितला. तेनाली रामाने त्याचे बोलणे ऐकून घेतले आणि उपाय सुचवला. दुसऱ्या दिवशी राजा दुपारी जेवायला आला आणि आचाऱ्याला बोलावले. आज काही

चविष्ट भाजी शिजवली आहेस की तुला फाशी द्यायची आज? घाबरलेल्या आचाऱ्याने झटपट जेवणाचे ताट तयार केले आणि महाराजांना गरमागरम जेवण वाढले. ताटात नवी भाजी होती. महाराजांना आनंद झाला आणि त्यांनी भाजीची चव घेतली. अरे वा, किती छान भाजी होती. दोडक्या सारखी बेचव नव्हती, भोपळ्यासारखी गोड सुद्धा नव्हती. आचाऱ्याने जो मसाला तयार करून घातला होता, तो व्यवस्थित लागला होता.आनंदित झालेल्या राजाने आपली बोटे चाटत आचाऱ्याला बोलावले आणि विचारले की ही भाजी कुठली आहे, या भाजीचे नाव काय? पढवल्याप्रमाणे आचाऱ्याने उत्तर दिले, महाराज ही भाजी आहे मुकुटधर वांगे. महाराज तुमच्याप्रमाणेच ही भाजी सुद्धा भाज्यांमध्ये राजा आहे, म्हणूनच इतर सर्व भाज्यांनी वांग्याला मुकुट घातला आहे. राजाला आनंद झाला आणि त्याने घोषणा केली की आजपासून आम्ही मुकुटधर वांगेच खाणार आणि आम्हीच नाही तर आमच्या राज्यात सुद्धा केवळ वांग्याची भाजी केली जाईल. इतर कोणतीही भाजी केली जाणार नाही. राजा आणि प्रजा, दोघे आनंदात होते. अगदी सुरुवातीला नवी भाजी मिळाल्यामुळे सगळेच आनंदले होते. मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तस-तशी ही आवड कमी होऊ लागली. एका घरात वांग्याचे भरीत केले जात असे तर दुसरीकडे वांग्याची भाजी. एकीकडे आमटी तर दुसऱ्या घरात वांगीभात. एका वांग्याचे तरी किती प्रकार करायचे? हळूहळू राजाला सुद्धा कंटाळा आला. रोज तीच वांगी. मग एके दिवशी काय झाले, राजाने आचाऱ्याला बोलावे आणि चांगलेच सुनावले. कोणी सांगितले तुला की वांग्याच्या डोक्यावर मुकुट आहे? या राज्यात आता कोणीच वांगे खाणार नाही. उद्यापासून इतर कुठलीही भाजी बनवलीस तरी चालेल, पण वांगी बनवायची नाही. ठीक आहे महाराज,असे म्हणून आचारी थेट तेनालीरामाकडे पोहोचला. त्याचे पाय धरत आचारी म्हणाला, तुमच्या युक्तीमुळे आता आम्ही महाराजांना कोणतीही भाजी खाऊ घालू शकतो. हसत-हसत तेनाली रामा म्हणाला, महाराजांना खुश ठेवू शकत नसेल असा मंत्री काय कामाचा? अशाप्रकारे राजा कृष्णदेवराय आणि मंत्री तेनालीरामा यांच्या अनेक कथा तयार होत गेल्या आणि लोक ऐकत गेले.

धन्यवाद.

पंतप्रधान :-  तुमच्या कथेमध्ये इतके बारकावे होते, इतकी अचूकपणे तुम्ही गोष्ट सांगितली की लहान-मोठे ज्यांनी कोणी ही गोष्ट ऐकली असेल, हे सगळे बारकावे सुद्धा त्यांच्या लक्षात राहतील. तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने गोष्ट सांगितली आणि योगायोग असा की देशात सध्या पोषण मास सुद्धा सुरू आहे आणि आपली कथा पोषणाशी संबंधित आहे

पंतप्रधान:-   आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आपण जे कथाकार आहात आणि इतर सर्वच लोक, आपण आपल्या नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्राचा अधिक प्रचार करावा, ते लोकप्रिय करावे आणि प्रत्येक घरात चांगल्या कथा सांगितल्या जाव्यात, मुलांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, ही फार मोठी गोष्ट आहे. यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून आपण सर्वांनी त्या दिशेने काम केले पाहिजे.‌ आपणा सर्वांशी गप्पा मारून मला फार आनंद झाला. आपणा सर्वांना माझ्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.

