“रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा आमचा मंत्र राहिला आहे”
“गेल्या दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी नव-मध्यम वर्गाची निर्मिती केली आहे”
“भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे प्रत्येक भारतीयाची आकांक्षा आहे”
“पायाभूत सुविधा हे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुकर आणि आरामदायी करण्याचे एक साधन आहे”
“21 व्या शतकाचे हे तिसरे दशक भारताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे दशक आहे.
“आमची धोरणे आम्ही भूतकाळावर नव्हे तर भविष्यकाळावर नजर ठेवून तयार करत आहोत”
“आजचा भारत हा संधींची भूमी आहे. आजचा भारत संपत्ती निर्मात्यांचा बहुमान करत आहे”
“समृद्ध भारत जागतिक समृद्धीचा मार्ग प्रशस्त करेल”

नमस्कार! शुभ संध्या!

ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

 

मित्रांनो, 

भारत आज एक वेगळी यशोगाथा लिहीत आहे.  भारतात आपण सुधारणांचा प्रभाव, आपल्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवर पडलेला पाहिला आहे.  अगदी भारताने  अनेक वेळा अंदाजापेक्षा जास्त आणि आपल्या समकालीनांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. जसे… गेल्या दहा वर्षांत जागतिक अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढली आहे.  पण या दहा वर्षांत आपली अर्थव्यवस्था जवळपास 90 टक्क्यांनी वाढली आहे.  ही अशी शाश्वत वाढ आपण साध्य केली आहे.  ही अशी शाश्वत वाढ आहे जीचं आम्ही वचन देत असतो.  आणि ही अशी शाश्वत वाढ आहे, जी भविष्यातही कायम राहील.

 

मित्रहो, 

गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आमच्या सरकारने भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.  देशातील नागरिकांना सुशासन देण्याचा आमचा संकल्प आहे.  रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म(सुधारणा-कामगिरी-परिवर्तन) हा आमचा मंत्र राहिला आहे. आणि देशातील जनताही आमची सेवेची भावना पाहत आहे.  देशातील जनता, गेल्या 10 वर्षात देशाने साध्य केलेल्या कामगिरीकडे पाहत आहे.  त्यामुळे आज भारतातील लोक एका नव्या विश्वासाने देखील ओथंबलेले आहेत.  स्वतःवर विश्वास आहे, देशाच्या प्रगतीवर विश्वास आहे, धोरणांवर विश्वास आहे, निर्णयांवर विश्वास आहे आणि हेतूंवरही विश्वास आहे.  जगातील इतर देशांची स्थिती तुम्ही पाहा, या वर्षी जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मतदान झाले, निवडणुका झाल्या, बहुतांश ठिकाणी लोकांनी सरकार बदलण्यासाठी मतदान केले.  अनेक देशांमध्ये सरकारांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.  मात्र भारतातील नागरिकांनी अशा  कला विरोधात जनादेश दिला आहे. भारतातील मतदारांनी 60 वर्षांनंतर, एखाद्या सरकारची हॅटट्रीक घडवली आहे.  भारतातील महत्त्वाकांक्षी तरुण आणि भारतातील महिलांनी, सातत्य, राजकीय स्थैर्य आणि आर्थिक वाढीसाठी मतदान केले आहे.  आणि त्यासाठी देशातील जनतेचे मी जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहेत. 

 

