फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या सुविधा संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.
मित्रहो,
मागच्या वर्षांमध्ये मी अनेक तुकड्यांमधल्या सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे, त्यांच्या समवेत बराच वेळ व्यतीत केला. मात्र आपली तुकडी आहे, ती माझ्या दृष्टीने विशेष खास आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात या अमृत महोत्सवाच्या काळात आपले काम सुरु करत आहात.
भारत आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात प्रवेश करेल तेव्हा आमच्यापैकी बरेच जण नसतील, मात्र आपली ही तुकडी त्या वेळी असेल, आपणही असाल. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, पुढच्या 25 वर्षातल्या देशाच्या विकासात, तुमच्या यशोगाथांची, आपल्या या
तुकडीची मोठी भूमिका राहणार आहे.
मित्रहो,
21 व्या शतकात भारत ज्या स्थानावर आज आहे, अवघ्या जगाचे लक्ष आज हिंदुस्तानकडे लागले आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून एक नवी जागतिक व्यवस्था उदयाला येत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेत भारताला आपली भूमिका वाढवायची आहे आणि वेगाने आपला विकासही साध्य करायचा आहे. मागच्या 75 वर्षात आपण ज्या वेगाने प्रगती केली आहे त्याच्या अनेक पटीने पुढे जायचा हा काळ आहे. येत्या काळात आपण एखादा जिल्हा सांभाळत असाल आपल्याकडे एखाद्या विभागाचा कार्यभार असेल, कधी आपल्या देखरेखीखाली एखादा मोठा पायाभूत प्रकल्प सुरु असेल, कधी आपण धोरणात्मक स्तरावर सूचना देत असाल.या सर्व कामांमधून आपणा सर्वाना एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे 21 शतकातले भारताचे सर्वात मोठे उद्दिष्ट. हे उद्दिष्ट म्हणजे आत्मनिर्भर भारत, आधुनिक भारत. आपल्याला हा काळ वाया घालवायचा नाही म्हणूनच आज मोठ्या अपेक्षा घेऊन मी आपणा सर्वांमध्ये आलो आहे. या अपेक्षा आपल्या व्यक्तित्वाशी संबंधित आहेत, आपल्या कर्तृत्वाशीही संबंधित आहेत. आपल्या काम करण्याच्या पद्धतीशीही, कार्य संस्कृतीशी संबंधित आहेत. म्हणूनच छोट्या-छोट्या गोष्टींपासून मी सुरवात करतो, ज्या कदाचित आपल्या व्यक्तित्वासाठी उपयोगी ठरतील.
मित्रहो,
प्रशिक्षणा दरम्यान आपल्याला सरदार पटेल यांचा दृष्टीकोन, त्यांचे विचार यांच्याशी आपला परिचय करून देण्यात आला. सेवा भाव आणि कर्तव्य भाव या दोन्हींचे महत्व आपल्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. आपण जितकी वर्षे या सेवेत राहाल, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचे मोजमाप या घटकांवरून व्हायला हवे. सेवाभाव तर कमी होत नाही ना, कर्तव्य भावना तर कमी होत नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मूल्यमापन केले पाहिजे, हे लक्ष्य धूसर तर होत नाही ना,सदैव आपले हे लक्ष्य समोर राहिले पाहिजे. यामध्ये बदल होता कामा नये.आपण सर्वानी पाहिले आहे की, ज्या कोणामध्ये सेवा भाव कमी झाला, ज्या कोणावर सत्ता भाव वरचढ झाला, ती व्यक्ती असो वा व्यवस्था त्याचे मोठे नुकसान होते. कोणाचे लवकर होते, तर कोणाचे उशिराने होते मात्र नुकसान नक्कीच होते.