समूह स्वर:  धन्यवाद सर

कथेच्या माध्यमातून संस्कारांचा प्रवाह पुढे नेणाऱ्या या भगिनींशी झालेला संवाद आपण आताच ऐकला. जेव्हा मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत होतो, तेव्हा बराच वेळ आमचा संवाद सुरू होता. मला वाटले की मन की बात या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे माझा त्यांच्याशी जो काही संवाद झाला, तो संपूर्ण संवाद मी NarendraModiApp  वर अपलोड करेन. संपूर्ण कथा तिथे तुम्ही नक्की ऐका. आता मन की बात कार्यक्रमात मी त्या संवादाचा एक लहानसा भाग ऐकवला. मात्र तुम्हा सर्वांना मी आग्रहाने विनंती करतो की घरात दर आठवड्याला या कथांसाठी थोडासा वेळ काढा. आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक आठवड्यासाठी, एक विषय निश्चित करू शकता. करुणा, संवेदनशीलता, पराक्रम, शौर्य अशी एखादी भावना. आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्या आठवड्यात त्या एकाच विषयावर आधारित वेगवेगळ्या कथा शोधाव्यात आणि कुटुंबातील प्रत्येकाने त्या एका विषयाशी संबंधित एक एक गोष्ट सांगावी.

बघता-बघता कुटुंबात अशा कथांचा एक मोठाच खजिना तयार होईल, संशोधनाचे एक उत्तम कार्य होऊन जाईल.  सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाला एक नवी ऊर्जा मिळेल. याच पद्धतीने आपण आणखी एक काम करू शकतो. कथा सांगणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. आपण आपल्या कथांच्या माध्यमातून गुलामगिरीच्या काळातील सर्व प्रेरक घटनांचा प्रचार करू शकतो. विशेषतः 1857 ते 1947 या कालावधीतील प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा परिचय आता आपण आपल्या नव्या पिढीला करून देऊ शकतो. आपण हे काम निश्चितच कराल, असा विश्वास मला वाटतो. कथा सांगण्याची ही कला देशात अधिक सक्षम व्हावी, या कलेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, सहजतेने कथांचा प्रसार व्हावा, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या कथांच्या जगतातून आता आपण जाऊया सातासमुद्रापलीकडे. हा आवाज ऐका.

नमस्ते बंधू आणि भगिनींनो. माझे नाव सेदू देमबेले आहे. मी पश्चिम आफ्रिकेतील माली या देशाचा नागरिक आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतात आलो असता कुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. माझ्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणे मला फारच आवडले आणि भारताची संस्कृती पाहून मला बरेच काही शिकता आले. मी विनंती करू इच्छितो की आम्हाला पुन्हा एकदा भारत पाहायची संधी दिली जावी, म्हणजे आम्हाला भारताबाबत आणखी बरेच काही शिकता येईल. नमस्कार.