मित्रांनो,

आज भारताची प्रगती जागतिक ठळक बातम्यांपैकी एक बनत आहे.  आकडेवारीचे स्वतःचे महत्त्व असतेच असते, पण शेवटी हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे की प्रत्यक्ष किती लोकांचे जीवन बदलते आहे! यातच भारताच्या भविष्याचे रहस्य दडले आहे.  गेल्या दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.  आणि हे लोक फक्त गरिबीतून बाहेर आले आहेत इतकेच नाही तर त्यांनी एक नवमध्यमवर्ग निर्माण केला आहे.  हा वेग आणि प्रमाण ऐतिहासिक आहे.   जगातील कोणत्याही लोकशाही समाजात यापूर्वी असे घडले नव्हते.  भारतात हे घडले कारण आम्ही गरीबांबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन बदलला.  गरिबांकडेही महत्वाकांक्षा होतीच आणि लढाऊ वृत्ती तर आपल्यापेक्षा जास्त असते.  पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे होते.  जसे… त्यांच्याकडे बँक खाती नव्हती, मूलभूत सुविधाही नव्हत्या.  आणि अशा परिस्थितीत आम्ही गरिबांच्या सक्षमीकरणाचा मार्ग निवडला.  आम्ही त्यांच्या मार्गातील अडथळे दूर केले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो.  आणि बघा किती बदल झाला आहे, अनेक दशकांपासून बँक खाती नसलेले लोक आज त्यांच्या खात्यातून डिजिटल व्यवहार करत आहेत.  ज्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे बंद होते त्यांना आज विना हमी बँकेचे कर्ज मिळत आहे.  ते आज उद्योजक होत आहेत.  जे लोक जगात होत असलेल्या बदलांबद्दल अनभिज्ञ होते, त्यांच्याकडे आज साधने आहेत, संपर्क व्यवस्था आहे आणि ते अधिक चांगले जागरूक माहीतगार नागरिक बनले आहेत.  गरिबीच्या संघर्षातून बाहेर पडत असलेल्यांना प्रगतीची आस आहे.  त्यांना आपल्या मुलांना सोनेरी भविष्य द्यायचे आहे.  त्यांच्या आकांक्षा नवीन पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत, त्यांची सर्जनशीलता नवनिर्मितीचा मार्ग निर्माण करत आहे, त्यांची कौशल्ये उद्योगाचा मार्ग ठरवत आहेत आणि त्यांच्या गरजा बाजाराची दिशा निश्चित करत आहेत, त्यांच्या उत्पन्नात होत असलेली वाढ, बाजारातील मागणी वाढवत आहे.  भारतातील हा नवमध्यमवर्ग देशाच्या प्रगतीसाठी सर्वात मोठी शक्ती ठरत आहे.

 

मित्रहो,

निवडणुकीचे निकाल आले तेव्हा मी म्हटले होते की, आमचे सरकार तिसऱ्या कारकिर्दीत तिप्पट वेगाने काम करेल.  मी तुम्हाला खात्री देतो, उद्देश आता आणखी मजबूत झाले आहेत.  आणि प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच सरकारही पूर्णपणे आशा आणि आत्मविश्वासाने ओथंबलेले आहे.  तिसऱ्यांदा सरकार स्थापन होऊन 100 दिवसही उलटलेले नाहीत.  आम्ही भौतिक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणात व्यग्र आहोत, आम्ही सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहोत, आम्ही सुधारणांमध्येही सतत पुढे जात आहोत.  गेल्या 3 महिन्यांत आम्ही गरीब, शेतकरी, युवावर्ग आणि महिलांसाठी एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले आहेत.  आम्ही गरिबांसाठी 3 कोटी नवीन घरे मंजूर केली, आम्ही एकीकृत निवृत्ती वेतन (युनिफाइड पेन्शन) योजना जाहीर केली, 1 लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला, उत्तम दर्जाच्या बियाण्यांचे 100 हून अधिक जातींचे वाण जारी करण्यात आले, 2 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान पॅकेजची घोषणा करण्यात आली, ज्याचा 4 कोटींहून अधिक युवा वर्गाला थेट फायदा होणार आहे.  आणि 100 दिवसांत देशात सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत.  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे हे मोठे काम झाले आहे.

 

मित्रांनो,

काल मी महाराष्ट्रातील पालघर येथे होतो. तिथे 75 हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीतून वाढवण बंदराची पायाभरणी झाली आहे.  तीन दिवसांपूर्वीच 30 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 12 नवीन औद्योगिक शहरांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे.  50,000 कोटींहून अधिक किमतीच्या आठ अतीजलद पट्ट्यांना (हायस्पीड कॉरिडॉर) मंजुरी देण्यात आली आहे.   पुणे, ठाणे आणि बंगळुरू मेट्रोच्या विस्तारालाही आम्ही 30 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.  दरम्यान, लडाखमध्ये जगातील सर्वात उंच बोगद्यांपैकी एक असलेल्या बोगद्याचे बांधकाम सुरू झाले आहे.

