Crossing the milestone of 140 crore vaccine doses is every Indian’s achievement: PM
With self-awareness & self-discipline, we can guard ourselves from new corona variant: PM Modi
Mann Ki Baat: PM Modi pays tribute to Gen Bipin Rawat, his wife, Gp. Capt. Varun Singh & others who lost their lives in helicopter crash
Books not only impart knowledge but also enhance personality: PM Modi
World’s interest to know about Indian culture is growing: PM Modi
Everyone has an important role towards ‘Swachhata’, says PM Modi
Think big, dream big & work hard to make them come true: PM Modi

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.


मला आनंद आहे की आपल्या या बहुरत्ना वसुंधरेच्या पुण्य कार्यांचा अखंड प्रवाह निरंतर वाहता असतो. आणि आज जेव्हा देश ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहे, त्यावेळी ही जी लोकशक्ती आहे, एकेका माणसाची शक्ती आहे, त्या शक्तीचा उल्लेख, त्यांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, भारताच्या आणि एकूणच मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची, एका अर्थाने हमी देणारे आहेत.


मित्रांनो, हे लोकशक्तीचेच सामर्थ्य आहे, सर्वांचे प्रयत्नच आहेत, ज्यामुळे भारत, 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करु शकला. आपण प्रत्येक संकटात, एकमेकांसोबत, एका कुटुंबासारखे उभे राहिलो. आपल्या वस्तीत किंवा शहरात, कोणाची मदत करायची असेल, तर ज्याला जे जे शक्य झाले, त्याने त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न केला. आज जगात लसीकरणाचे जे आकडे आहेत, त्यांची भारताशी तुलना केली तर लक्षात येईल, की आपल्या देशाने किती अभूतपूर्व कामगिरी केली आहे. किती मोठे उद्दिष्ट पार केले आहेत. लसींच्या 140 कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार करणे, हे प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे यश आहे. हा प्रत्येक भारतीयांचा, व्यवस्थेवर असलेला विश्वास दर्शवणारे आहे. आपल्या वैज्ञानिकांवर आपला विश्वास दर्शवणारे आहे. आणि समाजाच्या प्रति असलेली आपली जबाबदारी आपण कशाप्रकारे पार पाडत आहोत, या आपल्या इच्छाशक्तीचा हा पुरावाच आहे.


मित्रांनो,

आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे, की कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारच्या विषाणूने आपल्या दारावर थाप दिली आहे. गेल्या दोन वर्षातला आपला अनुभव असा आहे, की या जागतिक महामारीचं पराभव करण्यासाठी, एक नागरिक म्हणून आपले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा जो नव्या स्वरूपाचा ओमायक्रॉन विषाणू आला आहे, आपले वैज्ञानिक सातत्याने त्याचे अध्ययन करत आहेत. त्यातून त्यांना योज नवी माहिती मिळते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनंतर त्यावर काम केले जात आहे. अशावेळी,स्वयं सजगता, स्वयंशिस्त, ही कोरोनाच्या या स्वरूपाशी लढण्यासाठी, देशाची खूप मोठी ताकद आहे. आपली सामूहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, याच जबाबदारीच्या जाणिवेसह, आपल्या सर्वांना 2022 या वर्षात प्रवेश करायचा आहे.


माझ्या प्रिय देशबांधवांनो,


                महाभारताच्या युद्धकाळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले होते--नभः स्पृशं दीप्तम्’ म्हणजे अभिमानाने आकाशाला गवसणी घालणे. हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्यही आहे. भारतमातेच्या सेवेत गुंतलेले अनेक लोक रोज असेच अभिमानाने आकाश कवेत घेतात. असेच एक आयुष्य होते, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे. वरुण सिंह त्या हेलिकॉप्टरचे वैमानिक होते, ज्याला या महिन्यात तामिळनाडू इथे अपघात झाला. या भीषण अपघातात, आपण देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावले. वरुण सिंह यांनी देखील मृत्यूशी अनेक दिवस धैर्याने झुंज दिली. मात्र, नंतर तेही आपल्याला सोडून निघून गेले. वरुण जेव्हा रुग्णालयात होते,त्यावेळी मी सोशल मीडियावर असे काही पहिले, जे माझ्या मनाला स्पर्शून गेले.