मित्रहो,
मला वाटते आपल्या कामी आणखी एक गोष्ट येऊ शकते. आपण जेव्हा कर्तव्य आणि उद्देश या भावनेने काम करतो तेव्हा ते कधीच ओझे वाटत नाही. आपणही इथे एका उद्देशाने आला आहात. समाजासाठी, देशासाठी एका सकारात्मक परिवर्तनाचा भाग बनण्यासाठी आला आहात. आदेश देऊन काम करून घेणे आणि दुसऱ्यांना कर्तव्य भावनेने प्रेरित करून काम करून घेणे या दोन्हीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. खूपच मोठा फरक असतो. हा एक नेतृत्व गुण आहे, जो आपल्याला स्वतः मध्ये विकसित करायचा आहे. संघ भावनेसाठी हे अनिवार्य आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शक्य नाही. हे करणे खूपच आवश्यक आहे.
मित्रहो,
आतापासून काही महिन्यातच आपण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाल.आपल्या पुढच्या जीवनात फाईल आणि फिल्ड यातला फरक जाणून घेऊन काम करायचे आहे. फाईल मध्ये आपल्याला खरा अनुभव येणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष ते ठिकाण अनुभवायला हवे. मी सांगितलेली बाब जीवनात सदैव लक्षात ठेवा, फाईल मधले आकडे म्हणजे केवळ संख्या नव्हे तर प्रत्येक आकडा, प्रत्येक संख्या म्हणजे एक जीवन असते. त्या जीवनात काही स्वप्ने असतात, काही आकांक्षा असतात, त्या जीवनासमोर काही समस्या असतात, आव्हाने असतात. म्हणूनच आपल्याला त्या आकड्यांसाठी नव्हे तर प्रत्येक जीवनासाठी काम करायचे आहे. माझ्या मनातली आणखी एक भावना मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. हा मंत्र आपल्याला निर्णय घेण्यासाठीचे धाडस देईल आणि तो आपण आचरणात आणलात तर आपल्याकडून चूक होण्याची शक्यता कमी होईल.
मित्रहो,
आपण जिथे जाल तिथे आपल्यात एक उत्साह, एक उमेद असेल, नवीन काही करण्याची उर्मी असेल.मी हे करेन, मी ते करेन, यामध्ये बदल घडवेन, हे मोडीत काढेन, मनात खूप काही असेल. मनात जेव्हा विचार येईल की हे ठीक नाही, यात बदल आवश्यक आहे, तेव्हा आपल्याला वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अनेक व्यवस्था दिसतील, अनेक नियम दिसतील जे आपल्याला कालबाह्य वाटत असतील, योग्य वाटत नसतील. हे नियम म्हणजे ओझे आहे असे आपल्याला वाटत असेल. असा विचार योग्य नाही असे मला म्हणायचे नाही. आपल्याकडे अधिकार असेल तर मनात येईल की असे नको, हे नको, हे करता येईल
मात्र थोडा धीर ठेवत, मी जो मार्ग दाखवत आहे त्यावर वाटचाल करता येईल का. आपल्याला एक सल्ला देऊ इच्छितो. ही व्यवस्था का निर्माण झाली,कोणत्या परिस्थितीत झाली,कोणत्या वर्षी झाली,तेव्हा परिस्थिती काय होती, फाईल मधला एक-एक शब्द, परिस्थिती आपण डोळ्यासमोर आणा, 20 वर्षापूर्वी, 50, 100 वर्षापूर्वी याची निर्मिती कशासाठी झाली असेल, त्याचे मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग विचार करा,म्हणजे याचा पूर्ण अभ्यास करा की जी व्यवस्था निर्माण करण्यात आली त्यामागे काही विचार असेल, आवश्यकता असेल.हा नियम तयार करण्यात आला त्यामागे काय कारण असेल याच्या मुळापर्यंत जा. जेव्हा आपण त्याचा अभ्यास कराल, कारणाच्या मुळाशी जाल तेव्हा आपण कायमस्वरूपी तोडगा देऊ शकाल. घाई-गडबडीने केलेले काम त्या वेळी कदाचित योग्य वाटेल. मात्र कायम स्वरूपी तोडगा नाही देऊ शकणार. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केल्याने त्या क्षेत्रातल्या प्रशासनावर आपली मजबूत पकड येईल. हा सर्व अभ्यास केल्यानंतर आपल्याला निर्णय घायचा असेल तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा.