 

मित्रहो,

आमच्यासाठी पायाभूत सुविधा केवळ लांबी, रुंदी आणि उंची वाढवण्यापुरत्या मर्यादीत नाहीत.  आमच्यासाठी या, भारतातील नागरिकांसाठी सोयीचे आणि सुखकर राहणीमानाचे एक माध्यम आहे.  रेल्वेचे डबे यापूर्वीही बनवले गेले होते, पण आम्ही वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वे गाड्या आणल्या, ज्यात वेग आणि आराम दोन्ही आहेत.  आजच सकाळी मी तीन नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.  देशात यापूर्वीही रस्ते बांधण्यात आले होते, परंतु आम्ही भारतात आधुनिक द्रुतगती मार्गांचे जाळे विणत आहोत.  आपल्याकडे याआधीही विमानतळ होते, परंतु आम्ही भारतातील श्रेणी-2, श्रेणी-3 (टियर-टू, टियर-थ्री) शहरांना हवाई मार्गांनी जोडत आहोत.  आम्ही पी एम  गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन ( बृहत् कृती आराखडा) आणला आहे.  देशातील सरकारे आणि विविध विभागांनी आपापल्या कोषात काम करण्याच्या संस्कृतीतून बाहेर यावे, हा यामागील उद्देश आहे.  या सर्व प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.  आपल्या अर्थव्यवस्थेला आणि उद्योगांना याचा खूप फायदा होत आहे.

 

मित्रांनो,

21व्या शतकातील हे तिसरे दशक भारतासाठी उत्थापनासाठी सज्ज दशकासारखे (लिफ्ट ऑफ डिकेड) आहे.  हे कसे होईल?  याचा फायदा कोणाला होणार? हे सगळं करणारे सुद्धा  आपण सर्वजणच आहोत आणि याचा फायदा देखील सर्वांना होईल, संपूर्ण देशाला फायदा होईल.

आज इथे जेव्हा या वेळी भारताच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेले तुम्ही सर्व भागीदार आहात,  खाजगी क्षेत्राशी जोडलेले सहकारी आहात, अशा वेळी विकसित भारताच्या उभारणीला गती देणाऱ्या त्या आधार स्तंभाबद्दल मी नक्कीच चर्चा करू इच्छितो. आणि हे आधारस्तंभ केवळ भारताच्या समृद्धीचे आधार स्तंभ नाहीत, तर ते जागतिक समृद्धीचे आधारस्तंभ आहेत. आज भारतात चहो बाजुंनी संधी वाढत आहेत. सरकार प्रत्येक प्रयत्नाला प्रोत्साहन देत आहे. आणि आपण खूप मोठी झेप घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळेच आम्ही एका दीर्घकालीन दृष्टीकोनावरही काम करत आहोत.

 

सहकाऱ्यांनो
भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवणे हीच प्रत्येक भारतीयाची आकांक्षा आहे. आणि जगालाही भारताकडून हीच अपेक्षा आहे. आज आपण पाहू शकता की त्यासाठी देशात क्रांती सुरू आहे. आज देशभरात सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला देशात जेवढे पाठबळ मिळत आहे, तसे याआधी कधी घडलेले नाही. आज शहरांमध्ये प्लग अँड प्ले, इंडस्ट्रीअल पार्क उभारले जात आहेत, इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जात आहेत. महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनाला चालना दिली जात आहे.  भारतात उत्पादन संग्लग्न प्रोत्साहन योजना ज्या रितीने यशस्वी ठरल्या आहेत, ते तर अभूतपूर्व आहे.

 

सहकाऱ्यांनो
गुलामगिरीच्या कालखंडाआधी भारताच्या समृद्धीचा एक प्रमुख आधार आपली ज्ञान परंपरा, आपली ज्ञान व्यवस्था होती. तीच विकसित भारताचा देखील महत्त्वाचा आधार स्तंभ आहे. आमच्याकडून कुणाला अपेक्षा नसणार की, भारत हे कौशल्य, ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाचे केंद्र व्हावे? यासाठी सरकार उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला भागीदार बनवत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही यावर भर देण्यात आला आहे. एक लाख कोटी रुपयांच्या संशोधन निधीच्या तरतुदीमागेही आमचा हाच विचार आहे. आज देशाचा हाच प्रयत्न आहे की, सर्वोच्च परदेशी विद्यापीठाच्या शाखा भारतात सुरू व्हायला हव्यात, आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधली मुले ज्यांचे बाहेर शिक्षण घेण्यासाठी इतके पैसे खर्च होतात, आमची इच्छा आहे की त्याच्या या पैशांची बचत व्हावी. मी आपल्या समोर एक उदाहरण मांडतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 7 दशकांपासून भारतात एमबीबीएस - एमडीच्या जागांची संख्या 80 हजारांच्या आसपास राहिली आहे. आणि त्यामुळेच तर आपली मुलं डॉक्टर होण्यासाठी परदेशात जाण्यासाठी मजबूर झाली होती. गेल्या दहा वर्षांत आम्ही देशभरात एमबीबीएस - एमडीच्या सुमारे एक लाख नव्या जागा वाढवल्या आहेत. आज देशात एमबीबीएस - एमडीच्या एक लाख ऐंशी हजारांपेक्षा जास्त जागा आहेत. आणि यावेळी मी सुद्धा 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून घोषणा केली आहे की, येत्या 5 वर्षांत भारतात वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशाच्या 75 हजार आणखी नव्या जागा वाढवल्या जातील. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत आरोग्य आणि कल्याणाचे जगातले अत्यंत महत्वाचे केंद्र बनेल.

 

सहकाऱ्यांनो
आज भारताची आणखी एक मोठी महत्वाकांक्षा आहे. ही महत्वाकांक्षा हीच आहे की, देशाला खाद्यान्नाचा जागतिक पेटारा बनवण्याची. जगभरातील जेवणाच्या प्रत्येक टेबलवर खाद्यान्नाचे कोणते ना कोणते मेड इन इंडिया उत्पादन असावे, हाच देशाचा संकल्प आहे. या संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही अनेक बाबींवर एकत्रितपणे काम करत आहोत. आज सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यावर भर दिला जात आहे. आपली दुग्धजन्य पदार्थांची उत्पादने, सागरी खाद्यान्नाची उत्पादने, त्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. आपण पाहिलेच आहे की मागच्या वर्षी संपूर्ण जगाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले, कोणाच्या पुढाकाराने? भारताच्या पुढाकाराने हे घडले. जगातील भरड धान्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे, भारत आहे, आणि ही भरड धान्ये सुपर फूड आहेत, ती तब्येतीसाठीही उत्तम आहेत, आणि प्रगतीसाठीही उत्तम आहेत. मला आनंद आहे की आज भारत जगातील टॉप फूड ब्रँडमध्ये स्थान निर्माण करतो आहे.

 

सहकाऱ्यांनो,
विकसित भारताचा आणखी एक भक्कम आधारस्तंभ म्हणजे हरित ऊर्जा क्षेत्र असणार आहे. जी - 20 मध्ये भारताचे यश आपण पाहिले आहे. भारताच्या हरित हायड्रोजन उपक्रमाला सर्व देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. भारताने 2030 पर्यंत 50 लाख टन हरित हायड्रोजन निर्मितीची क्षमता विकसित करण्याचे ठरविले आहे. भारताचे लक्ष्य, 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचे आहे.

 

सहकाऱ्यांनो,
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने आपल्या विकासाला गती दिली आहे. आता तंत्रज्ञानासोबतच पर्यटनही भारताच्या विकासाचा भक्कम आधारस्तंभ बनेल.  जगभरातील पर्यटकांसाठी, प्रत्येक वर्गवारीतील पर्यटकांसाठी भारत सर्वात प्राधान्याचे  ठिकाण असेल, हाच प्रयत्न आज देश करत आहे. आज भारतात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भव्य आणि दिव्य बनवले जात आहे. आपले जे समुद्रकिनारे आहेत, लहान लहान बेटे आहेत, त्यांचा विकास केला जात आहे. आणि यावेळी देशभरात एक अभिनव मोहीम देखील सुरू आहे. पाहा आपला देश, पीपल्स चॉइस, याअंतर्गत भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळांची यादी बनवण्यासाठी मतदान घेतले जात आहे, नागरिक मतदान करत आहेत. जी ठिकाणे भारतातील जनता सर्वोत्तम ठिकाण मानतील, त्या पर्यटनस्थळांचा युद्ध पातळीवर विकास केला जाईल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल. 

 

सहकाऱ्यांनो
आज आपला देश परिवर्तनात सर्वांच्या सहभाग असण्यावर भर देत आहे. जी - 20 च्या अध्यक्षपदाच्या काळात आपण आपल्या आफ्रिकी मित्रांना सक्षम करण्यासाठी मदत केली. आम्ही ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांसाठी आवाज उठवला. आता आम्हाला एक अशी जागतिक व्यवस्था हवी आहे, जी सर्व देशांचा, विशेषत: ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांचा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करेल. आगामी काळात ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांमध्ये जगातील सर्वाधिक संधी असणार आहेत. संपूर्ण मानवतेचा एक मोठा वाटा या देशांमध्ये वसलेला आहे. आणि भारत विश्व बंधुत्वाच्या भावनेने या देशांचा आवाज बनत चालला आहे.

 

सहकाऱ्यांनो
आजचे जग बहुआयामी आहे. त्यामुळेच आपल्या सरकारची धोरणे आणि रणनीती देखील बहुआयामीच आहेत. प्रत्येक गरजेच्या अनुसरुनच आम्ही आवश्यक ती प्रत्येक पावले उचलत आहोत. आम्ही आपली धोरणे गतकाळाच्या आधारे नाही, तर येणाऱ्या उद्याकडे पाहून आखत आहोत. आमचे लक्ष भविष्यावर आहे. आम्ही उद्या समोर येणाऱ्या आव्हानांसाठी आणि संधींसाठी आज देशाची जडणघडण करत आहोत. हरित  हायड्रोजन अभियान असो, क्वांटम अभियान असो, सेमीकंडक्टर अभियान असो, डीप ओशिअन अभियान असो, या सर्वांवर भारत आज काम करत आहे. आत्ताच आपण पाहिले आहे की, सरकारने अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी 1000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. आजचा भारत हा संधींची भूमी आहे. आमचा विश्वास आहे की, भारताचे भवितव्य यापेक्षा कितीतरी अधिक उज्वल असणार आहे.

 

सहकाऱ्यांनो
आम्ही भारताला 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. आम्हाला ठाऊक आहे की, देशाच्या या वाटचालीत तुम्हालाही उत्साहाने सहभागी व्हायचे आहे. आमची इच्छा आहे की, भारतातील अधिकाधिक कंपन्या जागतिक ब्रँड व्हाव्यात, आमची इच्छा आहे की, भारताने जगातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे. आमचे वचन आहे की, आम्ही ही प्रक्रिया सुलभ करू, तुम्हीही वचन द्या, तुम्ही नवोन्मेषाची कास धराल. आमचे वचन आहे, आम्ही सुधारणा करू, तुम्ही वचन द्या, तुम्ही काम करून दाखवाल. आम्ही वचन देतो, आम्ही स्थिर धोरण व्यवस्था देऊ, आपण वचन द्या, तुमचा हस्तक्षेप सकारात्मक असेल, आमचे वचन आहे की, आम्ही उच्च प्रतिच्या विकासावर लक्ष केंद्रित करू, तुम्ही वचन द्या, की तुम्ही उच्च गुणवत्तेवर लक्ष केंद्रित कराल. मोठा विचार करा, देशासाठी यशाच्या खूप साऱ्या यशोगाथा आपल्याला मिळून लिहायच्या आहेत. आजचा भारत हा जगातील संधींची सर्वांत मोठी भूमी आहे. आजचा भारत संपत्ती निर्मात्यांचा आदर करतो आहे. एक सशक्त स्वरुपातला भारतच संपूर्ण मानवतेचा मोठा विकास घडवून आणू शकतो. एक समृद्ध भारतच संपूर्ण जगाच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करू शकतो. आपल्याला नवोन्मेष, सर्वसमावेशकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मंत्र ध्यानात ठेवावे लागतील. मी देशात आणि देशाबाहेर वास्तव्य करत असलेल्या प्रत्येकाला  सांगू इच्छितो, भारताच्या प्रत्येक समर्थकाला मी सांगू इच्छितो की, चला या वाटचालीत आपण सर्वजण एकत्र मार्गाक्रमण करू या. आपण भारताला विकसित करू या, कारण भारताच्या समृद्धीमध्येच जगाची समृद्धी दडलेली आहे. आणि मला विश्वास आहे की, आपण हे लक्ष्य साध्य करू शकतो. आणि या विश्वासाच्या बळावरच मी तुम्हा सर्वांचे अंतःकरणापासून खूप खूप आभार मानतो.


धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”