        या वर्षी, ऑगस्ट महिन्यातच त्यांना शौर्य चक्र दिले गेले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र वाचल्यावर माझ्या मनात पहिला विचार हाच आला की यशाची शिखरे गाठल्यानंतरही ते आपल्या मूळाची जपणूक करायला विसरले नव्हते. दुसरे, जेव्हा त्यांची आनंद साजरा करण्याची वेळ होती, तेव्हा त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता केली. त्यांची इच्छा होती, की ज्या शाळेत ते शिकले, तिथल्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही एक ‘उत्सव’ बनावे. आपल्या पत्रात , वरुण जी यांनी आपल्या पराक्रमाचे वर्णन केलेले नही, तर आपल्या अपयशांविषयी ते बोलले आहेत. आपल्या कमतरतांना त्यांनी आपल्या यशात कसे रूपांतरित केले, याविषयी त्यांनी लिहिलं आहे. या पत्रात एके ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे—“एक सामान्य व्यक्ती असण्यात काहीही गैर नाही. प्रत्येक व्यक्ती शाळेत सर्वोत्तम कामगिरी करु शकत नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवू शकत नाही. जर आपण हे करु शकलो, तर ती विलक्षण कामगिरी असेल आणि त्याचे कौतूक केलंच पाहिजे. मात्र, जर आपण ते करु शकलो नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्तीच राहणार आहात. कदाचित शाळेत तुम्ही एक सामान्य विद्यार्थी असाल, मात्र त्यावरून तुमच्या पुढच्या आयुष्याचे कुठल्याही अर्थाने मोजमाप केले जाऊ शकत नाही. तुमच्या अंतःप्रेरणेचा शोध घ्या; ती कदाचित एखादी कला असू शकेल, संगीत, ग्राफीक डिझाईन, साहित्य असं काहीही.. जे काही काम तुम्ही कराल, त्यात संपूर्ण समर्पण द्या. तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. कधीही नकारात्मक विचार करु नका, की मी आणखी प्रयत्न करु शकलो असतो.”  


–(“It is ok to be mediocre. Not everyone will excel at school and not everyone will be able to score in the 90s. If you do, it is an amazing achievement and must be applauded. However, if you don’t, do not think that you are meant to be mediocre. You may be mediocre in school but it is by no means a measure of things to come in life. Find your calling; it could be art, music, graphic design, literature, etc. Whatever you work towards, be dedicated, do your best. Never go to bed thinking, I could have put-in more efforts.)


मित्रांनो सामान्यापासून असामान्य बनण्याचा जो मंत्र त्यांनी दिला आहे, तो देखील तितकाच महत्वाचा आहे. याच पत्रात वरुण सिंग यांनी लिहिलं आहे–

“कधीच आशा सोडू नका. कधीच असा विचार करू नका की तुम्हाला जे करायचं आहे त्यात तुम्ही कमी पडाल. ते सोपं असणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि परिश्रम करावे लागतील. मी अतिसामान्य होतो, आणि आज, मी माझ्या कारकीर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. हा विचार करू नका की 12वी बोर्ड परीक्षेचे गुण हे ठरवतील की तुम्ही आयष्यात काय मिळवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यासाठी मेहनत करा.”

“Never lose hope. Never think that you cannot be good at what you want to be. It will not come easy, it will take sacrifice of time and comfort. I was mediocre, and today, I have reached difficult milestones in my career. Do not think that 12th board marks decide what you are capable of achieving in life. Believe in yourself and work towards it.”

