नमस्ते.
मॉरिशस प्रजासत्ताकाचे पंतप्रधान, माननीय प्रविंद कुमार जगन्नाथ जी, आणि मान्यवर,
सर्व 130 कोटी भारतवासीयांच्या वतीने मॉरिशसच्या सर्व बंधुभगिनींना नमस्कार, बॉन्झो (फ्रेंच भाषेतून नमस्ते) आणि थाइपूसम कावडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
भारत मॉरिशस संबन्ध बळकट करण्यासाठी दिवंगत अनिरुद्ध जगन्नाथ यांनी दिलेल्या उत्तुंग योगदानाचे प्रारंभीच कृतज्ञ स्मरण. ते एक दूरदृष्टी लाभलेले थोर नेते होते. त्यांना भारतातही मोठा मान होता. त्यांच्या मृत्यूच्या वेळी आम्हीही भारतात एक दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळला आणि आमच्या संसदेनेही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 2020 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवान्वित करताना जणू आमचाच सन्मान झाला होता. दुर्दैवाने कोरोनाच्या साथीमुळे त्यांच्या जीवनकालात आम्ही तो पुरस्कार सोहळा प्रत्यक्ष आयोजित करू शकलो नाही. मात्र, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात माननीय सरोजिनी जगन्नाथ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारल्याने आम्हाला अतिशय आनंद झाला.
आदरणीय अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या दुःखद निधनानंतर आपल्या देशांमधील हा पहिलाच द्विपक्षीय कार्यक्रम आहे. त्यामुळेच, उभय देशांनी एकमेकांसोबत केलेल्या प्रवासातील हा मैलाचा टप्पा गाठल्याचा सोहळा साजरा करतानाच, मी मनापासून सांगतो की, जगन्नाथ यांच्या परिवाराच्या आणि मॉरिशसच्या सर्व देशवासीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
मान्यवरहो,
इतिहास, परंपरा, संस्कृती, भाषा, आणि हिंदी महासागराच्या पाण्याने बनलेल्या एकभावनेच्या अतूट बंधाने भारत आणि मॉरिशस परस्परांशी जोडले गेले आहेत. आज आपल्यातील प्रचंड मोठी अशी विकासात्मक भागीदारी हीच आपल्या आपुलकीच्या संबंधांचा आधारस्तंभ बनली आहे. विकासात्मक भागीदारीविषयी भारताचा मूळ दृष्टिकोन काय आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॉरिशस. आमच्या भागीदारांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम यांवर आधारलेली ही विकासात्मक भागीदारी, त्यांच्या सार्वभौमतेचा संपूर्ण आदर करते.
प्रविंदजी, मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्प, कान-नाक-घसा यासाठीचे नवे रुग्णालय आणि सर्वोच्च न्यायालयाची नवी वास्तू या प्रकल्पांचे उद्घाटन आपण एकत्रितपणे केले होते, त्याची आठवण आजही ताजी आहे. मेट्रो एक्स्प्रेस लोकप्रियतेचे नवनवे मैलाचे दगड पार करते आहे आणि तिने 5. 6 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे, हे ऐकून मला फार आनंद झाला. मेट्रोच्या अधिक विस्तारासाठी पाठबळ देण्याची आमची इच्छा असून आज झालेल्या 190 दशलक्ष डॉलरच्या पतपुरवठ्याच्या कराराने असे पाठबळ देता येणार आहे. त्यावेळी उद्घाटन झालेल्या नवीन कान -नाक-घसा रुग्णालयाने कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी निभावली, याचा निश्चितच अभिमान वाटतो, आणि समाधानही. खरोखर, कोविड साथीच्या वेळी आपल्यातील सहकार्य वाखाणण्याजोगे होते. आमच्या वॅक्सीन मैत्री कार्यक्रमांतर्गत आम्ही लसीच्या मात्रा पाठवू शकलो अशा पहिल्या काही देशांमध्ये मॉरिशसचाही समावेश होता. आज आपल्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झालेल्या काही मोजक्या देशांमध्ये मॉरिशसचा अंतर्भाव आहे, याचा आनंद वाटतो. हिंदी महासागराच्या क्षेत्रासाठी भारताचा जो दृष्टिकोन आहे, त्याचाही मॉरिशस हा अविभाज्य घटक आहे. 2015 मध्ये माझ्या मॉरिशस भेटीदरम्यानच, सागरी सहकार्य या विषयातील भारताचा विचार आणि दृष्टिकोन म्हणजे SAGAR- सागर- प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास- हा दृष्टिकोन मी मांडला होता.