महात्मा गांधी नेहमी सांगत असत, आपल्या निर्णयाने समाजाच्या शेवटच्या स्तरात असलेल्या व्यक्तीला लाभ होत असेल तर तो निर्णय घेण्यासाठी जराही संकोच करू नका.यामध्ये आणखी एका बाबीची भर मी घालू इच्छितो,आपण जो निर्णय घ्याल, व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन कराल,तेव्हा संपूर्ण भारताच्या संदर्भात अवश्य विचार करा कारण आपण अखिल भारतीय सनदी सेवेचे प्रतिनिधित्व करत आहात. आपला निर्णय जरी स्थानिक भागासाठी असला तरी स्वप्न मात्र संपूर्ण देशाचेच असेल.
मित्रहो,
स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपल्याला रीफॉर्म,परफॉर्म ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री नव्या शिखरावर न्यायची आहे म्हणूनच आजचा भारत ‘सबका प्रयास’ या भावनेने वाटचाल करत आहे. आपल्या प्रयत्नात आपल्यालाही हे जाणून घ्यावे लागेल की सर्वांचे प्रयत्न, सर्वांची भागीदारी याचे सामर्थ्य काय असते. आपल्या कार्यात जितके भाग आहेत त्या सर्वाना जोडण्याचा प्रयत्न करा, ही तर पहिली पायरी झाली, पहिले वर्तुळ झाले. मात्र सामाजिक संघटना जोडल्या, सर्वसामान्यांना जोडल्यावर मोठे वर्तुळ होईल, एक प्रकारे सबका प्रयास, समाजाच्या तळाशी असलेली व्यक्तीही आपल्या प्रयत्नांचा भाग असली पाहिजे. आपण हे काम केले तर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके आपले बळ वाढेल. मोठ्या शहरासाठी आपल्याकडे महानगरपालिका असते. पालिकेकडे सफाई कर्मचारी असतात, ते परिश्रम करतात, शहर स्वच्छ राखण्यासाठी कठोर मेहनत करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नांना प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक नागरिकाची जोड मिळाली, स्वच्छता ही लोकचळवळ झाली तर या सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा उत्सव ठरेल की नाही. जो परिणाम असतो तो अनेक पटीने वाढेल की नाही. कारण सबका प्रयास, सर्वांचे प्रयत्न एक सकारात्मक परिणाम घडवतो. जन भागीदारीतून एक आणि एक दोन नव्हे तर एक आणि एक मिळून अकरा होतात.
मित्रहो,
आज मी आपल्याकडे आणखी एक कार्य सोपवू इच्छितो, हे कार्य आपल्याला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत करत राहायचे आहे. एका प्रकारे त्याला आपल्या जीवनाचा भाग करायचे आहे, त्याला सवयीचे स्वरूप द्यायचे आहे. माझ्या मते संस्कार म्हणजे प्रयत्नपूर्वक विकसित केलेली चांगली सवय.
आपण जिथे काम कराल, ज्या जिल्ह्यात काम कराल, आपण मनात निश्चय करा की या जिल्ह्यात इतक्या अडचणी आहेत, जिथे पोहोचायला हवे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर आपले विश्लेषण असेल. आपल्या मनात येईल की आधीच्या लोकांनी हे का केले नाही.
तुम्ही स्वतः त्या क्षेत्रात, जे काही तुम्हाला कार्यक्षेत्र मिळेल, ते लहान असो वा मोठे तुम्ही निश्चित करू शकता की, त्या कार्यक्षेत्रातील जी 5 आव्हाने आहेत ,ती तुम्ही ओळखू शकता. आणि अशी आव्हाने ज्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांचे जीवन कठीण होते,जी आव्हाने त्यांच्या विकासात अडथळा बनून उभी आहेत.
स्थानिक पातळीवरील अशा आव्हानांना ओळखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.आणि हे का आवश्यक आहे, हे देखील मी सांगेन. जशी आम्ही सरकारमध्ये येताच अशी अनेक आव्हाने ओळखली होती.एकदा का आव्हाने ओळखली की मग आपण त्याचे निराकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो.आता स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी गरिबांना पक्के घर असावे का, नसावे , हे आव्हान होते.आम्ही ते आव्हान स्वीकारले. आम्ही त्यांना पक्की घरे देण्याचा निर्णय घेतला आणि पीएम आवास योजनेचा जलद गतीने विस्तार केला.