वरुण यांनी लिहिलं होतं की ते एका जरी विद्यार्थ्याला जरी प्रेरणा देऊ शकले, तरी ते देखील खूप असेल. मात्र, आज मी सांगू इच्छितो – त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या पत्रात ते  भलेही फक्त विद्यार्थ्यांशी बोलत आहे, पण त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला संदेश दिला आहे.

    मित्रांनो, दर वर्षी मी अशाच विषयांवर विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतो. या वर्षी देखील परीक्षांपुर्वी मी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा विचार करतो आहे. या कार्यक्रमासाठी दोन दिवसानंतर mygov.in वर नोंदणी देखील सुरु होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत चालेल. यात 9वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात नक्की भाग घ्यावा. आपल्याला भेटण्याची संधी मिळेल. आपण सर्व मिळून परीक्षा, कारकीर्द, यश आणि विद्यार्थी जीवनाशी निगडीत अनेक पैलूंवर मंथन करू.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात’ मध्ये मी आपल्या सर्वांना काही तरी ऐकवणार आहे, जे सीमेपलीकडून खूप दुरून आलं आहे. ते आपल्याला आनंदितही करेल आणि आश्चर्यचकित देखील करेल:

Vocal #(VandeMatram)

वन्दे मातरम् । वन्दे मातरम् 

 

सुजलां सुफलां मलयजशीतलाम् 

शस्यशामलां मातरम् । वन्दे मातरम् 

 

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं 

फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं 

सुहासिनीं सुमधुर भाषिणीं 

सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। 

वन्दे मातरम् । वन्दे मातरम् ।

 

मला खात्री आहे की, हे ऐकून तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल अभिमान वाटला असेल. वन्दे मातरम् मध्ये जो भाव दडलेला आहे, तो आपल्यात अभिमान आणि जोश जागवतो.

मित्रांनो, आपण नक्कीच हा विचार करत असाल, की हा सुंदर व्हिडीओ आहे तरी कुठला, कुठल्या देशातून आला आहे? याचं उत्तर तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. वन्दे मातरम् सादर करणारे हे विद्यार्थी ग्रीसचे आहेत. तिथे ते इलियाच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकतात. त्यांनी ज्या सुंदरतेने आणि भावनेने ‘वंदे मातरम्’ गायलं आहे, ते अद्भुत आणि प्रशंसनीय आहे. असेच प्रयत्न दोन देशांच्या लोकांना आणखी जवळ आणतात. मी ग्रीसच्या या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान केलेल्या त्यांच्या या प्रयत्नाची मी प्रशंसा करतो.