गंमत वाटली ना हे ऐकून.  हे होते माली मधील सेदू देमबेले. माली हा भारतापासून खूप अंतरावर पश्चिम आफ्रिकेतील एक मोठा देश आहे. सेदु देमबेले हे माली शहरातील किटा येथील एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना इंग्रजी, संगीत, चित्रकला आणि रंगकाम शिकवतात. त्यांची आणखी एक ओळख सुद्धा आहे. लोक त्यांना हिंदुस्थानचा बाबू या नावाने ओळखतात आणि त्याबद्दल त्यांना अतिशय अभिमान वाटतो. दर रविवारी दुपारनंतर ते मालीमध्ये एका तासाचा रेडिओ कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमाचे नाव आहे Indian frequency on Bollywood songs. गेली तेवीस वर्षे ते हा कार्यक्रम सादर करत आले आहेत. या कार्यक्रमात ते फ्रेंच बरोबरच बमबारा या माली मधील लोकभाषेत सुद्धा संवाद साधतात आणि नाट्यपूर्ण पद्धतीने कार्यक्रम सादर करतात.भारताप्रति त्यांच्या मनात अतिशय प्रेम आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता, हे त्यांच्या भारतावरील प्रेमाचे आणखी एक कारण आहे. सेदूजी यांनी आता दर रविवारी रात्री नऊ वाजतादोन तासांचा आणखी एक कार्यक्रम  सुरू केला आहे. या कार्यक्रमात ते बॉलीवूडमधील एका संपूर्ण चित्रपटाची कथा फ्रेंच आणि बमबारा भाषेत ऐकवतात. अनेकदा भावनिक प्रसंग ऐकवताना ते स्वतः आणि त्यांचे श्रोतेसुद्धा रडू लागतात. सेदूजींच्या वडिलांनी भारतीय संस्कृतीशी त्यांची ओळख करून दिली होती. त्यांचे वडील चित्रपट आणि रंगभूमीसाठी काम करत असत आणि तेथे भारतीय चित्रपट दाखविले जात असत. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांनी  एका चित्रफितीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना हिंदी भाषेतून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज त्यांची मुले अगदी सहजपणे भारताचे राष्ट्रगीत गातात. आपण हे दोन्ही व्हिडिओ नक्की पाहा आणि भारताप्रति त्यांचे प्रेम अनुभवा. सेदूजी  जेव्हा कुंभ मेळ्यासाठी भारतात आले होते, त्यावेळी ते एका शिष्टमंडळात सहभागी होते. मी त्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. भारताप्रति त्यांचा हा स्नेह, ही आपुलकी आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपल्याकडे असे म्हटले जाते की ज्याची मुळे जमिनीशी जोडलेली असतात तो मोठ-मोठ्या वादळामध्ये सुद्धा ठामपणे उभा राहू शकतो. कोरोनाच्या या कठीण काळात आमचे कृषिक्षेत्र, आमचे शेतकरी हे याचे उत्तम उदाहरण आहे. संकटाच्या काळात सुद्धा आमच्या देशाच्या कृषी क्षेत्राने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. मित्रहो, देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, आमची गावे ही आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ही मजबूत असली तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल. मागच्या काही काळात या क्षेत्रांनी अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, अनेक बेड्या तोडायचा प्रयत्न केला आहे. मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, शेतकरी संघटनांशी चर्चा होत राहते.कृषी क्षेत्र कशा प्रकारे नवी शिखरे गाठत आहे,या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात. त्यांच्याकडून जे काही मी ऐकले आहे, इतरांकडून जे काही ऐकले आहे, त्याबद्दल आज मन की बात कार्यक्रमात काही गोष्टी आपल्याला सांगाव्यात, असे मला वाटते आहे. हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यात आमचे एक शेतकरी बंधू राहतात. त्यांचे नाव आहे श्री कंवर चौहान. ते म्हणतात की एक काळ असा होता, जेव्हा मंडईच्या बाहेर आपली फळे आणि भाज्या विकणे फारच कठीण होते. मंडईच्या बाहेर फळे आणि भाज्या विकायचा प्रयत्न केला तर अनेकदा त्यांची फळे, भाज्या आणि गाड्या सुद्धा जप्त केल्या जात असत. मात्र 2014 साली फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले. त्याचा मोठा फायदा त्यांना तसेच इतर शेतकऱ्यांना सुद्धा झाला. चार वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांसोबत मिळून एक शेतकरी उत्पादक समूह स्थापन केला. आज गावातील शेतकरी स्वीट आणि बेबीकॉर्न या प्रकारच्या मक्‍याची शेती करतात. दिल्लीतील आजादपुर मंडी, मोठमोठी दुकाने तसेच फाइव स्टार हॉटेल्समध्ये त्यांची उत्पादने खरेदी केली जात आहेत. इतकेच नाही याच गावातील 60 पेक्षा जास्त शेतकरी नेट हाऊस, पॉलिहाऊस तयार करून टोमॅटो, सिमला मिरची, दुधी अशा भाज्यांच्या वेगवेगळ्या वाणांचे उत्पादन घेऊन दर वर्षी एकरी 10 ते 12 लाख रुपयांची कमाई करत आहेत. या शेतकऱ्यांचे वेगळेपण काय आहे? आपली फळे, भाज्या कुठेही, कोणालाही विकता येतात, हे वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण हाच त्यांच्या प्रगतीचा पाया आहे. आता देशातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा अधिकार मिळाला आहे. फळे आणि भाज्या, इतकेच नाही तर आपल्या शेतात घेतले गेलेले सर्व प्रकारचे उत्पादन, अन्नधान्य, गहू, ऊस, ज्याचे ते उत्पादन घेतील ते सगळे पीक शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार, जिथे त्यांना चांगला दर मिळेल तेथे विकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले आहे.

मित्रहो, तीन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. या बदलामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे सत्तर गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. अडते नाहीत. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो, गावातील युवकांना त्यामुळे रोजगार मिळतो.

आणखी एक उदाहरण आहे तमिळनाडूमधील थेनी जिल्ह्याचे.या जिल्ह्यात तामिळनाडू केला फार्मर प्रोड्यूसर कंपनी आहे. या नावात कंपनी आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेला तो समूह आहे. या समूहाची व्यवस्था अतिशय लवचिक आहे आणि गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी तो स्थापन करण्यात आला. या शेतकरी समूहाने टाळेबंदीच्या काळात नजीकच्या गावांमधील शेकडो मेट्रिक टन भाज्या, फळे आणि केळी खरेदी केली आणि चेन्नई शहराला कॉम्बो किट प्रदान केले. विचार करा, किती तरुणांना त्यांनी रोजगार दिला असेल. आणि आनंदाची बाब म्हणजे अडते नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोघांनाही लाभ झाला.लखनौमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा असाच एक समूह आहे. त्या समूहाचे नाव आहे ईरादा फार्मर प्रोड्युसर. या समूहाने सुद्धा टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतांमधून थेट फळे आणि भाज्या विकत घेतल्या आणि थेट लखनौच्या बाजारात त्यांची विक्री केली. अडत्यांपासून मुक्ती मिळाली आणि त्यांना योग्य वाटेल त्या किमतीला त्यांना आपली उत्पादने विकता आली. मित्रहो, गुजरातमध्ये बनासकांठा येथील रामपुरा गावातील इस्माईल भाई हे आणखी एक शेतकरी आहेत. त्यांची गोष्टसुद्धा ऐकण्यासारखी आहे. इस्माईल भाई शेती करू इच्छित होते, मात्र हल्ली अनेक लोक विचार करतात, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असे की इस्माईल भाईंचा विचार फारसा योग्य नाही. इस्माईल भाई यांचे वडील शेती करत होते, मात्र त्यांना त्यात नेहमीच नुकसान होत असे. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना नकार दिला. मात्र कुटुंबीयांचा नकार असतानासुद्धा शेतीच करायची, असे इस्माईल भाईंनी ठरवले. शेती करणे नुकसानाचे आहे, असा विचार लोक करत असतील, तर हा विचार आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती, दोन्ही बदलून दाखवायची, असा विचार इस्माईल भाई यांनी केला. त्यांनी शेती करायला सुरुवात केली, पण नव्या पद्धतीने, नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून. त्यांनी ठिबक सिंचन करून बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि आज त्यांनी पिकवलेल्या बटाट्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे.अतिशय दर्जेदार बटाट्याचे पीक ते घेत आहेत. इस्माईल भाई थेट मोठमोठ्या कंपन्यांना या बटाट्याची विक्री करतात.अडत्यांची यात कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे ते शेतीतून उत्तम नफा मिळवत आहेत. आता त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले सगळे कर्ज फेडून टाकले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट सांगू का,इस्माईल भाई आज आपल्या भागातील शेकडो इतर शेतकर्‍यांची मदत करत आहेत, त्यांच्या आयुष्यातही बदल घडवून आणत आहेत.