विकासाच्या शर्यतीत अनेक दशके मागे असणारे देशातील अनेक जिल्हे हे देखील खूप मोठे आव्हान होते. एक राज्य खूप पुढे मात्र दोन जिल्हे खूप मागे आहेत. एक जिल्हा खूप पुढे पण दोन तालुके खूप मागे आहेत.एक राष्ट्र म्हणून, भारत म्हणून आपण एक संकल्पना तयार केली आहे की, अशा जिल्ह्यांना चिन्हांकित केले जावे. आकांक्षी जिल्ह्यांसाठी एक मोहीम सुरू करून त्यांना राज्याच्या सरासरीच्या बरोबरीने आणले पाहिजे. शक्य असल्यास, राष्ट्रीय सरासरीपर्यंत नेण्यात यावे.
अशाच प्रकारचे एक आव्हान होते वीज जोडणीचे, गॅस जोडणीचे.आपण सौभाग्य योजना सुरु केली. उज्वला योजना राबवत त्यांना विनामूल्य गॅस जोडणी दिली. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच असे घडते आहे की, एखाद्या सरकारने योजनांना पूर्ततेच्या दिशेने घेऊन जाण्याचे म्हटले आहे आणि यासाठी योजना तयार केली आहे.
आता या संदर्भात मला एक उदाहरण द्यायचे आहे.आपल्या येथे विविध विभागांमधील समन्वयाअभावी प्रकल्प वर्षानुवर्षे रखडत असत.हे आपण पाहिले आहे की, आज रस्ता तयार केला, तर उद्या टेलीफोन विभागामधील लोकांनी येऊन तो खोदला, परवा नाला बांधणाऱ्यांनी तो खोदला. समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या या आव्हानावर मात करण्यासाठी आपण पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा तयार केला आहे. सर्व सरकारी विभाग, सर्व राज्ये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्येक संबंधिताला आगाऊ माहिती मिळेल हे सुनिश्चित केले जात आहे. म्हणजेच तुम्ही आव्हानाला ओळखू शकलात तर उपाययोजना शोधून त्यावर काम करणे सोपे होते.
माझे तुम्हाला एक आवाहन आहे, तुम्ही देखील अशी 5, 7, 10 जी तुम्हाला योग्य वाटतील , अशी आव्हाने ओळखा. अशी कोणती आव्हाने आहेत ज्यावर मात केली तर त्या क्षेत्रातील लोकांना त्रासापासून मुक्तता मिळून त्यांच्यात आनंदाची लाट पसरेल. सरकार प्रति विश्वास वाढेल, तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल आणि मनात निश्चित करा माझ्या कार्यकाळात मी या क्षेत्राला समस्यांपासून मुक्त करेनच.
आणि तुम्ही ऐकलेच असेल की, आपल्या शास्त्रामध्ये स्वांत सुखाय बद्दल सांगण्यात आले आहे. कधी-कधी आयुष्यात अनेक गोष्टी करूनही आपल्याला जितका आनंद मिळत नाही तितका आनंद आपण ठरवून काही काम केले की त्यात मिळतो, उत्साह भरून येतो. कधीही थकवा जाणवत नाही. जर तुम्ही एक आव्हान, दोन आव्हाने, पाच आव्हाने स्वीकारली आणि तुमची सर्व संसाधने वापरून किंवा तुमच्या अनुभवाचा उपयोग करून , तुमची प्रतिभा वापरून. त्यावर पूर्णपणे मात केली,तर अशी स्वांत सुखाय ची अनुभूती मिळेल. तुम्ही बघा जो आयुष्यात समाधानाने पुढे जातो,ना त्याच्यासाठी आव्हानाचे निराकरण केल्यानंतर मिळणाऱ्या समाधानाची तीव्रता अनेक पटींनी अधिक सामर्थ्यशाली आहे.
