प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) संमेलन हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे.मध्य प्रदेश राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 08 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदाय: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे.
या अधिवेशनाचे तीन भाग असतील. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या भागीदारीतून, 08 जानेवारी 2023 रोजी युवा प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसद सदस्य झनेटा मस्कारेन्हास यांच्या हस्ते या युवा प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2023 रोजी प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गयाना सहकारी प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान आली तसेच विशेष सन्माननीय निमंत्रित असलेले सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी संमेलनाला संबोधित करतील.
या अधिवेशनात नागरिकांच्या सुरक्षित,कायदेशीर,शिस्तबद्ध आणि कुशल स्थलांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘सुरक्षित जावे,प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्यात येईल. यावेळी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव-परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या परदेशी भारतीयांतील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताकडे यावर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन, 9 जानेवारी रोजी या अधिवेशनात विशेष टाऊन हॉलचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात 2023 या वर्षासाठीच्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करतील तसेच नंतरच्या समारोप समारंभाचे अध्यक्षपद देखील भूषवतील. भारतात तसेच भारताबाहेर, परदेशी भारतीय समुदायातील व्यक्तींनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला ओळख प्राप्त करून देऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने निवडलेल्या व्यक्तींना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
पीबीडी अधिवेशनात पाच संकल्पनाधारित समारोप सत्रे होतील-
‘परदेशी भारतीय समुदायांतील युवकांची अभिनव संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील भूमिका’ या पहिल्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर भूषवणार आहेत.
दुसऱ्या पूर्ण सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय अध्यक्ष म्हणून तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग सहअध्यक्ष म्हणून ‘अमृत काळात भारतीय आरोग्य सेवा परीसंस्थेला चालना देण्यात भारतीय समुदायांची भूमिका: व्हिजन@2047’ या विषयावरील चर्चासत्र घेतील.
‘भारतातील सुप्त सामर्थ्याला चालना- हस्तकला,पाककला आणि सर्जकता यांच्या माध्यमातून सदिच्छा निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी भूषवतील.
‘भारतीय कार्यबळाची जागतिक गतिशीलता सक्षम करताना- भारतीय समुदायाची भूमिका’ या चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील.
‘राष्ट्र उभारणीसाठी समावेशक दृष्टीकोनाप्रती भारतीय समुदायातील उद्योजकांच्या सामर्थ्याचा वापर’ या पाचव्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भूषवणार आहेत.
उपरोल्लेखित सर्व चर्चासत्रांमध्ये भारतीय समुदायांतील सन्मानीय निमंत्रितांच्या गटांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल.
आगामी 17 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोविड-19 महामारीची सुरवात झाल्यापासून चार वर्षांच्या काळानंतर प्रथमच प्रत्यक्ष पद्धतीने या अधिवेशनाचे आयोजन होत आहे. 2021 मध्ये कोविड काळात आभासी पद्धतीने याधीचे अधिवेशन भरवण्यात आले होते.