पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त जागतिक वेसाक महोत्सवात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. या कार्यक्रमाला प्राचीन बौद्ध महासंघाचे सदस्य, नेपाळ आणि श्रीलंकाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री प्रहलाद सिंग आणि किरेन रिजिजू, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, आदरणीय डॉक्टर धम्मपिया हे देखील सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की वेसाक हा भगवान बुद्धांच्या जीवनाचा उत्सव साजरा करण्याचा आणि आपल्या वसुंधरेच्या उन्नतीसाठी त्यांचे उदात्त आदर्श आणि त्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. ते पुढे म्हणाले की त्यांनी गेल्या वर्षीचा वेसाक दिन कार्यक्रम कोविड -19 महामारी विरुद्ध माणुसकीच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या सर्व आघाडीच्या कामगारांना समर्पित केला होता. एक वर्ष उलटूनही कोविड -19 अजूनही आपल्याला सोडून गेलेला नाही आणि भारतासह अनेक देशांना दुसऱ्या लाटेची झळ बसली आहे. आयुष्यात एकदाच येणाऱ्या या महामारीने अनेकांना दुःख आणि वेदना दिल्या आहेत आणि प्रत्येक देशावर त्याचा परिणाम झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. या महामारीचा आर्थिक परिणाम प्रचंड प्रमाणात झाला आहे आणि कोविड -19 नंतर हे जग पूर्वीसारखे नसेल असे त्यांनी सांगितले. महामारीचे चांगल्या प्रकारे आकलन ज्यामुळे त्याविरोधात लढण्याचे आपले धोरण अधिक मजबूत झाले आणि जीवित हानी टाळण्यासाठी तसेच महामारीवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी लस या गेल्या वर्षभरात घडलेल्या लक्षणीय आणि दखल घेण्यासारख्या सुधारणा आहेत, असे ते म्हणाले.एका वर्षाच्या आत कोविड -19 प्रतिबंधक लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि ते म्हणाले की यातून मानवी निर्धार व कणखरपणाची ताकद दिसून येते.
पंतप्रधान म्हणाले की, भगवान बुद्धांच्या दूरदृष्टीने मानवी दुःख दूर करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याची इच्छा त्यांच्यात जागृत केली. गेल्या वर्षी या संकटाच्या काळात अनेक व्यक्ती आणि संघटना मदतीला धावून आल्या आणि मानवी हालअपेष्टा कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, असे ते म्हणाले. जगभरातील बौद्ध संघटना आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिले. हे कार्य भगवान बुद्धांच्या भवतु सब्ब मंगलम (आशीर्वाद, करुणा आणि सर्वांचे कल्याण) शिकवणीला अनुरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड - 19 विरुद्ध लढताना हवामान बदल सारख्या अन्य आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले. सध्याच्या पिढीची बेफिकीर जीवनशैली भविष्यातील पिढ्यांसाठी धोका ठरत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या वसुंधरेला हानी न पोहचवण्याचा आपण संकल्प करूया. निसर्गाचा आदर करण्याला सर्वोच्च प्राधान्य असलेल्या भगवान बुद्धांच्या जीवनशैलीची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. पॅरिस उद्दिष्टे गाठण्यासाठी कार्यरत काही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आहे असे ते म्हणाले.
गौतम बुद्धांच्या जीवनात शांतता, एकता आणि सह-अस्तित्व या मूल्यांना मोठे स्थान होते, असे पंतप्रधान म्हणाले. परंतु, आजही अशा शक्ती आहेत ज्यांचे अस्तित्व द्वेष, दहशतवाद आणि हिंसा पसरवण्यावर अवलंबून आहे. ते म्हणाले की अशा शक्ती उदार लोकशाही तत्त्वांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मानवतेवर विश्वास असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन दहशत आणि कट्टरतेला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. भगवान बुद्धांची शिकवण आणि सामाजिक न्यायाला दिलेले महत्त्व जागतिक एकतेची शक्ती बनू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की भगवान बुद्ध हे संपूर्ण विश्वासाठी तेजस्वी भांडार आहे. त्यांच्याकडून आपण सर्व वेळोवेळी त्यांच्या मूल्यांचा आधार घेऊया आणि करुणा, सार्वत्रिक जबाबदारी आणि कल्याणाचा मार्ग निवडूया. महात्मा गांधींचे शब्द उद्धृत करत “बुद्धांनी आपल्याला बाह्यरूपी दर्शन झुगारून सत्य आणि प्रेमाच्या अंतिम विजयांवर विश्वास ठेवायला शिकवले” पंतप्रधानांनी प्रत्येकाला भगवान बुद्धांच्या आदर्शांप्रति नव्याने बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.
दररोज गरजू लोकांची सेवा करण्यासाठी नि: स्वार्थपणे आणि जीव धोक्यात घालणाऱ्या आघाडीवरच्या आरोग्य सेवा कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि स्वयंसेवकांचे पंतप्रधानांनी आभार मानले. ज्यांनी आपले आप्त आणि प्रियजन गमावले त्यांच्याप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली.