पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.
वर्ष 2018 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेपासून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी या शिखर परिषदेने दिली. महामारी-पश्चात आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणे, हवामान बदल, शाश्वत विकास, नवोन्मेष, डिजिटलीकरण तसेच हरित आणि स्वच्छ विकास यांच्या बाबतीत बहुस्तरीय सहकार्य या विषयावर या परिषदेत चर्चा झाली.
शाश्वत सागरी व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करून सागरी क्षेत्रातील सहकार्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.पंतप्रधानांनी नॉर्डिक कंपन्यांना भारताच्या नील अर्थव्यवस्थेत विशेषतः सागरमाला प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले.
आर्क्टिक प्रदेशात नॉर्डिक भागातील देशांसोबत भारताच्या भागीदारीबाबत विचारविनिमय करण्यात आला. भारताचे आर्क्टिक धोरण, आर्क्टिक भागात भारत-नॉर्डिक सहकार्याच्या विस्तारासाठी उत्तम चौकट उपलब्ध करत असल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश केला.
नॉर्डिक देशांतील सार्वभौम संपत्ती कोषांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी आमंत्रित केले.
प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींविषयी देखील या परिषदेत चर्चा झाली.
या परिषदेनंतर स्वीकृत करण्यात आलेले संयुक्त निवेदन वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.