तुमचे कार्य असे असावे की, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.आणि जेव्हा त्याचा लाभार्थी तुम्हाला भेटेल तेव्हा त्याला वाटले पाहिजे की, हे साहेब असताना माझे काम चांगल्याप्रकारे झाले होते. तुम्ही ते क्षेत्र सोडल्यानंतर वीस वर्षांनंतरही तिथले लोक आठवण काढतील की , अरे भाऊ ते एक साहेब आले होते ना आपल्या भागात खूप जुनी समस्या सोडवून गेले. खूप चांगले काम करून गेले.
मला असे वाटते की, गुणात्मक बदल घडवून आणू शकतील असे विषय देखील तुम्ही शोधावे . यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय अभ्यास करावा लागेल,मग तो करा,कायद्याचा अभ्यास करायचा असेल तर करा, तंत्रज्ञानाची मदत घ्यायची असेल तर तेही करा, त्यात मागे राहू नका. तुम्ही विचार करा, तुमच्या सारख्या शेकडो लोकांच्या सामर्थ्याचा उपयोग एकाच वेळी देशाच्या विविध जिल्ह्यांमध्ये केला जाईल.तुम्ही 300-400 जण आहात, म्हणजेच देशातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये कुठे न कुठे तुम्ही काम करणार आहात. याचा अर्थ, तुम्ही सगळे मिळून अर्ध्या भारतात एका नव्या आशेला जन्म देऊ शकता.यामुळे किती मोठा बदल होईल. तुम्ही एकटे नाही, 400
जिल्ह्यांमध्ये तुमचा हा विचार, तुमचा हा प्रयत्न, तुमचे हे पाऊल, तुमचा हा उपक्रम अर्ध्या भारतावर परिणाम करू शकतो.
मित्रांनो.
नागरी सेवेतील परिवर्तनाच्या या युगाला आमचे सरकार सुधारणांनी पाठिंबा देत आहे. कर्मयोगी अभियान आणि आरंभ कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. मला सांगण्यात आले की, तुमच्या अकादमीतील प्रशिक्षणाचे स्वरूप आता कर्मयोगी अभियानावर आधारित करण्यात आले आहे.मला विश्वास आहे, तुम्हा सर्वांना याचाही खूप फायदा होईल. मला आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. भविष्यात तुम्हाला कोणतेही सोपे काम मिळू नये यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. मी बघतो आहे मी जेव्हा हे सांगितले तेव्हा तुमचे चेहरे जरासे उतरले.
तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा की, तुम्हाला कोणतेही सोपे काम मिळू नये. तुम्हाला वाटेल हे कसले पंतप्रधान आहेत, जे आम्हाला असा सल्ला देत आहेत. तुम्ही नेहमी शोधून शोधून आव्हानात्मक कामाची प्रतीक्षा करा.तुम्ही आव्हानात्मक काम मिळवण्याचा प्रयत्न करा . आव्हानात्मक कामाचा आनंद काही वेगळाच असतो.जितके तुम्ही सुखावह क्षेत्रात जाण्याचा विचार कराल, तितकी तुमची प्रगती आणि देशाची प्रगती थांबेल. तुमच्या जीवनात खंड पडेल. काही वर्षांनी तुमचे आयुष्यच तुमच्यासाठी ओझे होईल. आता तुम्ही वयाच्या त्या टप्प्यावर आहात जिथे वय तुमच्या सोबत आहे. या वयात जोखीम पत्करण्याची क्षमता सर्वाधिक असते. गेल्या 20 वर्षात तुम्ही जे शिकलात,त्याहूनही अधिक, जर तुम्ही एखादे आव्हानात्मक काम करू लागलात तर तुम्ही पुढील 2-4 वर्षांत शिकू शकाल.आणि तुम्हाला जे धडे मिळतील, ते तुम्हाला पुढील 20-25 वर्षांसाठी उपयोगी पडतील.