मित्रहो, आजच्या तारखेला आपण शेतीसाठी जितके आधुनिक पर्याय वापरू, तितकीच शेती प्रगत होईल. त्यात नवनवीन पद्धती रूढ होतील, नाविन्यपूर्ण प्रयोग होत राहतील. मणिपुरमध्ये राहणाऱ्या बिजयशांती एका नव्या प्रयोगामुळे प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी कमळापासून धागा तयार करण्याचा स्टार्ट अप सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे आज कमळाच्या शेतीमध्ये आणि पर्यायाने वस्त्रोद्योग क्षेत्रात एक नवाच प्रघात सुरू झाला आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी तुम्हाला भूतकाळातील एक किस्सा सांगू इच्छितो. 101 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ष होते 1919. इंग्रजांनी जालियनवाला बागेमध्ये निर्दोष नागरिकांवर बेछूट गोळीबार केला होता. या नरसंहारानंतर बारा वर्षांचा एक मुलगा त्या घटनास्थळी पोहोचला. हसरा आणि खेळकर असा तो मुलगा. मात्र त्याने जालियनवाला बागेत जे काही पाहिले, त्याने तो हादरून गेला. कोणीही इतक्या निर्दयपणे कसे वागू शकते, या विचाराने तो स्तब्ध झाला. निरागस असा तो कोवळा मुलगा क्रोधाने पेटून उठला. त्याच जालियनवाला बागेत त्याने इंग्रज सत्तेविरोधात लढा देण्याची शपथ घेतली. मी कोणाबद्दल बोलतो आहे, हे तुमच्या लक्षात आले का? हो, मी शहीद वीर भगतसिंग यांच्या बद्दल बोलतो आहे. उद्या, 28 सप्टेंबर रोजी आपण शहीद वीर भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. मी सर्व देशवासियांसह शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असणारे शहीद वीर भगतसिंग यांना अभिवादन करतो. आपण विचार करू शकता का, एक अशी सत्ता जिने जगातील इतक्या देशांवर राज्य केले. यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही, असे म्हटले जात असे. अशा शक्तीशाली सत्तेला तेवीस वर्षांच्या एका युवकाने सळो कि पळो केले होते. शहीद भगतसिंग केवळ पराक्रमी नव्हते तर ते विद्वान सुद्धा होते, विचारी सुद्धा होते. आपल्या आयुष्याची तमा न बाळगता भगतसिंग आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांनी जी साहसी कृत्ये केली, त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीतील योगदान फार मोठे आहे. शहीद वीर भगतसिंग यांच्या जीवनातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे ते संघ भावनेचे  महत्त्व जाणून होते. लाला लजपत राय यांच्या प्रती त्यांच्या मनातील समर्पण भावना असो किंवा चंद्रशेखर आझाद, सुखदेव,राजगुरू यांच्यासह क्रांतिकारकांप्रति त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना असो. वैयक्तिक गुणगान त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते. आयुष्यभर ते एका निश्चित ध्येयासाठी जगले आणि त्याच ध्येयासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला अन्यायापासून आणि इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. नमो ॲप वर हैदराबादचे अजयजी यांनी दिलेला एक प्रतिसाद मी वाचला. अजयजी लिहितात, आजचे युवक भगतसिंग यांच्यासारखे कसे काय होऊ शकतात? लक्षात घ्या. आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही. मात्र भगतसिंग यांच्यासारखेच देशप्रेम, देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे. शहीद भगतसिंग यांना हीच आपली सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. चार वर्षांपूर्वी साधारण याच वेळी सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी अवघ्या जगाने आमच्या जवानांचे शौर्य आणि निर्भयपणा पाहिला. आमच्या शूर सैनिकांचे एकच उद्दिष्ट होते, भारत मातेच्या गौरवाचे आणि सन्मानाचे रक्षण करणे. त्यांनी आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही, आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ते आगेकूच करत राहिले आणि विजयी होऊन परत आले. आपल्या भारत मातेच्या गौरवात त्यांनी भर घातली, हे आपण सर्वांनीच पाहिले.

माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या काही दिवसात आपण सगळेजण अशा अनेक महान व्यक्तींचे स्मरण करणार आहोत, ज्यांनी भारताच्या निर्मितीमध्ये दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. 2 ऑक्टोबर हा आपणा सर्वांसाठी पवित्र आणि प्रेरक असा दिवस असतो. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री अशा भारत मातेच्या दोन सुपुत्रांचे स्मरण करण्याचा हा दिवस असतो.

आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आजघडीला समयोचित आहेत. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, त्यांचा गाभा जाणून घेतला असता, त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते, भारताचा सुगंध दरवळत राहतो. आदरणीय गांधीजींचे आयुष्य आपल्याला आठवण करून देते की आपल्या प्रत्येक कार्यातून गरिबातल्या गरीब व्यक्तीचे कल्याण व्हावे, हे आपण पाहिले पाहिजे. त्याच वेळी शास्त्रीजींचे आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देते. 11 ऑक्टोबर हा दिवस सुद्धा आपल्यासाठी विशेष असतो. या दिवशी आपण भारतरत्न लोकनायक जयप्रकाशजी यांचे,त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. जेपी यांनी आपल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यात अग्रणी भूमिका पार पाडली आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे सुद्धा आपण स्मरण करतो. त्यांची जयंती सुद्धा 11 ऑक्टोबर रोजी असते. नानाजी देशमुख हे जयप्रकाश नारायण यांचे जवळचे सहकारी होते. जेव्हा जेपी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते, तेव्हा पाटणा येथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. तेव्हा नानाजी देशमुख यांनी तो वार स्वतःवर झेलला होता. या हल्ल्यात नानाजींवर झालेला वार प्राणघातक होता, मात्र त्यांनी जेपींचे आयुष्य वाचवले.12 ऑक्टोबर रोजी राजमाता विजयाराजे सिंधिया यांची सुद्धा जयंती आहे. त्यांनी आपले अवघे आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित केले. त्या राजघराण्यातील होत्या, संपत्ती, शक्ती आणि इतर सर्व स्रोतांची त्यांच्याकडे कमतरता नव्हती. तरीसुद्धा त्यांनी आपले अवघे आयुष्य एका मातेप्रमाणे, वात्सल्य भावाने लोकहितार्थ वाहिले. त्यांचे हृदय उदार होते. या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारंभाचा समारोप होईल आणि आज मी राजमाताजींबद्दल बोलतो आहे, तेव्हा मला एक अतिशय भावनापूर्ण प्रसंग

आठवतो आहे. खरे तर मला बराच काळ त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पण अनेक प्रसंग आठवत आहेत. एका प्रसंगाबद्दल आवर्जून सांगावे, असे मला वाटते. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एकता यात्रा काढली होती. डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू होती. डिसेंबर-जानेवारी महिन्याचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. रात्री सुमारे बारा-एकच्या सुमाराला आम्ही मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर जवळ शिवपुरी येथे पोहोचलो. मुक्कामी पोहोचल्यानंतर दिवसभराच्या थकव्यानंतर आंघोळ करून आम्ही झोपी जात असू आणि सकाळी तयारी करून रवाना होत असू. सुमारे दोन वाजता आंघोळ करून मी झोपायच्या तयारीत होतो, तेव्हा कोणी तरी माझा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला, तेव्हा राजमाताजी समोर उभ्या होत्या. कडाक्याच्या थंडीमध्ये राजमाताजींना समोर पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना वंदन केले. मी म्हणालो,माताजी, अर्ध्या रात्री.. त्या म्‍हणाल्‍या, नाही बेटा तुम्ही एक काम करा. मोदीजी, हे दूध पिऊन घ्या. गरम दूध पिऊनच झोपा. हळद घातलेले दुध त्या स्वतः घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आले की केवळ मलाच नाही तर आमच्या यात्रेत जे तीस-चाळीस लोक होते, त्यात वाहन चालक होते, कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांच्या कक्षात जाऊन रात्री दोन वाजता राजमाताजींनी प्रत्येकाला दूध प्यायला दिले. आईचे प्रेम काय असते, कसे असते, वात्सल्य कसे असते, तो प्रसंग मला कधीच विसरता येणार नाही. अशा महान व्यक्तींनी आपल्या त्यागाने आणि तपश्चर्येने आपल्या या धरतीचे पालनपोषण केले आहे, हे आपले सौभाग्य आहे. या, आपण सगळे मिळून एका अशा भारताची निर्मिती करूया ज्या भारताबद्दल या महापुरुषांना अभिमान वाटेल. त्यांची स्वप्ने आपण आपले संकल्प म्हणून स्वीकारू या.

माझ्या प्रिय देशवासियांने,कोरोनाच्या या काळात मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो. मास्क अवश्य वापरा. चेहरा झाकून न घेता बाहेर पडू नका. दोन मीटर अंतराचा नियम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालासुद्धा वाचवू शकतो. हे असे काही नियम आहेत जे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणून उपयुक्त आहेत. प्रत्येक नागरिकाचे आयुष्य वाचविण्याचे साधन आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत औषध मिळत नाही तोपर्यंत  हलगर्जीपणा करू नका. आपण निरोगी राहा, आपले कुटुंब निरोगी राहो.याच शुभेच्छांसह अनेकानेक आभार. नमस्कार!!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi met with the Prime Minister of Dominica H.E. Mr. Roosevelt Skeritt on the sidelines of the 2nd India-CARICOM Summit in Georgetown, Guyana.

The leaders discussed exploring opportunities for cooperation in fields like climate resilience, digital transformation, education, healthcare, capacity building and yoga They also exchanged views on issues of the Global South and UN reform.