रशियन महासंघाचे अध्यक्ष!
माझे प्रिय मित्र राष्ट्रपती पुतीन!
महामहीम!
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममधील सहभागी !
नमस्कार!
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना मला आनंद होत आहे आणि या सन्मानासाठी मी अध्यक्ष पुतीन यांचे आभार मानतो.
मित्रांनो!
भारतीय इतिहास आणि संस्कृतीत 'संगम' शब्दाचा विशेष अर्थ आहे. याचा अर्थ नद्या, लोक किंवा कल्पना एकत्र येणे. माझ्या मते, व्लादिवोस्तोक हा युरेशिया आणि पॅसिफिकचा खरा 'संगम' आहे. रशियाच्या पूर्वेकडील सुदूर भागाच्या विकासासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या दूरदृष्टीची मी प्रशंसा करतो. हे स्वप्न साकारण्यासाठी भारत रशियाचा एक विश्वासार्ह भागीदार असेल. 2019 मध्ये जेव्हा मी या मंचाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्लादिवोस्तोकला गेलो होतो, तेव्हा मी "ऍक्ट फार-ईस्ट " धोरणाप्रति भारताची वचनबद्धता जाहीर केली होती. हे धोरण रशियासोबतच्या आमच्या खास आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
महामहीम !
राष्ट्राध्यक्ष पुतीन, मला 2019 मध्ये माझ्या भेटीदरम्यान व्लादिवोस्तोक ते झ्वेझ्दा या बोटीच्या प्रवासादरम्यान आपण केलेली विस्तृत चर्चा आठवते. तुम्ही मला झ्वेज्दा येथील आधुनिक जहाज बांधणी सुविधा दाखवली होती आणि भारत या उद्योगात सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली होती. आज मला आनंद झाला आहे की भारतातील सर्वात मोठ्या शिपयार्डांपैकी एक माझगांव डॉक्स लिमिटेड जगातील काही महत्त्वाच्या वाणिज्यिक जहाजांच्या बांधणीसाठी 'झ्वेज्दा' सोबत भागीदारी करेल. भारत आणि रशिया गगनयान कार्यक्रमाद्वारे अंतराळ संशोधनात भागीदार आहेत. भारत आणि रशिया आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उदीमासाठी उत्तर सागरी मार्ग खुला करण्यातही भागीदार असतील.
मित्रांनो!
भारत आणि रशियामधील मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे. अगदी अलिकडेच कोविड -19 महामारीच्या काळात लसींसह विविध क्षेत्रात आपल्या मजबूत सहकार्यातून याची प्रचिती आली. या महामारीने आपल्या द्विपक्षीय सहकार्यात आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ऊर्जा हा आमच्या सामरिक भागीदारीचा आणखी एक मोठा स्तंभ आहे. भारत - रशिया ऊर्जा भागीदारी जागतिक ऊर्जा बाजारपेठेत स्थैर्य आणण्यास मदत करू शकते. आमचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व्लादिवोस्तोकमध्ये उपस्थित आहेत. भारतीय कामगार अमूर प्रदेशातील यमल ते व्लादिवोस्तोक आणि पुढे चेन्नई पर्यंत प्रमुख गॅस प्रकल्पांमध्ये सहभागी होत आहेत.
उर्जा आणि व्यापार याच्या संदर्भात दोन्ही देशांदरम्यान नातेसंबंध निर्माण करायची संकल्पना आपण मांडत आहोत. चेन्नई आणि व्लादीव्हॉस्टॉक यांच्या दरम्यान सागरी मार्गिका निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे याबद्दल मला आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण मार्गिकेसह हा जोडणी प्रकल्प भारत आणि रशिया यांना भौतिक पातळीवर एकमेकांच्या आणखी जवळ आणेल. महामारीशी संबंधित निर्बंध असताना देखील अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी नातेसंबंध आणखी मजबूत करण्यात चांगली प्रगती झालेली दिसत आहे. कृषी उद्योग, सिरेमिक्स, महत्त्वाची आणि दुर्मिळ भूखनिजे आणि हिरे या क्षेत्रांमध्ये आपण नवनव्या संधींचा शोध देखील घेत आहोत. या कार्यक्रमातील एक भाग म्हणून साखा- याकुतीया आणि गुजरात येथील हिरेविषयक प्रतिनिधी यांच्यादरम्यान स्वतंत्रपणे चर्चा होणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. वर्ष 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या सुलभ कर्ज मर्यादा योजनेमुळे या दोन्ही देशांदरम्यान व्यापाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मला वाटतो आहे.
रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेश आणि भारताशी संबंधित प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या भागीदार देशांना या मंचावर एकत्र आणणे देखील उपयुक्त ठरत आहे. भारतातील काही महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री 2019 साली रशिया भेटीवर आलेले असताना जी महत्त्वाची चर्चा झाली होती तिच्या अनुषंगाने आपण पुढे कार्य करायला हवे. रशियाच्या अतिपूर्वेच्या भागातील 11 प्रदेशांच्या गव्हर्नर्सना लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण द्यायला मला आवडेल
मित्रांनो!
याच मंचावरील कार्यक्रमात 2019 साली मी म्हटल्याप्रमाणे, भारतातील बुद्धिवंतांनी जगाच्या अनेक संशोधनासंदर्भात समृध्द भागांच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. भारतात प्रतिभावान आणि समर्पित कर्मचारीवर्ग आहे तर अतिपूर्वेचा प्रदेश साधनसंपत्तीने समृध्द आहे. जिथे हा मंच उभारला आहे ते फार इस्ट फेडरल विद्यापीठ भारतातून शिक्षणासाठी वाढत्या संख्येने रशियात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तात्पुरते घर झाले आहे.
महोदय!
राष्ट्राध्यक्ष पुतीन, या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही नेहमीच भारताचे खूप चांगले मित्र होतात आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्षेत्रांमध्ये आपली धोरणात्मक भागीदारी अधिकाधिक मजबूतीने वाढत जाईल. पूर्व आर्थिक मंचाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी सुयश चिंतितो.
स्पासिबा!
धन्यवाद!
अनेकानेक धन्यवाद!