मित्रांनो, लखनौला राहणाऱ्या निलेशजींच्या एका पोस्टची देखील चर्चा करायची इच्छा आहे. निलेशजींनी लखनौ इथं झालेल्या एका आगळ्यावेगळ्या ड्रोन शो ची खूप प्रशंसा केली आहे. हा ड्रोन शो लखनौच्या रेसिडेन्सी भागात आयोजित केला गेला होता. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष रेसिडेन्सीच्या भिंतींवर आजही बघायला मिळते. रेसिडेन्सी मध्ये झालेल्या ड्रोन शो मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे वेगवेगळे पैलू जिवंत केले गेले. मग ते ‘चौरी चौरा आन्दोलन’ असो, ‘काकोरी ट्रेन’ ची घटना असो किंवा मग नेताजी सुभाष यांचे दुर्दम्य साहस आणि पराक्रम असो, या ड्रोन शो ने सर्वांची मनं जिंकली. आपणही याप्रमाणे आपल्या शहरातील, गावातील, स्वातंत्र्य आंदोलनाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर आणू शकता. यात तंत्रज्ञानाची खूप मदत घेऊ शकता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृति जाग्या करण्याची संधी देतो, त्या अनुभवण्याची संधी देतो. देशासाठी नवे संकल्प करण्याची, काही तरी करण्याची इच्छाशक्ती दाखविण्याची हे प्रेरणादायी वेळ आहे, प्रेरणादायी उत्सव आहे. चला स्वातंत्र्यसंग्रामातल्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत राहू, देशासाठी आपले प्रयत्न आणखी मजबूत करूया.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला भारत देश कितीतरी असामान्य प्रतिभांची खाण आहे, ज्यांचे कर्तृत्व  इतरांना देखील काही तरी करून दाखविण्याची प्रेरणा देते. अशीच एक व्यक्ती आहे तेलंगणाचे डॉक्टर कुरेला विट्ठलाचार्य जी. त्याचं वय 84 वर्ष आहे. विट्ठलाचार्य जी याचं उदाहरण आहेत, की जेव्हा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची जिद्द असते, तेव्हा वय आडवं येत नाही. मित्रांनो, विट्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक इच्छा होती की एक मोठं वाचनालय सुरु करावं. देश तेव्हा गुलामीत होता, काही परिस्थितीमुळे त्यांचं ते स्वप्न तेव्हा स्वप्नच राह्यलं. काळ पुढे सरकत गेला तसे विट्ठलाचार्य जी प्राध्यापक झाले, त्यांनी तेलगु भाषेचा सखोल अभ्यास केला आणि त्यातच अनेक रचनांची निर्मिती देखील केली. 6-7 वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा आपलं स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. त्यांनी स्वतःची पुस्तकं वापरून वाचनालय सुरु केलं. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान देऊ लागले. यदाद्रि-भुवनागिरी जिल्ह्याच्या रमन्नापेट भागातल्याया वाचनालयात आज जवळजवळ २ लाख पुस्तकं आहेत. विट्ठलाचार्य जी म्हणतात अभ्यास करताना त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं ती वेळ कुणावरही यायला नको. त्यांना हे बघून आज खूप आनंद होतो की मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावातील लोक देखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत. 

मित्रांनो, पुस्तकं  -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका  अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकल मी पाहतो की, अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली हे अतिशय अभिमानानं सांगत असतात. तसंच आता यापुढे मला अमूक पुस्तकं वाचायची आहेत, असंही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे. मी ही ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं  निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं  पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

अलिकडेच  माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या वेगळ्या प्रयत्नाकडे वेधलं गेलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय बनविण्यासाठी केला गेला आहे. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तुम्हा लोकांना जाणून आश्चर्य वाटेल, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झालाय, मात्र यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला  होता. ज्यावेळी भांडारकर संस्थेने यासंबंधित अभ्यासक्रम सुरू केला, त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमाविषयी मी इथं चर्चा करतोय, याचं  कारण म्हणजे, लोकांना समजलं पाहिजे की, आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केले जात आहेत. सातासमुद्रापल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा मिळू शकेल, यासाठीही नवोन्मेषी कल्पना, प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.

मित्रांनो, आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीविषयी अधिकाधिक माहिती घेण्यामध्ये लोकांची उत्सुकता वाढतेय. वेगवेगळ्या देशांच्या लोकांना फक्त आपली संस्कृती जाणून घेण्यामध्येच उत्सुकता आहे असे नाही, तर तिचा विस्तार करण्यासाठीही हे लोक मदत करीत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे- सर्बियन स्कॉलर डॉक्टर मोमिर निकिच ! यांनी एक व्दिभाषी संस्कृत -सर्बियन शब्दकोश तयार केला आहे. या शब्दकोशामध्ये समाविष्ट केलेल्या संस्कृत 70 हजारपेक्षा जास्त शब्दांचा सर्बियन भाषेत अनुवाद केला गेला आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट जाणून खूप नवल वाटेल, ते म्हणजे डॉक्टर निकिच यांनी वयाच्या 70 व्या वर्षी संस्कृत भाषा शिकली आहे. ते सांगतात की, त्यांनी महात्मा गांधी यांचे लेख वाचल्यामुळे, त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची प्रेरणा मिळाली. अशाच प्रकारचं  उदाहरण मंगोलियाचे 93 वर्षांचे प्राध्यापक जे गेंदेधरम यांचंही  देता येईल. गेल्या चार दशकांमध्ये त्यांनी भारतातल्या जवळपास 40 प्राचीन ग्रंथ, महाकाव्ये आणि रचना यांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे. आपल्या देशातही अशाप्रकारची जिद्द दाखवून कार्यरत असणारे अनेक लोक आहेत. मला गोव्यातल्या सागर मुळे जी यांच्या कामाविषयी, त्यांच्या प्रयत्नांविषयी माहिती घेण्याची संधी मिळाली. शेकडो वर्षांपूर्वीची प्राचीन ‘कावी’ ही चित्रशैली लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या ‘कावी’ चित्रशैलीचं जतन करण्याच्या कामाला त्यांनी जणू स्वतःला वाहून घेतलं आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर आपल्याला ‘कावी’ चित्रकला दिसून येते, परंतु आता ही चित्रशैली  लूप्तप्राय झाली आहे. वास्तविक ‘काव’ याचा अर्थ आहे लाल माती! प्राचीन काळामध्ये या कलेत लाल मातीचा उपयोग केला जात होता. गोव्यामध्ये पोर्तुगाल शासनकाळात तिथून पलायन करणा-या लोकांनी इतर राज्यांमध्ये या अद्भूत चित्रकलेचा परिचय इतरांना करून दिला. काळाच्या ओघात  ही चित्रकला लुप्त होत होती. मात्र सागर मुळे यांनी या कलेला आता नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचं खूप कौतुकही होत आहे. मित्रांनो, एक अल्पसा प्रयत्न, आपण उचललेलं एक छोटं पाऊलसुद्धा आपल्या समृद्ध कलांचं संरक्षण करण्यासाठी मोठं  योगदान देवू शकतं. जर आपल्या देशातल्या लोकांनी दृढ निश्चय केला तर  आपल्या प्राचीन समृद्ध कलांचे संवर्धन, जतन करण्यासाठी या प्रयत्नांना देशभरामध्ये एक जन आंदोलनाचं  स्वरूप येवू शकतं. देशभरामध्ये अशा प्रकारे अनेक प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही याविषयी तुम्हाला असलेली माहिती नमो अॅपच्याव्दारे माझ्यापर्यंत जरूर पोहोचवावी.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, अरूणाचल प्रदेशातल्या लोकांनी एक वर्षापासून एक आगळं –वेगळं  अभियान चालवलं  आहे. आणि त्याला नाव दिले आहे ‘‘ अरूणाचल प्रदेश एयरगन सरेंडर अभियान’ या मोहिमेमध्ये लोक आपण स्वतःहून, स्वमर्जीनं  आपली एयरगन समर्पित करीत आहेत. यामागे कारण काय आहे, माहिती आहे? अरूणाचल प्रदेशात होणारी पक्षांची बेहिशेबी शिकार रोखली जावी, हे यामागचे कारण आहे.  मित्रांनो, अरूणाचल प्रदेशात  500 पेक्षांही अधिक प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास असतो. यापैकी काही प्रजातीचे पक्षी तर जगामध्ये इतरत्र कोणत्याही स्थानी सापडत नाहीत. मात्र हळूहळू आता जंगलांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘एयरगन सरेंडर’ मोहीम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डोंगराळ भागापासून ते पठारी प्रदेशापर्यंत एका समाजापासून ते दुस-या समाजापर्यंत, राज्यामध्ये चौहो बाजूंच्या लोकांनी या अभियानाला अगदी मनापासून पाठिंबा, समर्थन दिलं आहे. अरूणाचलच्या लोकांनी स्वखुशीने आत्तापर्यंत 1600 पेक्षा जास्त एअरगन समर्पित केल्या आहेत. या कार्यासाठी मी अरूणाचलच्या लोकांचे कौतुक करतो. त्यांचे अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपल्या सर्वांकडून 2022 या वर्षासंबंधित असंख्य संदेश आणि शिफारसी, सल्लेही आले आहेत. एक विषय प्रत्येकवेळेप्रमाणे अधिकांश लोकांनी पाठवलेल्या संदेशांमध्ये आहे. हा विषय आहे, स्वच्छता आणि स्वच्छ भारताचा. स्वच्छतेचा हा संकल्प स्वयंशिस्तीनं , सजगतेनं  आणि समर्पणानंच पूर्ण होवू शकणार आहे. आपण एनसीसीम्हणजेचराष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पुनीत सागर अभियानमध्ये याची झलक पाहू शकता. या अभियानामध्ये 30 हजारांपेक्षा जास्त एनसीसी कॅडेटस् सहभागी झाले आहेत. एनसीसीच्या या छात्रांनी अनेक ठिकाणी ......सफाई केली, प्लास्टिक कचरा काढून तो रिसायकलिंगसाठी एकत्रित केला. आपले ... आपले डोंगर, जर स्वच्छ असतील तरच ते  फिरायला जाण्यालायक असतात.  अनेक लोक काही विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण्याचं  स्वप्न आयुष्यभर पहात असतात. मात्र ज्यावेळी तिथं  जातात, त्यावेळी समजून किंवा न समजून तिथे कचरा करून येतात. वास्तविक ही प्रत्येक देशवासियाची जबाबदारी आहे की, ज्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो, ते स्थान आपल्याकडून तरी अस्वच्छ, घाण केलं जावू नये.

