पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या स्वच्छ रोप कार्यक्रमाला(CPP) मंजुरी दिली.
1765.67 कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीने राबवण्यात येणाऱा हा अग्रणी उपक्रम, भारतातील फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे आणि उत्कृष्टता आणि शाश्वततेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्याची अपेक्षा आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात यापूर्वी जाहीर करण्यात आलेला हा कार्यक्रम देशभरातील फळपिकांचा दर्जा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी एक मोठी झेप ठरणार आहे.
स्वच्छ रोप कार्यक्रमाचे(CPP) प्रमुख फायदेः
शेतकरी: स्वच्छ रोप कार्यक्रम(CPP) विषाणूमुक्त, उच्च दर्जाची पेरणी सामग्री उपलब्ध करेल ज्यामुळे पिकांमधून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होईल आणि उत्पन्नाच्या संधींमध्ये सुधारणा होईल.
रोपवाटिकाः सुरळीत प्रमाणीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांचे पाठबळ रोपवाटिकांना स्वच्छ पेरणी सामग्रीचा कार्यक्षम पद्धतीने प्रसार करण्यात मदत करेल, वृद्धीला आणि शाश्वततेला चालना मिळेल.
ग्राहकः हा उपक्रम विषाणूमुक्त असलेल्या उच्च दर्जाच्या, उत्तम चवीच्या, चांगले दिसणाऱ्या आणि पोषणमूल्ये असलेल्या फळांचे लाभ ग्राहकांना मिळतील हे सुनिश्चित करेल.
निर्यातः उच्च-गुणवत्तेच्या, रोगमुक्त फळांचे उत्पादन करून, भारत एक अग्रगण्य जागतिक निर्यातदार म्हणून आपले स्थान मजबूत करेल, बाजारपेठेच्या संधींचा विस्तार करेल आणि आंतरराष्ट्रीय फळ व्यापारात आपला वाटा वाढवेल.
हा कार्यक्रम सर्व शेतकऱ्यांना त्यांची जमीनधारणेचा आकार किंवा सामाजिक आर्थिक दर्जा विचारात न घेता स्वच्छ रोप सामग्री परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यायला प्राधान्य देईल.
हा कार्यक्रम त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिला शेतकऱ्यांना सक्रीय पद्धतीने सहभागी करेल ज्यामुळे त्यांना साधनसंपत्ती, प्रशिक्षण आणि निर्णयक्षम संधी उपलब्ध होतील. हा कार्यक्रम भारतात विविधतापूर्ण कृषी-हवामान स्थितीच्या समस्येला प्रदेशाभिमुख स्वच्छ रोपांची वाणे आणि तंत्रज्ञान विकसित करून तोंड देईल.