भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी 4 मे 2022 रोजी औपचारिक फ्रान्स भेटीवर गेले असताना फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती मा.इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले.
2. भारत आणि फ्रान्स 1998 पासून परस्परांचे सामरिक भागीदार आहेत. परस्परांवरील दृढ व सातत्यपूर्ण विश्वास, सामरिक स्वायत्ततेविषयी चिरस्थायी श्रद्धा, आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रती अविचल वचनबद्धता आणि सुधारित व प्रभावी बहुपक्षवादातून आकार घेणाऱ्या बहुध्रुवीय जगाच्या व्यवस्थेवरील विश्वास या बळकट पायावरच सदर सामरिक भागीदारी भक्कमपणे उभी आहे. सामायिक लोकशाही मूल्ये, मूलभूत स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांविषयी आदरभाव यांप्रती उभय राष्ट्रे वचनबद्ध आहेत.
3. कोरोनोत्तर जगाला जागतिक पातळीवरील भूराजकीय आव्हाने भेडसावत असताना; परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे, आगामी आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने त्या सहकार्याचा नवीन क्षेत्रांत विस्तार करणे आणि उभय राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक व्यापक करणे- या उपायांनी भारत आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांनी एकत्रित भविष्यासाठी सज्ज होण्याची वचनबद्धता पुन्हा दृढपणे व्यक्त केली आहे.
हिंद प्रशांत क्षेत्र
4. हिंद प्रशांत क्षेत्रात अधिक शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी तसेच अधिक समृद्धी आणण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांनी उभारलेली सामरिक भागीदारी, ही अशाप्रकारच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी एक होय. मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित अशा हिंद प्रशांत क्षेत्रासाठीचा त्यांचा सामायिक दृष्टिकोन- आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रती वचनबद्धता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान, नौवहन स्वातंत्र्य आणि दडपशाहीमुक्त, तणावमुक्त व संघर्षमुक्त प्रदेशाची निर्मिती- यावर आधारित आहे.
5. भारत-फ्रान्स हिंद-प्रशांत भागीदारीमध्ये संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, संपर्कव्यवस्था, आरोग्य आणि संतुलित विकास यांचा अंतर्भाव होतो. द्विपक्षीय सहकार्याखेरीज भारत आणि फ्रान्स, प्रदेशात आणि प्रादेशिक संघटनांतर्गतही समविचारी देशांशी, विविध पद्धतींच्या भागीदारी विकसित करत राहतील. फेब्रुवारी 2022 मध्ये युरोपीय महासंघाच्या परिषदेचे (ईयू काउन्सिल) अध्यक्षपद फ्रान्सकडे असताना, पॅरिसमध्ये पहिल्या हिंद-प्रशांत मंत्रिस्तरीय मंचाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्याबाबत ईयूच्या रणनीतीवर आधारित अशी एक महत्त्वाकांक्षी ईयूस्तरीय कार्यसूची ईयूने तयार केली होती.
6. भारत-ईयू सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीची वचनबद्धता भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी व्यक्त केली. भारत-ईयू संपर्कव्यवस्था भागीदारी अंमलात आणण्यासाठी तसेच मे-2021 मध्ये पोर्तो येथे झालेल्या भारत- ईयू नेत्यांच्या बैठकीत घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठीची वचनबद्धताही उभय देशांनी व्यक्त केली. नव्याने स्थापित भारत -ईयू व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेचे उभय देशांनी स्वागत केले. व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षणाच्या सामरिक मुद्द्यांवर उच्च पातळीवर समन्वय साधण्यासाठी त्याचप्रमाणे, व्यापार, गुंतवणूक व भौगोलिक निर्देशकांविषयी (जीआय) भारत आणि ईयू दरम्यान वाटाघाटींची पुन्हा सुरुवात करण्यासाठी ही परिषद सहाय्यभूत ठरेल.
युक्रेन
7. रशियन सैन्याने बेकायदेशीर रीतीने आणि विनाकारण युक्रेनवर अतिक्रमण केल्याची फ्रान्सने पुन्हा एकदा कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली आहे.
8. युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे लोकांच्या जीवितासमोर उभी राहत असलेली आव्हाने याबद्दल भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली. युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचा उभय देशांनी निःसंदिग्धपणे निषेध केला. जनतेचे हाल थांबवण्यासाठी दोन्ही पक्षांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने होणाऱ्या वाटाघाटींसाठी पुढे यावे - यासाठी ताबडतोब शत्रुत्व संपवण्याचे आवाहन भारत व फ्रान्सने केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदीचा, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा, तसेच राष्ट्रांच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याची गरज उभय देशांनी अधोरेखित केली. युक्रेनमधील संघर्षाच्या प्रादेशिक व जागतिक परिणामांविषयी उभय नेत्यांनी चर्चा केली आणि या मुद्यावर समन्वय व सहकार्य वाढविण्यास मान्यता दर्शविली.
9. आधीच कोविड-19 महामारीची झळ लागलेल्या जागतिक अन्नसुरक्षा आणि पोषण यांच्या सध्याच्या बिकट स्थितीबद्दल आणि त्यातही विकसनशील देशांतील स्थितीबद्दल, भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली. युक्रेनमधील संघर्षामुळे अन्नसंकट अधिक गडद होण्याचा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीने समन्वित आणि बहुपक्षीय प्रतिसाद देण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत. चांगल्या रीतीने कार्यरत असणाऱ्या बाजारपेठांची निर्मिती, एकोपा आणि दूरगामी टिकाऊपणा- यांवर काम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या 'अन्न आणि शेती संशोधन अभियानाचा (एफ.ए.आर.एम.)' त्यातच समावेश होतो.
10. अफगाणिस्तानविषयी, भारत आणि फ्रान्सने तेथील लोकांच्या जीवनाची अवस्था आणि मनाधिकारांची पायमल्ली यांबद्दल गंभीर चिंता प्रकट केली. शांत, सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानला भक्कम पाठिंबा असल्याचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा, एकतेचा आणि प्रादेशिक अखंडतेचा तसेच त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याच्या तत्त्वाचा आदर करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक सरकार अस्तित्वात यावे आणि स्त्रिया ,बालके व अल्पसंख्याक समुदायांच्या अधिकारांचा सन्मान केला जावा अशी अपेक्षा उभय देशांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठराव क्र. 2593 (2021) प्रती कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जगाच्या इतर भागांत दहशतवाद पसरविण्यासाठी अफगाणी प्रदेशाचा वापर अजिबात खपवून न घेण्यावर उभय देशांनी भर दिला. या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह सर्वत्र एकत्रितपणे काम करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.
सामरिक सहकार्य
11. संरक्षणविषयक सर्व क्षेत्रांमध्ये सध्या असलेल्या जोरकस सहकार्याचे दोन्ही पक्षांनी स्वागत केले. शक्य तेथे अधिक चांगल्या पद्धतीने एकात्मीकरण व इंटरऑपरेबिलिटि (माहिती व इतर संसाधनांची देवघेव) करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न संयुक्त युद्धसरावांवरून (शक्ती, वरुण, पेगास, डेझर्ट नाईट, गरुड) दृग्गोचर होतात. दरम्यान, भारत आणि फ्रन्समधील सागरी सहकार्य आता विश्वासाच्या नव्या स्तरावर पोहोचले असून संपूर्ण हिंदी महासागरातील युद्धसराव, आदानप्रदान आणि संयुक्त मोहिमांमुळे त्यात अशीच वाढ होत राहील.
12. पूर्वापार असलेले शस्त्रास्त्रविषयक सहकार्य म्हणजे, दोन देशांमधील परस्पर विश्वासाचेच द्योतक असल्याची बाब भारत आणि फ्रांस या दोन देशांनी अधोरेखित केली. मुंबईत 'माझगाव डॉक मर्यादित' येथे निर्माण झालेल्या स्कॉर्पीन प्रकारच्या सहा पाणबुड्यांवरून, 'मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुकूल रीतीने फ्रान्सकडून भारताकडे हस्तांतरित होत असलेल्या तंत्रज्ञानाची उंची दिसून येते. महामारीची स्थिती उद्भवूनही राफेल अगदी नियत वेळेवर सुपूर्द करण्यात आले. यावरून, संरक्षण क्षेत्रात दोन बाजूंमध्ये असलेला समन्वय आणि सुसंवादच सिद्ध झाला. हीच गती कायम ठेवून परस्पर विश्वासाच्या आधारे, संरक्षणविषयक प्रगत तंत्रज्ञान, कारखानदारी आणि निर्यात या बाबतींत तसेच उद्योगांच्या परस्पर भागीदारीचे प्रमाण वाढवण्याच्या बाबतीत 'आत्मनिर्भर भारत' अभियानामध्ये अधिक सर्जनात्मक रीतीने फ्रान्सचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.
13. अंतराळ क्षेत्रातील 60 वर्षांच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्याच्या महान परंपरेच्या बळावर, आणि अंतराळ क्षेत्रात आता उद्भवणाऱ्या समकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठी, विशेषतः 'सर्वाना अंतराळात प्रवेश करण्याची खात्रीशीर सुरक्षित संधी' मिळण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांनी, अंतराळविषयक द्विपक्षीय सामरिक संवादव्यवस्था निर्माण करण्याचे मान्य केले आहे. याद्वारे अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासन आणि अन्य विशेष इकोसिस्टीम्स एकत्र येऊन अंतराळातील सुरक्षाविषयक आणि आर्थिक आव्हानांची चर्चा करू शकतील. अंतराळाच्या लागू करता येण्याजोगे नियम व तत्त्वे यांवर विचारविनिमय करू शकतील तसेच सहकार्याचे नवे पैलू यातून समोर येऊ शकतील. यावर्षी लवकरात लवकर असे पहिले संवादसतर आयोजित करण्याचे दोन्हीही बाजूंनी मान्य केले.
14. जग अधिकाधिक डिजिटायझेशनच्या दिशेने पुढे जात असताना, भारत आणि फ्रान्स यांनी त्यांच्या सायबर सुरक्षा संस्थांमधील सहकार्य बळकट केले आहे. याबतचे विचार आणि कल्पना मिळत्याजुळत्या असल्याने त्याआधारे त्यांनी सायबर नियम आणि तत्त्वे यांना प्रोत्साहन देण्यासंबंधाने बळ एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आपसांतील द्विपक्षीय सायबर संवाद अधिक वरच्या पातळीवर नेण्याचे उभय देशांनी मान्य केले आहे. शांततामय, सुरक्षित व खुल्या सायबरअवकाशासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश यामागे आहे.
15. दोन देशांनी आपल्या स्टार्टअप इकोसिस्टीम्सना जोडण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. सार्वजनिक व खासगी क्षेत्रांना एकत्रित काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारा उपक्रम नुकताच संपन्न झाला, त्याचे उभय देशांनी स्वागत केले. या दोन क्षेत्रांच्या आपापल्या यशस्वितेच्या आधारावर, मुक्त, सर्वसमावेशक आणि खुल्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणारे प्रमाणित प्रोटोकॉल तयार करण्यासाठी तसेच जगाचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे मार्ग शोधण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. युरोपचा सर्वात मोठा डिजिटल मेळा- 'विवाटेक' हा यावर्षी पॅरिसमध्ये भरणार असून, यात भारत 'या वर्षातील सर्वोत्कृष्ट देश' म्हणून नावाजला जाणार आहे.
16. सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान याविषयी इंडो-फ्रेंच रोडमॅप (भारत आणि फ्रान्सने केलेला पुढील नियोजनबद्ध आराखडा) अंमलात आणण्यासाठी, अतिवेगवान अशा एक्झास्केल तंत्रज्ञानाच्या बाबतीत सहकार्य वृद्धिंगत करण्याची इच्छा व तयारी असल्याचा पुनरुच्चार उभय देशांनी केला. याला सी-डॅक आणि अटॉस यांच्यातील सहयोगाचा आधार असून, भारतात सुपरकंप्यूटर तयार करण्याचाही यात समावेश आहे. अधिक सुरक्षित आणि सार्वभौम अशा 5जी /6जी दूरसंवाद प्रणालींसाठी एकत्रित काम करण्यासही उभय देशांनी मान्यता दिली आहे.
17. विश्वासार्ह, परवडण्याजोग्या आणि कमी कार्बन वापरणाऱ्या ऊर्जेचा स्रोत म्हणून सामरिक जैतापूर इपीआर (इव्होल्युशनरी प्रेशराइज्ड रिऍक्टर) प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी वचनबद्ध असल्याचा दोन्ही पक्षांनी पुनरुच्चार केला आणि गेल्या काही महिन्यांत त्याविषयी झालेल्या प्रगतीचे स्वागत केले. येत्या काही महिन्यांत आणखी प्रगती साधण्यासाठी ते अधिक संपर्कात राहणार आहेत.
18. विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्रात दहशतवादविरोधी कारवायांतील सहकार्य हा भारत-फ्रान्स सहकार्याचा कणा आहे. छुप्या दहशतवाद्यांचा वापर, सीमापार दहशतवाद यांसह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा दोन्ही देशांनी कठोर निषेध केला आहे. जागतिक दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या सामायिक संघर्षात एकत्रित काम करण्याचा निश्चय दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा प्रकट केला. यामध्ये- दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांशी लढा, मूलतत्त्ववाद आणि हिंसक एकान्तिकतावाद यांना विरोध, दहशतवादी किंवा हिंसक अतिरेकी उद्देशांसाठी इंटरनेटचा गैरवापर होण्यास प्रतिबंध, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित झालेल्या संस्था आणि व्यक्तींविरुद्ध कारवाई- यांचा समावेश होतो. 'दहशतवादाला आर्थिक रसद पुरवण्यास नकार देण्याच्या' प्रधान विषयावर आधारित तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद भारत 2022 मध्ये आयोजित करणार आहे. या परिषदेच्या तयारीत सक्रियपणे समन्वय साधण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दर्शविली आहे.
हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत/संतुलित विकास
19. पॅरिस कराराच्या स्वीकृतीला आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या संयुक्त स्थापनेला सात वर्षे पूर्ण झाल्यावर, भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांकडून हवामानबदलाला तोंड देण्याची वचनबद्धता- बचाव आणि अनुयोजन दोन्हींबाबत- आजवरच्या तुलनेत सर्वाधिक प्रकट झाली आहे. या परिवर्तनासाठी नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांचा विकास ही गुरुकिल्ली असल्यामुळे, भारताने आणि फ्रान्सने आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या उद्दिष्टांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. तसेच, ऊर्जा संक्रमणाच्या न्यायोचित उपायांवर एकत्र काम करण्याच्या संधी शोधण्याचे उभय देशांनी मान्य केले आहे. जी-7 अंतर्गत करण्याचे कामही यात अंतर्भूत आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांच्या वापराला गती देणे आणि परवडणारी व संतुलित ऊर्जा सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे, असे यामागचे उद्देश होत. स्वच्छ ऊर्जेप्रती असणाऱ्या या कटिबद्धतेचे पुढचे पाऊल टाकत, भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन अभियानान्तर्गत भारताला हरित हायड्रोजनचे हब/ केंद्र बनवण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण भारताने फ्रान्सला दिले. कार्बनविरहित हायड्रोजनच्या विषयात तसेच अशा हायड्रोजनवर नियमन, त्याचे प्रमाणन व प्रमाणीकरण करण्याच्या पैलूंविषयी सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. मोठ्या औद्योगिक भागीदारी निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. हे सहकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी लवकरच एक अंतिम आराखडा तयार करण्याचेही उभय देशांनी मान्य केले. आपापल्या सौर ऊर्जा निर्मितीक्षमता उंचावणारी औद्योगिक भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकत्रित प्रयत्न करणार असून यामुळे, आशियाई तसेच युरोपीय बाजारपेठांना एकात्मिक पुरवठा साखळ्यांच्या माध्यमातून पुरवठा करणे शक्य होणार आहे.
20. हिंद-प्रशांत क्षेत्रात संतुलित शाश्वत वित्तपुरवठा करण्यासाठी एएफडी आणि इंडिया एक्झिम बँकेने केलेल्या प्रयत्नांचे भारत आणि फ्रान्स यांनी स्वागत केले व त्या भागात सहकार्य वाढवण्यास मान्यता दिली. यावर्षी फेब्रुवारीत अंगीकृत केलेली 'हिंद-प्रशांत उद्यान भागीदारी' म्हणजे, हिंद-प्रशांत क्षेत्रात संतुलित/शाश्वत दृष्टिकोन ठेवून संरक्षित क्षेत्रे आणि नैसर्गिक उद्याने विकसित करण्याच्या उभय देशांच्या महत्त्वाकांक्षेचे द्योतक आहे.
21. प्लॅस्टिक प्रदूषणाविरोधात लढा देण्याची महत्त्वाकांक्षा भारत आणि फ्रान्समध्ये सामायिक आहे. प्लॅस्टिकच्या पूर्ण जीवनचक्राकडे लक्ष देणारा आणि कायद्याने बंधनकारक असा प्लॅस्टिक प्रदूषणाबाबतचा आंतरराष्ट्रीय करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्थेचा (यूएनइए) निर्णय आणि त्यासंदर्भात नजीकच्या काळात झालेली प्रगती, याचा मूळ संबंध भारत आणि फ्रान्सच्या उपरोल्लेखित पर्यावरणीय महत्त्वाकांक्षेशी आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाला पूर्णविराम देण्यासाठी एक भक्कम, महत्त्वाकांक्षी आणि कायद्याने बंधनकारक असे साधन (करार) अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भारत आणि फ्रान्सचे एकत्रित प्रयत्न सुरूच राहतील. 'देशाची परिस्थिती आणि प्लॅस्टिक प्रदूषणाशी दोन हात करण्याची क्षमता' याचे तत्त्व लक्षात घेऊन हे प्रयत्न सुरू राहतील. प्लॅस्टिक प्रदूषणावर तातडीने आणि सातत्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी देशांनी स्वेच्छेने त्वरित व सामूहिक प्रयत्न करण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त केली.