आपल्या द्विपक्षीय सहकार्य संबंधांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीमध्ये परिवर्तीत केले आहे याचा मला आनंद वाटतो. कोविड संसर्गामुळे प्रतिबंध लावलेले असताना देखील आपण भाडेकरारावर डॉर्नियर विमानाचे हस्तांतरण करू शकलो आणि मॉरीशसच्या तटरक्षक दलाच्या बॅराकुडा या जहाजाची छोटी दुरुस्ती करून देऊ शकलो. वाकाशियो तेल गळतीच्यावेळी साधने आणि तज्ञ व्यक्तींची नेमणूक हे आपल्या सामायिक सागरी वारशाचे रक्षण करण्यासाठी आपण केलेल्या सहकार्याचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.
महोदय,
आजचा कार्यक्रम दोन्ही देशांतील जनतेचे जीवन सुधारण्यासाठीच्या आपल्या सामायिक कटिबद्धतेचे पुन्हा एकदा दर्शन घडवितो. प्रविंदजी, सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वाला जाताना पुन्हा एकदा तुमच्याशी जोडला जात आहे याचा मला आनंद होतो आहे. मॉरीशसच्या सर्वसामान्य लोकांसाठी परवडण्याजोग्या घरांची सुविधा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या उपक्रमाशी जोडले गेल्याबद्दल आम्ही विशेष खुश झालो आहोत. आपण आज राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे आणखी दोन प्रकल्प सुरू करत आहोत: मॉरीशसच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना कौशल्याचे धडे देणारे आधुनिक नागरी सेवा महाविद्यालय सुरु करणे आणि बेटाच्या स्वरूपातील देश म्हणून मॉरीशसला ज्या हवामानविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी 8 मेगावॉट क्षमतेच्या सौर पी.व्हि. कृषी प्रकल्पाची उभारणी.
भारतातदेखील, आमच्या कर्मयोगी अभियानाअंतर्गत आम्ही नागरी सेवांची क्षमता निर्मिती करण्यासाठी अभिनव दृष्टीकोन स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भातील आमचे अनुभव नव्या नागरी सेवा महाविद्यालयाच्या प्रशासनाशी सामायिक करण्यात आम्हाला आनंद आहे. आज 8 मेगावॉट क्षमतेच्या सौर पी.व्हि. कृषी प्रकल्पाची घोषणा करताना मला एक सूर्य,एक विश्व,एक ग्रीड या उपक्रमाची आठवण होते आहे. गेल्या वर्षी ग्लासगो येथे झालेल्या कॉप-26 बैठकीच्या सोबतच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ऑक्टोबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या बैठकीत मी ही कल्पना मांडली होती. या उपक्रमामुळे केवळ कार्बन पदचिन्हे आणि विजेचा खर्च कमी होणार नसून त्यासोबत विविध देश आणि प्रदेशांदरम्यान सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील. सौर उर्जेच्या क्षेत्रात भारत आणि मॉरीशस एकत्रितपणे अशा सहकार्याचे झळाळते उदाहरण निर्माण करू शकतील अशी आशा मला वाटते.
आज आपण करत असलेल्या काही लहान विकास प्रकल्पांच्या करारांचे आदानप्रदान भविष्यात मॉरीशसमध्ये सामाजिक पातळीवर मोठे प्रभाव टाकणाऱ्या प्रकल्पांच्या रुपात साकार होईल. येत्या काळात आपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र, न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळा, राष्ट्रीय वाचनालय आणि पुराभिलेख केंद्र, मॉरीशस पोलीस अकादमी आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरु करणार आहोत. विकासाच्या प्रवासात भारत सदैव मॉरीशससोबत ठाम उभा राहील याचा आज मी पुनरुच्चार करतो.
मॉरीशसच्या सर्व बंधू-भगिनींना 2022 हे वर्ष आनंदी, आरोग्यपूर्ण आणि समृद्धीचे जावो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
Vive l’amitié entre l’Inde et Maurice!
भारत आणि मॉरीशसची मैत्री अमर राहो !
Vive Maurice!
जय हिंद!!
मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.