मित्रांनो, मला ‘साफवॉटर’ या नावाच्या  एका स्टार्टअपविषयी माहिती मिळाली आहे.  हे स्टार्टअप काही युवकांनी सुरू केलं आहे. याचं  काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीनं चालतं. लोकांना त्यांच्या परिसरातल्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता यांच्यासंबंधी माहिती यातून मिळू शकते. ही गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियानातला पुढचा टप्पा आहे. लोकांच्या स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्यासाठी या स्टार्टअपचं महत्व लक्षात घेवून त्याला एक जागतिक पुरस्कारही मिळाला आहे.

मित्रांनो, ‘एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने’ या प्रयत्नांमध्ये संस्था असो अथवा सरकार, सर्वांची भूमिका महत्वपूर्ण आहे. तुम्ही सर्व मंडळी जाणताच की, आधी सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या फायली आणि कागदपत्रांचा कितीतरी मोठा ढीग रचून ठेवलेला असायचा. ज्यावेळेपासून सरकारने जुनी कामाची पद्धत बदलण्यास प्रारंभ केला आहे, त्यावेळेपासून या फायली आणि कागदपत्रांचे ढीग डिजिटाईज होवून संगणकाच्या ‘फोल्डर’ मध्ये सामावले जात आहेत. जे काही जुने आणि प्रलंबित कामांचे साहित्य , कागदपत्रे आहेत, ते सर्व हटविण्यासाठी मंत्रालये आणि विभागांमध्ये विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.  या सफाई मोहिमांमुळे काही रंजक गोष्टीही घडल्या आहेत. टपाल विभागानं ज्यावेळी असं  स्वच्छता अभियान सुरू केलं  त्यावेळी ‘जंकयार्ड’ पूर्णपणे मोकळं झालं. आता या जंकयार्डचं रूपांतर कोर्टयार्ड आणि कॅफेटेरिया मध्ये झालं आहे. आणखी एक जंकयार्ड मोकळं झाल्यानं ती जागा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी  वापरली जावू लागली. याचप्रमाणं  पर्यावरण मंत्रालयानं  आपल्याकडे  मोकळ्या झालेल्या जंकयार्डच्या जागेचं  वेलनेस केंद्रामध्ये रूपांतर केलं आहे. शहरी कार्य मंत्रालयानं  तर एक स्वच्छ एटीएमही लावलं  आहे. यामागे उद्देश असा आहे की, लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेवून जावी. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागांनी झाडांची पडणारी सुकलेली पाने आणि जैविक कचरा यांचं  जैविक खत बनवण्यास प्रारंभ केला आहे. या विभागांनी वाया जाणा-या कागदांपासून लागणारी स्टेशनरीही बनवण्याचं  काम सुरू केलं आहे. आमच्या सरकारी विभागांमध्येही स्वच्छतेसारख्या विषयांवर असंख्य प्रकारच्या नवसंकल्पना राबविल्या जावू शकतात, हे दिसून येतंय. काही वर्षांपूर्वी तर असे काही होवू शकेल, याविषयी कोणाला भरवसाही नव्हता. मात्र आज या सर्व गोष्टी व्यवस्थेचा हिस्सा बनत चालल्या आहेत. हाच तर देशाचा नवीन विचार आहे, आणि या विचाराचे नेतृत्व सर्व देशवासी मिळून करीत आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,  ‘मन की बात’मध्ये यावेळी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. प्रत्येकवेळे प्रमाणे एक महिन्यानंतर, आपण पुन्हा भेटणार आहोत. परंतु 2022 मध्ये! प्रत्येकवेळी नव्याने प्रारंभ करताना आपल्याला स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची एक संधी मिळत असते. जे लक्ष्य आपण गाठू अशी आपला आधी कल्पनाही करू शकलो नव्हतो, आज देश त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याकडे असे म्हटले आहे की –