मित्रांनो,
तुम्ही भले वेगवेगळ्या राज्यांतून, वेगवेगळ्या सामाजिक वातावरणामधून आले असाल, पण तुम्ही एक भारत श्रेष्ठ भारताला सामर्थ्य देणारा दुवा देखील आहात. मला विश्वास आहे, तुमचा सेवाभाव , तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता, तुमचा प्रामाणिकपणा, येत्या काही वर्षांत तुमची वेगळी ओळख निर्माण करेल. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्षेत्रात जाणार आहात. तेव्हा , मी खूप पूर्वी सुचवले होते मला माहित नाही की यावेळी हे झाले की नाही झाले.अकादमीत येताना , दीर्घ निबंध लिहा की, या क्षेत्रात येण्यामागे तुमचा विचार काय होता, स्वप्न काय होते, संकल्प काय होता, अखेरीस तुम्ही या प्रवाहात का आलात? , तुम्हाला काय करायचे आहे? या सेवेद्वारे तुम्हाला आयुष्य कुठे घेऊन जायचे आहे?, तुमच्या सेवेच्या क्षेत्राला तुम्हाला कुठे घेऊन जायचे आहे यावर एक दीर्घ निबंध लिहा आणि अकादमीत जा.तो जपून ठेवा आणि जेव्हा तुम्ही 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर , 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे कदाचित 50 वर्षांनंतर एखादा कार्यक्रम असतो.
प्रत्येक वर्षी ,ज्यांना मसुरी सोडून 50 वर्षे होतात, ते 50 वर्षांनी पुन्हा येतात, 50 वर्षांनंतर, 25 वर्षांनी याला तेव्हा तुम्ही लिहिलेला पहिला निबंध वाचा. 25 वर्षांनंतर, तो निबंध पुन्हा वाचा आणि हिशेब करा.की, तुम्ही खरोखर ज्या कामासाठी गेला होता त्याच दिशेने काम करत आहेत की कुठेतरी वाट चुकला आहात. कदाचित तुमचे आजचे विचार 20 वर्षांनंतर तुमचे गुरु बनतील, आणि म्हणूनच हे फार महत्वाचे आहे की, जर हे तुम्ही लिहिले नसेल तर इथून लिहिल्यानंतरच हे संकुल सोडा.दुसरे म्हणजे, मी तुम्हाला या संकुलामध्ये आणि संचालक वगैरेंना आवाहन करतो की,तुमच्या प्रशिक्षणाची अनेक क्षेत्रे आहेत, तुमच्याकडे ग्रंथालय आहे ,सर्व काही आहे,पण तुमच्या प्रशिक्षणात दोन गोष्टी जोडल्या पाहिजेत, आपल्या इथे कृत्रिम बुद्धीमत्तेची चांगली
प्रयोगशाळा असली पाहिजे आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी तो प्रशिक्षणाचा भाग बनवला पाहिजे. त्याचप्रमाणे डेटा प्रशासन या संकल्पनेच्या स्वरूपात येणाऱ्या काळात आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाचा डेटा प्रशासन एक भाग असला पाहिजे . डेटा ही एक मोठे सामर्थ्य बनले आहे.
आणि दुसरे म्हणजे, शक्य असल्यास, तुमच्या कर्मयोगी अभियानामध्ये डेटा प्रशासनासंदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करा, लोकांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी , प्रमाणपत्रे मिळवावीत. कृत्रिम बुद्धीमत्तेमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करा.त्याची ऑनलाइन परीक्षा द्या, अधिकारीच ही परीक्षा देतील , प्रमाणपत्र मिळवतील. यामुळे हळूहळू निर्माण झालेली एक संस्कृती आधुनिक भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मदत करेल.
मित्रांनो,
मला आवडले असते, मी तुमच्यामध्ये आलो असतो, तुमच्याबरोबर थोडा वेळ घालवला असता.आणि मग काही गोष्टी बोलता आल्या असत्या तर कदाचित त्यात जास्त मजा आली असती. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे हे शक्य होणार नाही , संसदही सुरू आहे.त्यामुळे काही अडचणींमुळे मी येऊ शकलो नाही. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने मी तुम्हा सगळ्यांना पाहतोय.मी तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत आहे आणि आणि माझ्या मनात असलेले विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे.
मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद !!