आत्मनिर्भर भारत म्हणजे दर्जा आणि परिमाण या दोन्हींचा विचार करणारी संकल्पना आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021 ला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी यांनी या प्रसंगी राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली. “भारतीय उत्पादनांनी जगाची बाजारपेठ भरून टाकणे हे आपले ध्येय नाही तर आपल्याला प्रत्येक ग्राहकाचे हृद्य जिंकायचे आहे. भारतीय उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर येणारी जागतिक मागणी आणि या उत्पादनांचा स्वीकार हे आपले ध्येय आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
दर्जा आणि मोजमापनासाठी गेली अनेक दशके भारत परदेशी प्रमाणकांवर अवलंबून होता. पण आता भारताचा वेग, प्रगती, उत्थान, प्रतिमा आणि शक्ती आपल्या स्वतःच्या मानकांनी ठरविली जाईल असे ते म्हणाले. मापनशास्त्र हे मोजमापाचे विज्ञान असून ते कोणत्याही शास्त्रीय यशाचा पाया आहे. सशक्त मापनाशिवाय कोणतेही संशोधन प्रगती करू शकत नाही. अगदी आपले यश देखील नेहमीच एखाद्या मोजपट्टीने मोजावे लागते. कोणत्याही देशाची जगातील विश्वासार्हता ही नेहमीच त्या देशाच्या मापन शास्त्राच्या विश्वसनीयतेवर अवलंबून असते, मापनशास्त्र हा, जगात आपण नेमके कुठे उभे आहोत हे दाखविणारा आरसा आहे, असे ते म्हणाले.
आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी म्हणजे दर्जा आणि परिमाण या दोन्हींचा विचार झाला पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय उत्पादनांनी जगाची बाजारपेठ भरून टाकण्याऐवजी ही उत्पादने खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हृद्य जिंकायचे आवाहन त्यांनी केले. स्वदेशी उत्पादनांना जागतिक बाजारातून मोठी मागणी येण्यासोबतच त्यांचा जागतिक स्तरावर उत्तम स्वीकार होईल हे आपण सुनिश्चित करणे आवश्यक आहे, दर्जा आणि विश्वसनीयता यांच्या पायावर आपण सशक्त भारत ब्रँडची उभारणी केली पाहिजे असे मोदी यांनी सांगितले.
देशाला आज अर्पण केलेले ‘भारतीय निर्देशक द्रव्य’ उद्योग जगताला, अवजड धातू,औषध निर्मिती आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांमध्ये प्रमाणित संदर्भ वस्तू प्रणालीच्या सहाय्याने दर्जात्मक उत्पादने निर्माण करायला मदत करेल असे ते म्हणाले. औद्योगिक क्षेत्र आता नियामक केंद्री दृष्टीकोनाऐवजी ग्राहक केंद्री दृष्टीकोन स्वीकारत आहे असे ते पुढे म्हणाले. या नव्या मानकांमुळे, सर्व जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख देण्याची मोहीम सुरु झाली आहे आणि तिचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे असे मोदी यांनी सांगितले.
देशातील मानके आंतरराष्ट्रीय मानकांच्या दर्जाची झाल्यामुळे परदेशी उत्पादकांना स्थानिक पुरवठा साखळी शोधण्यासाठी मदत होणार आहे. नव्या मानकांमुळे आयात आणि निर्यात या दोन्हींचा दर्जा उत्तम राखण्याची खात्री देता येईल. यामुळे भारतातील सामान्य ग्राहकाला देखील उत्तम दर्जाची उत्पादने मिळू शकतील आणि निर्यातदाराच्या अडचणी कमी होतील असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
Aatmanirbhar Bharat is about quantity and quality.
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2021
Our aim is not to merely flood global markets.
We want to win people's hearts.
We want Indian products to have high global demand and acceptance. pic.twitter.com/7JsfSlBT35