22. भारताच्या शाश्वत शहरविकासाप्रती तसेच जैवविविधता, ऊर्जा संक्रमण, आणि हवामानाशी संबंधित अन्य प्रकल्पांप्रती, एएफडी समूह आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून फ्रान्सने व्यक्त केलेल्या वचनबद्धतेचे भारत व फ्रान्स या दोन्ही देशांनी स्वागत केले.
23. नील अर्थव्यवस्था आणि महासागर प्रशासन यांविषयी द्विपक्षीय आराखडा तयार झाल्याबद्दल भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि त्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली.
24. देशाच्या अधिकारक्षेत्रापलिकडील भागांत सागरी जैवविविधतेचे संवर्धन व शाश्वत उपयोजन यासाठी अंमलात असलेल्या UNCLOS (अर्थात संयुक्त राष्ट्र सागरी कायदा संकेत) अंतर्गत, आंतरराष्ट्रीय पातळीवर कायद्याने बंधनकारक असा करार आणण्यासाठी,
आंतरसरकारी परिषदेच्या प्रगतीला भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त पाठिंबा असेल. अतिखोल अशा मोठ्या सागरी क्षेत्रांच्या संरक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल होय.
25. जी-20 देशांच्या संघटनेच्या चौकटीत उत्तम समन्वय राखण्याला उभय पक्षांनी मंजुरी दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व तसेच आण्विक पुरवठादार गटाचे (NSG) सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार फ्रान्सने केला.
26. दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रत्यक्षात आलेल्या स्थलांतर आणि गतिशीलता संबंधी भागीदारी कराराच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी दोन्ही देशांनी पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली आहे.
27. विद्यार्थी, पदवीधर, व्यावसायिक आणि कुशल कामगार यांच्या प्रवास व गतिशीलतेत वाढ करून त्याचवेळी अनियमित स्थलान्तरावर उपाय करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांचे एकत्र प्रयत्न सुरू राहतील. द्विपक्षीय विद्यार्थी गतिशीलतेचे (विद्यार्थ्यांनी परस्परांच्या देशांत जाण्याचे) फायदे ओळखून, फ्रान्सने 2025 पर्यंत 20,000 भारतीय विद्यार्थ्यांना संधी देण्याचे ध्येय कायम ठेवले आहे. यातून नवीन व्यवसाय, स्टार्टअप आणि नवोन्मेष यासाठी दोन्ही देशांत संधी निर्माण होतील.
28. परस्परांच्या कला आणि संस्कृतीविषयी अधिक वाटू लागले आहे आणि उभय देशांतील कलाकार उत्सवसंबंधित आणि निवासी प्रकल्पांमध्ये सहयोग देण्यासाठी उत्सुक आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मार्च 2022 पासून 'बॉन्जो इंडिया (नमस्ते इंडिया)' उत्सवाच्या माध्यमातून साजरा होत आहे. त्यासाठी भारतभर निरनिराळ्या कार्यक्रमांची मालिका सुरू आहे. तसेच, भारतही 'नमस्ते फ्रान्स' उत्सव आयोजित करत आहे. 'पॅरिस पुस्तक मेळावा- 2022' मध्ये भारत सन्माननीय अतिथी होता, तर पुढील नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्यात सन्माननीय अतिथी म्हणून फ्रान्स उपस्थित राहील.
29. संग्रहालय आणि वारसा याविषयीच्या सहकार्यासाठीच्या उद्देशपत्रावर 28 जानेवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे नवीन राष्ट्रीय संग्रहालयाच्या निर्मितीत फ्रान्सला 'नॉलेज पार्टनर (ज्ञान व माहितीविषयक भागीदारी)' करण्यासाठी, भारत आणि फ्रान्स सर्व शक्यता पडताळून पाहतील तसेच आवश्यक प्रणालीचा शोध घेतील.
30. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान ठरलेल्या सहकार्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि नियत उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या पद्धती ठरवण्यासाठी मॅक्रॉन यांनी त्यांच्या सोयीनुसार परंतु लवकरात लवकर भारतात यावे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना निमंत्रित केले आहे.