क्षणश: कणशश्चैव, विद्याम् अर्थं च साधयेत् |

क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम् ||

 

याचा अर्थ  असा आहे की, ज्यावेळी आपल्याला विद्यार्जन करायचे असते, नवीन काही शिकायचे आहे, करायचे आहे, तर आपल्याला प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्यला धर्नाजन करायचे आहे, म्हणजेच आपल्याला उन्नती- प्रगती करायची असेल तर प्रत्येक कणाचा याचा अर्थ प्रत्येक स्त्रोतांचा, साधनांचा योग्यप्रकारे उपयोग केला पाहिजे. कारण क्षण वाया गेला तर विद्या आणि ज्ञान निघून जाईल आणि कण नष्ट झाला तर धन नष्ट होईल आणि प्रगतीचे मार्ग बंद होतील. ही गोष्ट आपणा सर्व देशबांधवांसाठी प्रेरणा देणारी आहे. आपल्याला तर आणखी खूप काही शिकायचं आहे. नवनवीन संकल्पना, नवोन्मेषी कल्पना राबवायच्या आहेत, नवनवीन लक्ष्य प्राप्त करायची आहेत. म्हणूनच आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. आपल्याला देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेवून जायचे आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येक स्त्रोतांचा, साधनसामुग्रीचा वापर करायचा आहे. हा तर एका दृष्टीने आत्मनिर्भर भारताचाही मंत्र आहे. कारण आपण ज्यावेळी आपल्या स्त्रोतांचा योग्यप्रकारे वापर करू, त्यांना वाया जावू देणार नाही, त्याचवेळी आपण स्थानिक गोष्टींची ताकद ओळखू शकणार आहोत. त्याचवेळी देश आत्मनिर्भर होणार आहे. म्हणूनच, चला तर मग, आपण आपल्या संकल्पांचे पुनरूच्चारण करू या. खूप भव्य, मोठा विचार करूया, मोठी स्वप्ने पाहूया आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करूया! आणि आपली स्वप्ने काही केवळ आपल्यापुरती मर्यादित असणार नाहीत. आपली स्वप्ने अशी असतील की, त्याच्याशी आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास जोडला गेला पाहिजे. आपली प्रगती म्हणजे देशाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करणारी असली पाहिजे. म्हणूनच आपल्याला आजच कामाला लागले पाहिजे. अगदी एक क्षण आणि एक कणही  आपण गमावून चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, या संकल्पाबरोबरच आगामी वर्षामध्ये देश खूप पुढे जाईल आणि 2022 हे वर्ष एका नव्या भारताच्या निर्माणाचे स्वर्णिम पृष्ठ बनेल. याच विश्वासाबरोबर आपल्या सर्वांना 2022 वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"